- अरुण खोरे
‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’च्या कार्याला सुरवात होऊन पन्नास वर्षे झाली. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने विविध सामाजिक चळवळींना ऊर्जा दिली. आजही तेवढ्याच तडफेने सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात बाबा कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यावर दृष्टिक्षेप.
‘फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र’ ही संकल्पना वैचारिक आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे आणि तिला आकार देण्याचे कार्य ज्या अनेकांनी महाराष्ट्रात केले, त्यात डॉ. बाबा आढाव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पाच दशकांहून अधिक काळ समतावादी विचारांचा जागर त्यांनी केला. अलीकडेच महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्धापन दिनाचे त्यांनी स्मरण केले आणि त्यानिमित्ताने काही कार्यक्रमही पुण्यात घेतले.
सत्यशोधक समाजाच्या शताब्दीनिमित १९७३ मध्ये महात्मा फुले यांची विचारधारा समोर ठेवून हमाल आणि धरणग्रस्तांसाठी कार्य करणारे बाबा आढाव यांनी एक वैचारिक व्यासपीठ म्हणून ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ची स्थापना केली. सासवडचे रावसाहेब पवार बाबांबरोबर या कामात होते. याखेरीज पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्तेही होते.
फुले यांच्या सासवडजवळील खानवडी या मूळ गावी प्रतिष्ठानचे काम सुरू करावे, असे बाबांच्या मनात होते. तात्पुरती सुरुवात झाली तरी, कार्यालयाचे काम मात्र सासवडमधील रावसाहेब पवार यांच्या घरातून सुरू झाले. त्यानंतर हे कार्यालय पुण्यात नाना पेठेत बाबांच्या घरी आले आणि कालांतराने भवानी पेठेतील लाकूड बाजारात स्थिर झाले आहे.
आज हे प्रतिष्ठान राज्यातील सामाजिक समतावादी चळवळींचे एक ऊर्जाकेंद्र बनलेले आहे. सामाजिक चळवळींवर छत्र धरणारी अशी ही संस्था राहिली आहे. महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ, त्याला संलग्न असलेली दलित पॅंथरची चळवळ, बाबा ज्या समाजवादी पक्षामधून आले होते, ती समाजवादी चळवळ आणि स्त्रीवादी प्रश्नावर काम करणाऱ्या आणि डाव्या विचारसरणीची बांधिलकी असलेल्या अशा सर्व चळवळींचा एक वैचारिक गोफ ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गुंफला गेला. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात उमटू लागले.
सामाजिक चळवळींचा दस्तावेज
बाबांची कठोर अशी वैचारिक भूमिका, त्याला जोडलेले त्यांचे संघर्षशील कार्यकर्ते, बाबांचे संवादी व्यक्तिमत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सुंबरानच्या माध्यमातून साद घालण्याची त्यांची खुमासदार शैली, यामुळे बाबांच्या चळवळीकडे विविध थरांतील कार्यकर्ते आकर्षित झालेच; त्याखेरीज अनेक बुद्धिवंत या कामात सहभागी झाले.
सत्यशोधक चळवळीच्या विचारांची बांधिलकी ठेवून काम करताना महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील या चळवळीचे जाणते लेखक, नेते, शिलेदार यांच्या साहित्याचा आणि वैचारिक लेखनाचा शोध घेण्याची भूमिका बाबांनी स्वीकारली. त्यादृष्टीने त्यांनी १९७४ मध्ये प्रतिष्ठानचे मुखपत्र म्हणूनच 'पुरोगामी सत्यशोधक' हे त्रैमासिक सुरू केले. त्यातून हा सामाजिक डॉक्युमेंटेशनचा चांगला प्रयोग झाला. अभ्यास-संशोधन सुरू झाले.
अनेक विचारवंत; तसेच कार्यकर्ते-अभ्यासक यात लिहित होते. या त्रैमासिकाची जबाबदारी बाबांनी अनिल अवचट यांच्यावर सोपवली. या आरंभीच्या काळातील अवचटांनी लिहिलेले प्रदीर्घ रिपोर्ताज हे आजही अभ्यासण्यासारखे आहेत. बेळगाव - निपाणी या सीमाभागापासून ते विदर्भातील वाशिम- नागपूरपर्यंत अनेकांनी आपापल्या भागात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू केल्या.
बेळगाव, निपाणी भागातील जटा निर्मूलन, देवदासी पुनर्वसन चळवळी सुरू झाल्या. मुस्लिम आणि बोहरा समाजाचे प्रबोधन चळवळीचे मुद्दे घेऊन हमीद दलवाई, सय्यदभाई, ताहेरभाई पूनावाला हे या कामात बाबांना सहभागी झाले. त्यातूनच पुढे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ स्थापन झाले.
भिडेवाड्यातील स्मारकासाठी...
विविध क्षेत्रांतील अन्याय व विषमतेविरुद्ध आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांचा लेखाजोखा ‘पुरोगामी सत्यशोधक’च्या माध्यमातून पुढे आला आणि आज तो सामाजिक दस्तावेज झाला आहे. राज्य सरकारला समता प्रतिष्ठानने महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेला वाडा स्मारक रुपात उभा करण्याचे निवेदन देऊन पाठपुरावा केला.
शरद पवार १९८८ मध्ये महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर हा विषय अधिक वेगाने पुढे गेला. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते डिसेंबर १९९३ मध्ये महात्मा फुले वाडा हा ‘समता भूमी’ म्हणून राष्ट्रीय स्मारकात रूपांतरित करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्रातील आणि भारतातील सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सर्वांनाच आज जातीय धार्मिक ध्रुवीकरणामुळे नवी संकटे वाढल्याची गंभीर जाणीव झाली आहे. बाबांनी ‘समता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून खूप पूर्वीच प्रबोधनासाठी काम सुरू केले होते. त्यातूनच विषमता निर्मूलन शिबिरे , राष्ट्रीय एकात्मता परिषदा, सांप्रदायिकताविरोधी एकता परिषद यांचे राज्यस्तरीय आयोजन विविध शहर-गावांतून करण्यात आले.
निपाणीतही विषमता निर्मूलन शिबीर घेण्यात आले. कार्यकर्त्यांना निर्वाहासाठी मदत करून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ची उभारणी करण्यात आली. ‘सत्यशोधनाची वाटचाल’, ‘एक गाव एक पाणवठा’, ‘सुंबरान’, अशा निवडक पुस्तक लेखनातूनही बाबांनी चळवळीचे अनुभव लिहिले आहेत. महाराष्ट्रातील दैनिक ‘सकाळ’, साप्ताहिक ‘साधना’मध्ये बाबांचे चळवळीवरचे वैचारिक लेखन नियमित प्रकाशित होत राहिले.
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या २५ वर्षांच्या इतिहासातील हा शताब्दीचा कालखंड आहे. फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या समाजाला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील अस्पृश्यांसाठी तळमळीने गेल्या शतकारंभी काम सुरू करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या यांच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष आहे.
राजर्षी शाहू यांच्या स्मृतीचे हे १०१ वे वर्ष आहे. याबरोबरच प्रतिष्ठानने मुखपत्र म्हणून सुरू केलेल्या ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकाचे सुवर्ण महोत्सवी वर्षही येत्या डिसेंबर महिन्यात सुरु होईल. आज महाराष्ट्रातील आणि देशातील आंदोलनांचा एक सर्वात ज्येष्ठ असा नेता आणि साक्षीदार म्हणून बाबांकडे आपण पाहतो.
फुले यांनी स्त्रीशुद्रातिशूद्र वर्गाचे गाऱ्हाणे मांडले होते. या वर्गाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि देशातील असंघटित कामगारांना अधिक सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आजही बाबा रस्त्यावर येत असतात.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.