संपादकीय

ढिंग टांग : पहले सरकार, फिर..!

ब्रिटिश नंदी

चि. विक्रमादित्य : (घाईघाईने दार ढकलून आत येत) हे देअर, बॅब्स..! मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (सावध होत) नको! मला थोडा आराम करू दे रे! खूप दगदग झालीये, गेल्या दोन आठवड्यांत!

विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून) नथिंग डुइंग! आपलं ठरलंय ना? तुम्ही अजून बॅगा नाही भरल्यात?

उधोजीसाहेब : (कसोशीने संयम पाळत) मी कुठे जावं असं तुला वाटतं?

विक्रमादित्य : (उत्साहाने) आपल्याला जायचंय ना?

उधोजीसाहेब : (कटकटलेल्या मुद्रेने) कुठ्‌ठेही जायचं नाही आता! मी दमलोय! एवढी धावपळ उभ्या आयुष्यात झाली नव्हती! या हॉटेलातून त्या हॉटेलात, या बांधावरून त्या बांधावर...असं सतत चाललंय! किती त्या बैठकी, किती त्या पत्रकार परिषदा किती ते दौरे, किती ती भाषणं...छे, जीव विटला नुसता! 

विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) हाहा!! फाइव्ह स्टार हॉटेल टु डायरेक्‍ट शेताचा बांध!!...कसं काय जमतं हो तुम्हाला बॅब्स!

उधोजीसाहेब : (गंभीर सुरात) वेळ आली की जमवावं लागतं!

विक्रमादित्य : (निरागसपणे) आपण आक्रमक आहोत ना?

उधोजीसाहेब : (उसळून) हे काय विचारणं झालं? अर्थात आपण आक्रमक आहोत, नुसतचे आक्रमक नाही, तर लढवय्येदेखील आहोत! गेले काही दिवस उभा महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा पाहून पाची बोटे तोंडात घालून बघतोय! सत्य आणि स्वाभिमान हाच आपला बाणा आहे! अपने कुल की रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई...समझे? आपल्या या बाण्यामुळेच विरोधकांचं धाबं दणाणलं आहे!!

विक्रमादित्य : (उत्सुकतेनं) विरोधक म्हणजे काँग्रेसवाले ना?

उधोजीसाहेब : (आवाज खाली आणत) अरे हळू बोल! ऐकेल ना कुणीतरी!

विक्रमादित्य : (च्याटंच्याट पडत) म्हंजे आता ते आपले विरोधक नाहीत?

उधोजीसाहेब : (गुळमुळीतपणे) ते...ते...ते अजून ठरायचंय!

विक्रमादित्य : (मूळ विषयावर येत) ते जाऊ दे! तुम्ही बॅगा भरायला घ्या बरं! आपल्याला निघायचं आहे ना?

उधोजीसाहेब : (कंटाळून) कुठे जायचंय आता?

विक्रमादित्य : (धनुष्यातून बाण मारल्याची ॲक्‍शन करत) चलो, अयोध्या! पुढल्या आठवड्यात आपल्याला निघायचंय! हो ना?

उधोजीसाहेब : (गडबडीने) अरे हळू बोल ना!! 

विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालत) का? तुम्ही जाहीर पत्रकार परिषदेत शब्द दिला होता की आम्ही २४ तारखेला अयोध्येला जाणार आहोत म्हणून!! आख्ख्या दुनियेला माहीत आहे की तुम्ही अयोध्येला जायला निघणार आहात ते!! आता शब्द का फिरवता?

उधोजीसाहेब : (दात ओठ खात)...गप्प बसायला काय घेशील!

विक्रमादित्य : (मोठ्यांदा) ते काही नाही! आपण अयोध्येला जायचं म्हंजे जायचंच! मी माझ्या मित्रांना सांगून टाकलंय तसं!! एकदा शब्द दिला म्हंजे दिला!! शब्द मोडायला आपण काय ते ‘हे’ आहोत?

उधोजीसाहेब : (समजूत घालत) जाऊ, जाऊ! पण जरा सबुरीनं!! आपण आत्ताच अयोध्येला गेलो तर...तर...बाण चुकेल!! पहले सरकार, फिर मंदिर!! समजलं?

विक्रमादित्य : (गोंधळून) म्हंजे?

उधोजीसाहेब : (गालातल्या गालात हसत) अरे, ओल्या दुष्काळाने उद्‌ध्वस्त झालेल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण आपली सहल पोस्टपोन नाही का करू शकत? जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT