Bharat 6G
Bharat 6G sakal
संपादकीय

भाष्य : सहाव्या ‘उडी’चे स्वप्न नि वास्तव

सकाळ वृत्तसेवा

‘सिक्स-जी’ तंत्रज्ञानाचा भविष्यवेधी आराखडा केंद्रीय दूरसंचार खात्याने तयार केला आहे.

- डॉ. अजित कानिटकर

‘सिक्स-जी’ तंत्रज्ञानाचा भविष्यवेधी आराखडा केंद्रीय दूरसंचार खात्याने तयार केला आहे. त्यात रंगवलेले चित्र सुखद असले तरी या नव्याला सामोरे जाताना जी पूर्वतयारी आवश्यक आहे, त्याची जाण ठेवली पाहिजे.

नव्या सहस्रकात (इसवी सन २००० नंतर) भारतात झालेल्या सर्वात जास्त लक्षणीय व गतिमान बदलांमध्ये दूरसंचार व संपर्क क्षेत्रातील क्रांतीचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. ‘आपण रांगेत आहात...वाट पाहा’ असे ऐकत लॅंडलाइन मिळण्यासाठी एकेकाळी ताटकळावे लागत असे, हे तरुण पिढीला अविश्वसनीय वाटेल. टंचाईतून मुबलकतेकडे तसेच ‘दूरभाष’कडून ते ‘चलभाष’कडे हा प्रवास अक्षरशः २५ वर्षांत झाला. १९९८मध्ये फक्त सुमारे २० कोटी व्यक्तींकडे संपर्काची साधने होती. तिथपासून आज देशात शंभर कोटी व्यक्तींकडे निदान एक तरी दूरसंपर्काचे साधन आहे.  ब्रॉडबँड, इंटरनेट या तंत्रज्ञानाने त्यात झपाट्याने बदल आणले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांच्या हस्ते ‘सिक्स- जी’ (६-G) अर्थात ‘सहापदरी संचार महामार्गा’चा भविष्यवेध सांगणारा धोरणात्म आराखडा देशासमोर मांडण्यात आला आहे.

पस्तीस पानांचा मुख्य मसुदा व त्यानंतर जवळपास १४०पानी पुरवण्या असे १८० पानांचे हे ‘स्वप्नचिंतन’ दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध आहे. हा दस्तावेज तयार होण्यापूर्वी सहा वेगवेगळ्या समित्यांनी जवळपास वर्षभर अभ्यास करून जे तांत्रिक अहवाल सादर केले, ते सर्व या पुरवणीत आहेत. जिज्ञासूंनी ते वाचण्यासारखे आहेत. त्यातील तंत्रज्ञानातील बारकावे सांगणे, हा लेखाचा विषय नाही. तथापि या सहापदरी महामार्गामुळे देशात व देशभराबाहेर काय काय बदल होऊ शकतात, याचा थोडक्यात आढावा घेणे सयुक्तिक होईल.

या प्रस्तावित सहापदरी गतिमान वेगवान संचार यंत्रणेच्या स्वप्नाचे सर्व भारतभर स्वागत नक्कीच होईल. या वेगवान संचारयंत्रणेमुळे सर्व देश एकत्र येण्यास मोठीच मदत होणार आहे. तरी ‘दिल्ली’ अजून बरीच लांब आहे, याचे भान ठेवावे लागेल. आताशी कुठे या क्षेत्रातील उद्योग ‘पाच-जी’च्या कामाला कोठेतरी सुरुवात करत आहेत. ‘पाच-जी’च्या अंमलबजावणीसाठी टॉवरचे जाळे, केबलिंग, त्यासाठीची पायाभूत संरचना उभी करण्याचे दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे काम आत्ताशी कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे नवी रूपरेखा आखताना आत्ताचे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. तंत्रज्ञानाचा नवा महामार्ग नव्या अपघातांना निमंत्रण देणार नाही, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी लोकशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.  महामार्ग जितका रुंद होईल तितकी वाहनांची संख्या वाढेल; पण बेदरकारपणातून वाढते अपघात होतील, हे जसे रस्त्याच्या बाबतीत लागू होते, तेवढेच ते दूरसंचारयंत्रणेच्या या विस्तारित महामार्गालाही लागू आहे.

मध्यंतरी एका सर्वेक्षणात आढळले होते की, सर्वसाधारण भारतीय दररोज सरासरी सहा तासांहून अधिक वेळ या ‘संचारमार्गा’वर असतात, म्हणजेच ‘सेल फोन’चा वापर करतात. सहा तासांचा दिवसातील कालावधी हा खूप मोठा आहे. दुसऱ्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले होते की, अगदी शालेय वयापासूनच शहरांमध्येच नव्हे तर खेडेगावातही अनेक घरांमध्ये मुले मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. ही व्यसनाधीनता `सेल फोन’च्या वापराची आहे. लोकशिक्षण हवे ते या वापराच्या बाबतीत. खरे व खोटे नक्की काय, करमणूक व शिक्षण यातील सीमारेषा कोणती, खरे विद्यापीठ व ‘व्हाट्सअप’चे आभासी विद्यापीठ कोणते, याचे तारतम्य कमी होत आहे.

या नव्या सहाव्या पिढीच्या तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या जीवन व उपजीविकेमध्ये सकारात्मक बदल होतील, असे मसुद्यात म्हटले आहे. ‘स्मार्ट’,‘इंटेलिजन्ट’ असेही शब्द वापरात आले आहेत. एकूण या सर्वच तंत्रज्ञानामुळे रोजगार, शिक्षण, आरोग्य, देशाचे संरक्षण अशा अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक बदल होतील, असे सुखद चित्र या मसुद्यात रेखाटले आहे. सहाव्या पिढीचे हे स्वप्नरंजन एक प्रकारे आश्वासक व भविष्यवेधी आहे, यात शंका नाही. दरवेळेसच कोणीतरी पुढे जायचे आणि मग आपण कसेबसे त्याला गाठायचे या वृत्तीच्या पलीकडे जाऊन स्वतःहून पुढच्या दहा वर्षांत काय घडायला हवे, याचे चित्र मांडणे हे स्वागतार्हच आहे. पण तिथेच न थांबता पूर्वतयारीचा ठोस कृतिकार्यक्रम महत्त्वाचा असेल.

या सर्व तंत्रज्ञानामुळे समाजात, कुटुंबात व व्यक्तीच्या आयुष्यात फक्त आमूलाग्र व सकारात्मक बदलच होतील, हे मात्र निव्वळ स्वप्नरंजन वाटते. त्याला वास्तवाचा किती आधार आहे, हा प्रश्न पडतो. या मसुद्यात ‘स्मार्ट सिटी कनेक्टेड फॅमिली’ज असे परवलीचे शब्द आले आहेत. आपल्या शहराच्या ‘स्मार्ट सिटी’चे केविलवाणे रूप आपण बघतो आहोत. त्यावर कितीही  पिढ्यांचे पुढचे तंत्रज्ञान आले तरी मुळातील सवयी बदलल्याशिवाय शहराची विद्रूप अवस्था बदलणार नाही, याची अनेकांना मनापासून खात्री आहे. ‘व्हेरिएबल डिव्हाइसेस’ मनगटावर आणि शहरात शरीराच्या अवयवांवर घालणारी यंत्रसामग्री आली तरी माणसा-माणसांमधला संवाद, व्यक्तींचा कुटुंबातला संवाद आणि व्यक्ती आणि समाज यामधील असणारा आत्मभाव हा कोणत्याही तंत्रज्ञानाने बळकट करता येईल, असे नाही.

नवी जोडणी, नव्या दऱ्या

नवीन तंत्रज्ञान जसे जोडते तसे आणखी नवीन दऱ्याही निर्माण करू शकते. कोरोना काळात ‘स्मार्ट स्कूल’ असा गाजावाजा होत असताना उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन संपर्क स्थापित होऊ शकतो का, याची वाट पाहणाऱ्या गावातील मुलींचेही चित्र डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. डिजिटल डिव्हाईड ही ‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यामधील नवी कुंपणरेषा ठरते आहे. ‘आयओटी’, ‘डिजिटल ट्विन्स’असे एकीकडे निर्माण होणारे वास्तव या धोरणात आकर्षक पद्धतीने मांडले आहे; पण त्याचबरोबर या स्वप्नापासून अनेक शतके अजूनही लांब असणाऱ्या बहुसंख्य समाजगटाचे वास्तव काहीसे विसरले गेले आहे.

येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत हा मसुदा ॲफोर्डेबल-किफायतशीर, ॲक्सेसिबल- सर्वांना उपलब्ध होणारे, आणि इन्शुरन्स- गुणवत्तेची विश्वासार्हता अशा शब्दांची पखरण करतो खरा; पण नेमक्या याच बाबतीत नीट देखरेख ठेवण्याची गरज आहे. याचे कारण अनेकदा अशा प्रकारचे गुलाबी चित्र सुरवातीला रंगवले जाते, परंतु तंत्रज्ञान नंतर इतके महागडे होत जाते की, सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहात नाही. या अहवालातील आणखी एक महत्त्वाचा भाग असा, की दूरसंचार क्षेत्रातील ही सहावी ‘उडी’ मारताना उद्योजक, नवउद्योजक, शिक्षणसंस्था, सरकार यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता तो मांडतो. हे महत्त्वाचे आहे, याचे कारण आपल्या नोकरशाहीत कप्पेबंद काम करण्याची सवय वर्षानुवर्षांच्या सवयीमुळे अंगी मुरली आहे. त्यामुळे मसुद्यातील हा सुविचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, हे महत्त्वाचे ठरेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळींना ‘सायलोस’ (बंदिस्त जगात) काम करण्याची सवय सोडावी लागेल.

सहाव्या पिढीचे तंत्रज्ञान आपल्या समाजात आल्यानंतर समाज, मूल्यव्यवस्था, शिक्षण, मनोरंजन, तंत्रज्ञान  या सगळ्यावर त्याचा काय परिणाम आणि दुष्परिणाम होतो, याकडेही बारकाईने आत्ताच लक्ष ठेवावे लागेल. तंत्रज्ञानानेच आपल्या समाजाचे किंवा बहुतांशी सामाजिक प्रश्न सुटतील, हा भाबडा आशावाद निदान काही काळ बाजूला ठेवून तंत्रज्ञांच्या बरोबरीने समाजाविषयी चिंता करणारे तज्ज्ञ यांनी या मसुद्याचा सखोल अभ्यास करून त्याची दुसरी बाजूही उघडून दाखवणे आवश्यक आहे. ‘तंत्रज्ञान शाप का वरदान’ हा आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी एक  निबंधापुरता विषय असायचा. पण आता तो जगण्याचा प्रश्न झाला आहे. त्यामुळेच येऊ घातलेल्या नव्या व आकर्षक जगामध्ये चुणचुणीतपणा असलेल्यांना मागणी असेल; पण तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला चांगले जगण्यासाठी करायचा आहे, ही दृष्टी देणाऱ्या ‘जीवनविज्ञाना’ची अधिक गरज आहे. आभासी जगातून प्रत्यक्ष जगात जगण्याचा, फुलण्याचा मार्ग आणखी प्रशस्त करणारे जीवनविज्ञान कसे आत्मसात करता येईल, याचाही भविष्यवेध घ्यायला हवा.

(लेखक सामाजिक व विकास क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT