Shriniwas Patil 
संपादकीय

तुमचा आमचा ‘राजा माणूस’

रमेश वैद्य

श्री निवास पाटील स. प. महाविद्यालयात आमच्याबरोबर शिकत होते, तेव्हापासूनचे मित्र आहेत. या मैत्रीला तब्बल ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत या मैत्रीत कधीही अंतर पडले नाही हे विशेष. पाटील कराडसारख्या गावातून शिक्षणासाठी प्रथमच पुण्याला आले होते. एसएससी परीक्षेत त्यांनी त्यांच्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. प्रसन्न व हसरा चेहरा व बोलण्यातला गोडवा यामुळे त्यांच्याभोवती मित्रांचा गोतावळा सहजपणे गोळा होई. त्याचवेळी त्यांच्या नेतृत्वगुणांची झलक दिसून आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांमधून एक प्रतिनिधी (सी.आर.) निवडण्यात येत असे. या निवडणुकीत पाटील यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला होता. केवळ निवडणुकाच नव्हे तर विविध कलागुणांतही ते प्रवीण होते. त्यांना नृत्याची विशेष आवड होती. आंतरराज्य महाविद्यालयीन समूह नृत्य स्पर्धेच्या म्हैसूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन आमच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्यांनी खास प्रशिक्षण घेतले होते व नेटाने सराव केला होता. ‘एनसीसी’मध्ये ‘अंडर ऑफिसर’ हे सर्वोच्च पद आपल्या गुणवत्तेवर मिळविले होते. 

पारदर्शकता व प्रामाणिकपणा
एम.ए.एल.एल.बी. झाल्यावर ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात रुजू झाले. प्रत्येक ठिकाणी मन लावून काम करण्याची सवय अंगी असलेल्या शिस्तप्रियतेमुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी व आयुक्त पदापर्यंत मजल गाठली होती. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही त्यांची जीवनधारणा. साधा, सरळ, प्रेमळ स्वभाव. गरिबांविषयी आपुलकीची भावना त्यांच्या मनात असते. पारदर्शकता व प्रामाणिकपणा यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल आदर दिसतो. कामानिमित्ताने दौऱ्यावर असताना दुपारच्या भोजनापूर्वी प्रथम ते आपला ड्रायव्हर व बरोबरीची माणसे यांना जेवण मिळाले आहे की नाही, याची प्रथम काळजी घेतात. कामाचा कितीही व्याप असला तरी ते डायरी लिहिल्याशिवाय झोपत नाहीत. चौफेर वाचन आणि दांडगा लोकसंपर्क यामुळे त्यांच्या  व्याख्यानांनाही एक वेगळी खुमारी असते.  विनोदी शैलीत ते संवाद साधतात. त्यामुळे हशा-टाळ्या अगदी सहजपणे वसूल करतात. माणसे उच्च पदावर गेल्यानंतर ते आपल्या बरोबरच्या मित्रमंडळींना विसरतात. परंतु पाटील मात्र अपवाद आहेत. त्यांनी आयुष्यात किती पैसा मिळविला हे मला माहित नाही; परंतु माणसे मात्र त्यांनी आपल्या जीवनात खूप जोडली आहेत. कृतज्ञता हा त्यांचा स्थायीभाव आहे. सद्‌गुणांची ते पूजा करतात. एखाद्या गोष्टीचे यश मिळाले तर त्याचे श्रेय घ्यायला माणसे पुढे धावतात. परंत त्यात जर अपयश येणार असेल तर बाजूला होतात. असला ढोंगीपणा त्यांनी कधी केला नाही. जी मानाची पदे  मिळाली आहेत ती केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी नसून त्याचा उपयोग समाजातील गोरगरीब लोकांना झाला पाहिजे यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. याचा अनुभव लोकांनी ते तीन वेळा लोकसभेचे खासदार व सिक्कीमचे राज्यपाल असताना घेतलेला आहे.  त्यांच्या ५-६ वर्षाच्या तेथील वास्तव्यात महाराष्ट्रातील व अन्य प्रांतातील जेवढे मराठी भाषिक सिक्कीमला जाऊन आले, तेवढे यापूर्वी तेथे कधीच गेले नव्हते. त्यामुळे सिक्कीममधील व्यापारी,टॅक्सीवाले त्यावेळी खुश होते.

लोकांची कामे करण्याची पाटील यांची एक विशिष्ट पद्धत आहे. एखाद्याचे काम होण्यासारखे असेल तर ते त्यासाठी जिवापाड प्रयत्न करतील. पण जर ते काम नियमात बसत नसेल, अवैध असेल तर त्या माणसाला ‘हे काम माझ्याकडून होणार नाही’ असे स्पष्टपणे सांगतात. कोणालाही खोट्या आशेला लावून त्याला निष्कारण हेलपाटे मारायला लावणे त्यांना आवडत नाही. आत्तापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शाळा -कॉलेजात प्रवेश मिळवून देण्यास मदत केली आहे. तसेच अनेक गरजू लोकांना शासकीय कोट्यातून १०% मधील घरे व सहकारी गृहरचना संस्थांसाठी जमिनीबाबत (शासकीय नियमांच्या अधीन राहून) आवश्यक सहकार्य केलेले आहे. विशेष म्हणजे या बदल्यात त्यांची कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसते. 

 वारकऱ्याच्या चेहेऱ्यावरील आनंद
 श्रीनिवास पाटील पुण्याला कलेक्टर असताना एकदा आम्ही दोघे त्यांच्या मोटारीतून एकादशीला आळंदीला जात होतो. वाटेत आम्हाला एक वृद्ध वारकरी अनवाणी हातात पताका घेऊन एकटाच उन्हातून घामाघूम अवस्थेत आळंदीला चाललेला दिसला. पाटील यांनी त्याला पहिले व गाडी थांबवली व स्वतः उतरून त्या वारकऱ्यास मोटारीत  घेतले. तांबड्या दिव्याची गाडी पाहून तो वारकरी गाडीत बसताना खूपच संकोचला होता. पाटील यांनी त्याला आळंदीला मंदिरापाशी सोडल्यानंतर त्याला झालेला आनंद आजही माझ्या स्मरणात आहे. एकदा त्यांच्या गाडीतून आम्ही परगावी जात असताना वाटेत एका गावात सार्वजनिक नळावर पाणी वाया जात असल्याचे पाहून त्यांनी गाडी थांबवायला सांगितली व ड्रायव्हरला तो नळ बंद करायला लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

SCROLL FOR NEXT