संपादकीय

संशोधन - उद्योग सहकार्याचे नवे पर्व

डॉ. अरविंद नातू

उद्योग आणि शिक्षण-संशोधन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणारी, मोठा वाव असणारी व परिणामकारक संवाद घडवून आणणारी यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उद्योग आणि शैक्षणिक-संशोधन संस्था यांच्या सहकार्यामध्ये नवीन पर्व सुरू होईल, अशी आशा आहे. 

उद्योगधंदे आणि शिक्षणयसंशोधन संस्था यांचे सहकार्य हा असा एक विषय आहे, की त्याची गरज आणि अंमलबजावणी तत्त्वत: तर सर्वांनाच मान्य असते. मात्र, ती प्रत्यक्षात उतरवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अर्थात, काही सन्माननीय अपवाद वगळता. असे का, याची कारणमीमांसा करण्याचे हे स्थळ नाही. पण, एका मुद्द्याचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. हे संबंध सामान्यत: दाता उद्योग आणि घेणारी शिक्षण/संशोधन संस्था याच पातळीवर राहिले आहेत. याचे मूळ कारण आपल्या अभ्यासक्रमात उद्योजकता, कौशल्यविकास या संकल्पनांना थारा नव्हताच, आपले ‘मेंटल ओरिएंटेशन’ही तसे नव्हते. आता मात्र काही प्रमाणात हे चित्र बदलत आहे. देवाणघेवाण स्वरूपाच्या काही नवीन संकल्पनांचा उदय होतोय. त्यात प्रायोजित भागीदारीत संशोधन प्रकल्पांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. उद्योजकांचा शिक्षक म्हणून सहभाग किंवा शिक्षकांचे उद्योगातील अनुभवग्रहण, संयुक्‍त अभ्यासक्रम किंवा संशोधक विद्यार्थ्यांचे या दोन्ही आस्थापनांत संयुक्‍त संशोधन, अशा अनेक आदान-प्रदान पद्धतींचा सध्या जागतिक पातळीवर सर्रास, तर भारतीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. मात्र, त्याचा अपेक्षित असा उपयोग समाजाला होताना दिसत नाही. एका बाजूला आपल्याकडे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक/संशोधन संस्था आहेत, तर दुसरीकडे मोठे उद्योगधंदे आहेत. मग अपेक्षित परिणाम का दिसत नाही, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सहा शहरांची निवड करण्यात आली असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. ‘सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्‍लस्टर’ असे नामाभिधान असलेत्या या प्रकल्पामुळे उद्योग व शैक्षणिक/संशोधन संस्था यांच्या सहकार्यामध्ये नवीन पर्व सुरू होईल, अशी आशा आहे. 

प्रत्यक्ष प्रकल्पाकडे वळण्याच्या अगोदर पुणे केंद्रात किती आशादायक परिस्थिती आहे आणि भावी काळात किती मोठी क्षमता निर्माण होण्याची शक्‍यता आहे, हे तपासून पाहणे योग्य ठरेल. टाटा मर्सिडीस, फोक्‍सवॅगन, किर्लोस्कर, भारत फोर्ज, सिरम इन्स्टिट्यूट आदी जागतिक पातळीवर उत्पादने विकणारे उद्योग येथे आहेत, तसेच अनेक छोटे-मोठे उद्योगही जागतिक स्पर्धांना यशस्वीपणे तोंड देत आपली उत्पादने जगात विकत आहेत. आयुका, एनसीआरए, एनसीएल, आयआयटीएम, डीआरडीओ, एनसीसीएस, आयसर अशा जागतिक दर्जाच्या संशोधन संस्था पुण्यात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या अग्रगण्य संस्थेबरोबरच अनेक स्वायत्त/खासगी विद्यापीठे आणि शंभरावर महाविद्यालये आहेत. या सर्व संस्था आपापल्या परीने उद्योग-संशोधन सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेतच. मग एवढी अनुकूल परिस्थिती असूनही एकत्रित परिणाम का साधला जात नाही? कारण, या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणणारी, मोठा वाव असणारी व परिणामकारक संवाद घडवून आणणारी यंत्रणाच नव्हती, ती उणीव नव्या व्यासपीठातून भरून काढण्याचा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारने पुणे, भुवनेश्‍वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे पहिल्या टप्प्यात ही केंद्रे सुरू करण्याचे ठरविले आहे. प्राधान्याने हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाकडून संचालित होणार असल्याने त्याच्या कामाच्या वेगावर लाल फितीचा परिणाम होणार नाही. प्रत्येक केंद्राला एक ‘सीईओ’ असेल आणि तो सर्व घटकांकडून निवडला जाईल. दैनंदिन कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी हे त्याचे प्रमुख काम असेल. पुण्यातील सर्व शिक्षण संस्था, उद्योजक, संशोधन प्रयोगशाळा हे या केंद्राचे प्रमुख भागीदार असतील. हे सर्व घटक एकत्र येऊन पुणे केंद्राचे संकल्पना टिपण तयार करतील आणि त्यात पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येईल. चंडीगड, भुवनेश्‍वरने तशी सुरवातही केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकाराने पुण्यातही ‘श्रीगणेशा’ झाला आहे. उद्योग व शिक्षण/संशोधन क्षेत्राच्या गरजा समजावून घेऊन आपल्याकडे असलेले ज्ञानभांडार (मिशन, व्हिजन, संशोधन आणि अन्य प्रकल्प वगैरे स्वरूपातील) खुले केले जाईल. भावी काळात भेडसावणाऱ्या समस्यांचा इथे ऊहापोह होईल आणि त्यावरच्या उपायांचीही चर्चा होईल. शास्त्रीय विषयांखेरीज सामाजिक समस्यांवरही शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारविमर्श होईल. उदा. ः पुण्यातील पूरस्थिती कशी टाळता येईल? महापालिका आयुक्‍त, विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी यासारखे उच्च्पदस्थ अधिकारीही या व्यासपीठाचे सदस्य असतील. थोडक्‍यात, एकमेकांकडे असलेले ज्ञान/माहितीची देवाणघेवाण केल्याने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संयुक्‍त प्रकल्पांमुळे समाजोपयोगी संशोधनाला चालना मिळेल. एखाद्या उद्योगाला सतावणाऱ्या समस्येची उकल एखादी संशोधन संस्था करू शकेल. याउलट संशोधकांना उद्योगांतील सुविधा वापरता येतील. तसेच, त्यांनी विकसित केलेल्या संशोधनाची चाचणी आणि व्यावसायिक वापर उद्योगात करून पाहता येईल, पेटंटरूपी ज्ञानभांडार खुले होईल आणि यातूनच भावी उद्योजक निर्माण होतील. उद्योग-शिक्षण-संशोधन या बलशाली साखळीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्‍य होईल. एकदा हा टप्पा पार पडला, की स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांना भाग घेता येईल व जागतिक बॅंकेसारख्या वित्त संस्थांकडून अर्थसाह्यही मिळविता येईल. आपल्या शहरातील विशाल ज्ञानभांडार आणि वित्तीय संसाधने एकाच व्यासपीठावर आणण्याचा आणि त्यांच्या परस्परसहकार्याचा हा प्रयोग आहे. जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमटावयाचा असेल, तर आता वेगवेगळे काम करून चालणार नाही. ‘एकमेकां सहाय करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार या व्यासपाठीच्या सहकार्यातूनच समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांची उकल करणे सुलभ होईल. उदा. ः कचरा व्यवस्थापन, पाण्याची साठवण आणि पुनर्वापर, वाहतूक कोंडी अशा अनेक गोष्टींचे सुलभीकरण सरकारी/नागरी व्यवस्थापनाद्वारे करता येईल.

या पुढचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे कार्यरत असलेल्या केंद्रांना एकत्र आणण्यासाठी ‘स्टेम’सारखे वेबपोर्टल करून त्याद्वारे राष्ट्रीय व्यासपीठ तयार करणे. ज्याद्वारे आंतरकेंद्रीय देवाणघेवाणीतून देशाला तांत्रिक/सामाजिक प्रगती करता येईल. भारतातील ३५० शिक्षण/संशोधन संस्थांनी आताच त्यावर नोंदही केली आहे. याशिवाय, इनोव्हेशन हाच उद्देश असलेल्या ‘हॅकेथॉन’सारख्या कार्यक्रमाची मदत घेता येईल. पहिली तीन वर्षे या केंद्राचा खर्च वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाकडून केला जाईल. त्यामुळे घटक संस्थांना त्याची झळ लागणार नाही. त्यानंतर मात्र या केंद्रांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे अपेक्षित आहे आणि पुण्यातील सध्याची साधनसंपत्ती पाहता ते फारसे कठीण नाही.

अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे आपली सध्याची सेवाधिष्ठित अर्थव्यवस्था बदलली जाऊन ती ज्ञानाधिष्ठित होईल. या व अशाच प्रकारच्या पूरक अशा कौशल्यविकास, इनोव्हेशन हब, स्टार्टअप, इनक्‍युबेटर, व्यावसायिक तंत्रज्ञान शिक्षण अशा संकल्पनांमुळे आपला देश एक आर्थिक व तांत्रिक शक्ती म्हणून जागतिक पटलावर येईल आणि त्यायोगे समाजाचे जीवन सुलभ होईल, यात शंका नाही. विज्ञान/तंत्रज्ञानाच्या साह्याने आपले जीवन ‘सुजलाम्‌ सुफलाम्‌’ होईल आणि जागतिक स्तरावर भारताचा ध्वज अभिमानाने फडकेल. कारण विज्ञान/तंत्रज्ञानाचा मूळ उद्देशच सामाजिक गरजा भागविणे हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT