cannes film festival 2024 chhaya kadam all we imagine as light sister midnight Sakal
संपादकीय

संघर्षातील सुवर्णफुले

लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ या दोन चित्रपटांतील भूमिकांसाठी छाया यांचे कौतुक होत आहे.

महिमा ठोंबरे

यंदाचा कान महोत्सव भारतीयांसाठी विशेषतः मराठीजनांसाठी खासच ठरला. मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ आणि ‘सिस्टर मिडनाईट’ या दोन चित्रपटांचे स्क्रीनिंग महोत्सवात झाले. यातील ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ज्युरी पुरस्कारही मिळाला.

विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या सादरीकरणानंतर सलग आठ मिनिटे टाळ्यांचा कडकडाट करत प्रेक्षकांनी उभे राहून कलाकारांना दाद दिली. ‘लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ या दोन चित्रपटांतील भूमिकांसाठी छाया यांचे कौतुक होत आहे.

दोन्हीही चित्रपट यशस्वी ठरले असतानाच कान महोत्सवात मिळालेल्या यशामुळे त्यांच्यासाठी हे वर्ष खास ठरले आहे. छाया यांचे मूळ गाव कोकणातील. बालपण मुंबईत गेले. मुंबईच्या कलिना भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. कबड्डीमध्ये विशेष गती होती.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांही गाजवल्या. त्याचवेळी शाळेतल्या नृत्य, नाट्य स्पर्धांमध्ये सहभागीही होत. मात्र २००१मध्ये एकाच वर्षात वडिलांचे आणि भावाचे निधन झाल्यामुळे छाया यांना मोठा धक्का बसला.

दुःखावर मात करताना त्यांना मनोरंजन क्षेत्राची वाट सापडली. ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या अभिनयाच्या कार्यशाळेची जाहिरात बघून त्या तेथे दाखल झाल्या. कार्यशाळेने त्यांना नवसंजीवनी दिली. आपल्याला अभिनय आवडतो, हे उमगल्यावर त्यांनी या क्षेत्रातच करिअर करण्याचे ठरवले.

२००६मध्ये वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ नाटकात पहिल्यांदा काम केले. मात्र त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेशासाठी बराच संघर्ष करावा लागला. अनेक चित्रपटात छोट्या-छोट्या भूमिका केल्या. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘आयना का बायना’ अशा काही चित्रपटांत कामे केली. या संघर्षादरम्यान त्यांची नागराज मंजुळेंशी भेट झाली.

मंजुळेंनी त्यांना ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील भूमिका ऑफर केली. याच चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यानंतर मंजुळेंच्या अनेक चित्रपटांत कामे केली. विशेषतः ‘सैराट’मधील त्यांच्या भूमिकेला समीक्षक आणि रसिकांची पसंती मिळाली. रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटातल्या आव्हानात्मक भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.

छाया कदम यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका साकारल्या. ‘सिंघम रिटर्न’मध्ये छोट्याशा प्रसंगात काम केले होते. त्यानंतर ‘झुंड’ या मंजुळे यांच्याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह काम केले, तसेच ‘अंधाधुन’, ‘अंतिम’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांतही भूमिका साकारल्या.

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’मधील मंजूमाईच्या भूमिकेसाठी छाया यांचे भरभरून कौतुक झाले. ‘मडगाव एक्सप्रेस’मधील त्यांची आगळीवेगळी भूमिकाही रसिकांना भावली. चतुरस्र आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आपले स्थान छाया यांनी निर्माण केले आहे.

खडतर संघर्षातून मिळवलेल्या यशानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा कायम आहे. ‘कान’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील त्यांचा मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेतील वावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरेच सांगून जातो.

कान चित्रपट महोत्सवातच अजून एका भारतीय महिलेच्या कामगिरीची चर्चा झाली, ती म्हणजे पायल कपाडिया. प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिलेल्या ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ हा चित्रपट पायल यांनीच दिग्दर्शित केलेला होता.

विशेष म्हणजे या चित्रपटाला मुख्य स्पर्धेतील ज्युरी प्राइज म्हणजेच ग्रांपी पुरस्कारही (Grand Prix) मिळाला. हा चित्रपट केरळातून मुंबईत आलेल्या परिचारिकांच्या आयुष्यावर आहे. तीन महिला आणि त्यांच्यातील मैत्रीची गोष्ट पायल यांनी त्यात मांडली आहे.

त्यांनी पुरस्कार स्वीकारताना मंचावर चित्रपटातील तिन्ही अभिनेत्रींना नेत ही मैत्री केवळ पडद्यावरची नाही, तर पडद्यामागचीसुद्धा आहे, हे सिद्ध केले. प्रसिद्ध कलाकार नलिनी मलानी यांची मुलगी असलेल्या पायल यांचा जन्म मुंबईतलाच.

आंध्र प्रदेशातील शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईत सेंट झेवियर महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून (एफटीआयआय) चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी २०१५ मध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या संस्थेच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्वही पायल यांनी काही काळ केले. प्रशासनाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केली होती.

२०२२ मध्ये पायल यांनी या आंदोलनावरील माहितीपट तयार करून प्रदर्शित केला होता. यापूर्वी २०१७ मध्येही त्यांच्या ‘आफ्टरनून क्लाउड्स’ या लघुपटाची कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT