संपादकीय

सोनूचा भरोसा!   (एक पत्रापत्री...) (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

ख्यातनाम गायिका आर्जे मलिश्‍का ह्यांच्या ‘मुंबाऽऽइ, तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ ह्या मुंबैगीताच्या तालावर मुंबईतील अवघी तरुणाई टाळ्या वाजवत नाचत असल्याचे दृश्‍य पाहून सारे जग थक्‍क झाले असले, तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे! तरुणाई टाळ्या वाजवत नसून डास मारत आहे, हे कोणाच्या लक्षात येणार आहे की नाही? आर्जे मलिश्‍का ह्यांनी आपल्या अजरामर गीतातून विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर अर्थातच ‘होय’ असे आहे. आर्जे मलिश्‍का ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर आम्ही काही नामचीन व संबंधित मुंबईकरांचा पत्रव्यवहार येथे प्रसिद्ध करत आहो. काही पत्रांना आम्हांस प्रसिद्धी देणे प्रशस्त वाटले नाही. तेव्हा कृपया वाचा :
रामराव जनार्दन (आरजे) मलिश्‍का यांस,
 

विषय : आपल्या घरात डेंगू मच्छरांच्या आळ्या सापडणेबाबत.
महोदया,

बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निरीक्षकांच्या निदर्शनास आले आहे, की आपल्या निवासी सदनिकेतील एका दालनातील उजव्या कोपऱ्यातील कुंडीत पाण्याची साठवणूक आढळली असून, त्यात डेंगू डासांच्या आळ्या सापडल्या आहेत. घरातल्या घरात असे किडे करणे बेकायदा असून, पालिका अधिनियमान्वये आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? ह्याचा चोवीस तासांत खुलासा करावा. 

आरोग्य अधिकारी. बाळासाहेब डासमारे, बृ.मु.पा.

वि. सू : कुत्रा पाळला तरी पालिकेत रजिस्टर करावा लागतो. तुम्ही डास पाळता, हा गुन्हा आहे!!
* * *
डिअर मि. डासमारे,
मी सद्या न्यूयॉर्कमध्ये असून परत आली की डास मारीन...आय मीन खुलासा करीन. आपकी अपनी. मलिश्‍का.
वि. सू. : माझा बीएमसीवर भरोसा हाय हो!!
* * *

डिअरम डिअर उधोजीसाएब यांशी सोनूचे लाख लाख दंडौत. लेटर लिहिन्यास कारन का की माझे नाव सोनू हाहे व सद्या माझे णाव व्हाट्‌सापवर फेमस झाले हाहे. ‘सोनू तुझा माह्यावर भरोसा नाय काय?’ हे गाने आपन आईकलेच असेल. त्या गान्यातली सोनू मीच!! आरजे मलिश्‍का हिने माझ्या गान्याच्यावर आनखी एक गाने केले व माझी बदणामी केली, असा माझा आरोप हाहे. ‘‘मुंबऽऽय, तुझा बीएमशीवर भरोसा नाय का?’’ हे तिचे गाने एकदम बोगस व बंडल व दोन नंबरचे हाहे. ज्या बाईच्या घरात डेंगूच्या आळ्या सापडतात, अशा लोकांचे गाने रेडूवर वाजवू नए, अशी आर्डर आपन आर्जंटमधे काढावी, ही रिक्‍वेष्ट हाहे.
आपकी अपनी. सोनू (म्हात्रे चाळ, खोली नंबर दोन, झारिवली, जि. ठाने.)
* * *
श्री. नानासाहेब फडणवीस,
कुण्या आर्जे मलिश्‍का नावाच्या एका गायिकेने मुंबई महापालिकेच्या कारभारावर कोरडे ओढणारे एक बंडल गाणे तयार करून त्याचा अत्यंत खुबीने प्रसार चालवला आहे. हे काय चालले आहे? पालिकेच्या स्वच्छ, पारदर्शक कारभारावर टीका करण्याचा हा प्रकार आम्हाला नवा नाही; पण ह्यातून सचोटीने लोकांची कामे करणाऱ्या पालिकेची नाहक बदनामी होते, हे कोणी लक्षात घेईल का? सदर गाण्याचा कॉपीराइट मुळात कुण्या झारिवलीच्या श्रीमती सोनू ह्यांच्याकडे असून आर्जे मलिश्‍का ह्यांनी कॉपीराइट कायद्याचाही भंग केला आहे.

आर्जे मलिश्‍का ह्यांचा बोलविता धनी कोण? हे आम्ही चांगले जाणतो. हा प्रकार लौकरात लौकर थांबला नाही, तर तुमच्या राहत्या ‘वर्षा’ बंगल्यावर आरोग्य विभागाचे पथक पाठवून कुंडीतील डेंगू डासाच्या आळ्या शोधण्यात येतील, हे बरे जाणून असा. कळावे. उधोजी.
ता. क. : डेंगूच्या डासांपेक्षा राजकारण घातक असते!!. उ.ठा.
* * *
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब,

यूटीऽऽऽ तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय? अधिक संपर्कासाठी गाठा : आशिषराव शेलारमामा (कमळवाले). 
तुमचाच नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT