संपादकीय

ढिंग टांग! : तळीरामाचे मनोगत! 

ब्रिटिश नंदी

समस्त आर्यमदिरा मंडळाच्या सदस्यांनो, सर्वप्रथम सर्वांना ह्या तळीरामाचा साष्टांग नमस्कार. सदैव "आडव्या' असलेल्या ह्या तळीरामाला साष्टांग नमस्कारच अधिक सोपा जातो, म्हणून थेट साष्टांग प्रणिपातच घातलेला बरा. दोन पायावर उभे राहून खाली वाकताना झोकांडी जाऊन जायबंदी होण्याची शक्‍यता त्यामुळे टळतेच, शिवाय बहुमोल असा वेळदेखील वाचतो! 

आपल्या आर्यमदिरा मंडळाचा संस्थापक ह्या नात्याने मी एक आनंदाची बातमी आपणांस देण्यासाठी हे टिपण काढतो आहे. माझ्या मेजमित्रांनो, आपल्या आर्यमदिरा मंडळाने दिलेल्या अहर्निश लढ्याला आता यश येत आहे. आता दारुड्यांच्या संस्थेच्या नामाभिधानात "आर्य' हा काहीसा "प्रौढ' शब्द आल्याने भगीरथसदृश काही तथाकथित सभ्य गृहस्थांच्या अंगावर शहारा येईल. परंतु, नुसत्या शब्दाशी अशी सलगी केल्याने मद्यपानास महत्त्व ते कसे येणार? मोठमोठाल्या पवित्र गोष्टीत शोभणारे शब्द अशा भलत्यासलत्या कामासाठी वापरल्याने, त्या गोष्टींची पवित्रता थोडीच कमी होणार आहे? शिमग्यातल्या शिव्यांनी थोरामोठ्यांची किंमत कमी होत नाही आणि चोरापोरांची किंमत वाढत नाही. 

ते काहीही असो, अमृतमय मदिरेच्या घोटाघोटासाठी आपल्यापैकी अनेकांनी अक्षरश: "झोंकून' काम केले, त्याला आता मधुर फळे येत आहेत. मद्यपान हे बव्हंशी हलक्‍या लोकांच्या हाती गेल्यामुळे संभावित समाजाकडून दारूची जी हेटाळणी होते, ती बंद व्हावी. मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं, हाच ह्या मंडळींचा उद्देश होता व आहे. ड्राय डेचे उच्चाटन ही त्याची पहिली पायरी असावयास काही हरकत नाही. 

अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्रदेशात गेली अनेक वर्षे ड्राय डेचे अकारण अवडंबर माजले होते. ऊठसूट ड्राय डे घोषित करून बिचाऱ्या मदिरासक्‍तांची मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारने भविष्यकाळात ड्राय डेची संख्या कमी करण्याचे धोरण आखायचे ठरवले आहे. माझ्या मद्यसवंगड्यांनो, सरकारने (अडखळत का होई ना, पण) उचललेल्या ह्या पावलाचे आपण स्वागत केले पाहिजे. 

'ड्राय डे' म्हणजे मद्यविक्री-खरेदीला प्रत्यवाय करणारा दिवस. अर्थात ह्या दिवशी मद्यसेवनावर मात्र बंदी नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू होय. तथापि, ड्राय डेच्या दिवशी सर्वच्या सर्व मदिरालये बंद ठेवण्याचा परिपाठ आहे. निवडक सणासुदीच्या दिवशी आणि सामाजिक जयंत्या-पुण्यतिथ्यांना व्रतस्थ राहण्याचा हा उदात्त पायंडा कोणी पाडला कोण जाणे! परंतु, ज्याने कोणी पाडला, त्याला सांगावेसे वाटते, की ""तुम्ही एकच प्याला घ्याच आणखी...म्हणजे तुमच्या जिभेवरून हे उदात्त वगैरे शब्द धुऊन जातील...'' 

ड्राय डेमुळे उत्पादक शुल्कादी करांचा भरणा कमी झाल्याने मायबाप सरकारास तोट्याशी सामना करावा लागतो. त्यामुळे मायबाप सरकारच्या तिजोरीतील बराचसा खण कोरडाच राहातो. ह्याचा अर्थ आम्हा मद्यप्यांमुळे ह्या राज्याचा गाडा विनासायास चालतो, हे आमचे महत्कार्य नव्हे काय? किंबहुना, मद्यपी हाच खरा राज्याचा तारणहार आहे, असे म्हटले तर त्यास बरळणे कसे म्हणावे? 

शहरोशहरी, गावोगावी ड्राय डेचा फतवा काढून कलेक्‍टरसाहेब काय मिळवतात? असा गंभीर आक्षेप आमच्या मदिरामंडळाच्या अध्वर्यूंनी घेतला, पण मायबाप सरकारची धुंदी कशी ती उतरत नव्हती. इलेक्‍शनची धुळवड संपता संपता मायबाप सरकारने ड्राय डेचा फास थोडा सैल केला हेही नसे थोडके. सरकारच्या ह्या निर्णयामागे आगामी विधानसभा निवडणुकांची नांदी असेल का? अशी शंका काही शुद्धीवरील लोकांच्या मनीं डोकावत असेल तर आम्ही त्यांस इतकेच म्हणू की, ""अय कंबख्त, अब तक तूने पीही नही!'' 

...नशा फक्‍त मदिरेची नसते, भगीरथ! त्याहूनही मोठी नशा खुर्चीची असते..! चांगभलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT