संपादकीय

भाष्य : कोविडच्या अंताची सुरुवात?

राज्यात २५ आॅक्टोबर रोजी कोविड-१९ चे ८८९ रुग्ण आढळले. ६ मे २०२०, म्हणजे तब्बल ५३८ दिवसांनंतर एका दिवसात राज्यात आढळलेले हे सर्वात कमी कोविड रुग्ण आहेत.

डॉ. प्रदीप आवटे

कोविडच्या जागतिक साथीबाबत सध्याची स्थिती पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता कमी होत आहे. कोविडच्या अंताची ही सुरुवात असल्याची आशेची चिन्हे दिसताहेत. तथापि, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळल्याशिवाय विजय मिळत नाही, हेही लक्षात ठेवावे.

राज्यात २५ आॅक्टोबर रोजी कोविड-१९ चे ८८९ रुग्ण आढळले. ६ मे २०२०, म्हणजे तब्बल ५३८ दिवसांनंतर एका दिवसात राज्यात आढळलेले हे सर्वात कमी कोविड रुग्ण आहेत. कोविडमुळे होणारे मृत्यूही घटताना दिसत आहेत. २५ आॅक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात कोविडमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. २१ एप्रिल २०२० नंतर दैनंदिन मृत्यूची ही सर्वात कमी संख्या आहे. हे केवळ महाराष्ट्रातच घडते आहे, असे नाही. देशभरात आणि एकूण आशिया खंडात कोविड रुग्णसंख्या घटत आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानात केवळ सहाशेच्या आसपास रुग्ण आणि ९ मृत्यूची नोंद झाली. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत ज्या ठिकाणी आजही दैनंदिन रुग्ण संख्या लाखावर आहे. आग्नेय आशियात मात्र ती काही हजारात आहे. युरोप, अमेरिकेपेक्षा वेगळे चित्र आशिया खंडात आहे.

या पार्श्वभूमीवर वाऱ्यावर वाहणारे हे कदंबाचे फूल (कदंबाचे फूल बरेचसे कोविड विषाणूसारखे दिसते.) नक्की कोणत्या दिशेने वाहणार, हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात आहे. कोविड महासाथीकडून (पॅंडेमिक) एन्डेमिककडे वाटचाल करतो आहे का? तिसरी लाट येणार की नाही? आपली मास्कपासून सुटका कधी होणार? असे प्रश्न मनात पुन्हा पुन्हा येत आहेत. त्यांची अचूक उत्तरे कोणाजवळही नाहीत. पण देशात आणि जगभरातल्या घडामोडी, वेगवेगळ्या देशातील कोविड परिस्थिती समजावून घेऊन तज्ज्ञांनी काढलेले निष्कर्ष यावरून आपण या प्रश्नाची अधिकाधिक बिनचूक उत्तरे शोधूया!

मृत्यूदर घटला

मुळात एखादा आजार एन्डेमिक होणे म्हणजे काय, हे आपण समजावून घेतले पाहिजे. जगभरात हा आजार एखाद्या उद्रेकासारखा आढळतोय, म्हणून आपण त्याला जगभर पसरलेली महासाथ (पँडेमिक) म्हणत आहोत. हा आजार एन्डेमिक होणे म्हणजे तो आपल्या वातावरणाचा नियमित भाग होणे आणि त्या-त्या ठिकाणच्या वातावरणानुसार तो कमी प्रमाणात पण नियमित आढळत राहणे. जसे फ्ल्यू सारखे आजार हिवाळा, पावसाळा या वातावरणात काही प्रमाणात वाढतात. क्वचित प्रसंगी स्थानिक उद्रेक होणे, याला म्हणतात एन्डेमिक होणे. आपल्याकडे हिवताप, क्षय, एचआयव्ही या सारखे आजार एन्डेमिक आहेत, हे आपण याच अर्थाने म्हणतो. सध्या कोरोना विषाणू त्या दिशेने वाटचाल करतोय का? डॉ. शाहीद जमील आणि डॉ. गगनदीप कांग यांसारख्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले तर, भारतात हा नवा विषाणू निश्चितपणे एन्डेमिक होण्याकडे वाटचाल करतो आहे. ज्या प्रकारे २००९मध्ये पॅन्डेमिक स्वरुपातला स्वाईन फ्ल्यू आता एन्डेमिक झाला आहे; अधूनमधून त्याचे काही रुग्ण कमी जास्त प्रमाणात आढळतात. त्या प्रमाणे कोविड-१९चे भारतात होते आहे, असा याचा एकूण अर्थ!

कोविडची ती बहुचर्चित तिसरी लाट येणार की नाही? आजची भारतातील सध्याची एकूण परिस्थिती पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता कमी होत आहे, असे दिसते. पण असे म्हणताना युरोपमध्ये आणि विशेषतः ब्रिटनमध्ये जे घडते आहे, त्याच्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये सध्या दररोज ४५ हजार नवे कोविड रुग्ण आढळताहेत. अगदी मागच्या आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसते. २३ आॅक्टोबरला ब्रिटनमध्ये १३५ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. ज्या देशात १८ वर्षांवरील ८७ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे आणि ज्यांच्या सिरो सर्व्हेमध्ये ९३ टक्के व्यक्तींमध्ये कोविड विरोधी अँटीबॉडीज आढळतात त्या ब्रिटनमध्ये हे घडते आहे, हे आश्चर्यकारकच आहे. अर्थात ब्रिटनमध्ये रुग्ण संख्या वाढली तरी रुग्णालयात भरतीचे प्रमाण आणि मृत्यू दरात लक्षणीय घट दिसते. जानेवारीमध्ये येथील ३० टक्के बेडस् कोविडमुळे भरलेले होते; ते प्रमाण आता सहा टक्क्यांवर उतरले आहे. मृत्यू दर १० पट घटला आहे. हा लसीकरणाचा फायदा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मग तिसऱ्या लाटेचे काय?

ब्रिटनमधील या पार्श्वभूमीवर भारतात अशी लाट पुन्हा येणार नाही किंवा आली तरी ती सौम्य स्वरुपाची असेल, हे आपण कोणत्या आधारावर म्हणतो आहोत. मुळात इंग्लंडमधील जानेवारी महिन्यातील लाट ही अल्फा व्हेरियंटमुळे होती. त्यामुळे या देशातील जनतेने डेल्टा व्हेरियंटचा सामना केलेला नव्हता. तो आता तिथे पुन्हा पुन्हा डोके वर काढतोय. या तुलनेत भारतातील आणि महाराष्ट्रातील दुसरी लाट ही युरोपपेक्षा दोन-तीन महिने उशीरा आल्याने, ती मुख्यत्वे डेल्टा व्हेरियंटमुळे आली होती. त्यामुळे आपल्याकडील खूप मोठ्या लोकसंख्येला या नव्या व्हेरियंटचा सामना करावा लागला असल्याने आपल्यामध्ये आता त्याविरोधी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे अनेक सिरो सर्व्हेमधून दिसते आहे. गेले काही महिने डेल्टा हाच प्रबळ व्हेरियंट सर्वत्र आढळत आहे. त्यामध्ये मोठे बदल दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणूमध्ये मोठा जनुकीय बदल झाला नाही, तर भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता अत्यल्प आहे.

कोविड विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये असा नवा बदल होईल की नाही, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सध्या ब्रिटनमध्ये डेल्टा वंशावळीतील (डेल्टा सबलिनिएज) नवीन विषाणू प्रकाराची चर्चा सुरू आहे आणि तो आहे - ए. वाय. ४.२ (AY4.2). हा विषाणू डेल्टा वंशातीलच, पण त्यामध्ये आणखी दोन बदल झाले आहेत; पण ते रिसेप्टार बाईडिंग डोमेन या विषाणूच्या महत्वाच्या भागातील नाहीत. तरीही मूळ डेल्टा प्रकारापेक्षा या विषाणूची प्रसार क्षमता किंचित जास्त आहे, असे ब्रिटनमधील अभ्यासातून दिसते. या विषाणूमुळे आजाराच्या तीव्रतेमध्ये कोणतीही वाढ होत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. सध्या भारतात हा नवा विषाणू प्रकार अगदी तुरळक म्हणजे १७ नमुन्यांमध्ये आढळल्याचे दिसत आहे. हा विषाणू प्रकार जैविक दृष्ट्या मूळ डेल्टा विषाणूपेक्षा फारसा वेगळा नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूण मागील काही महिन्यात विषाणूमध्ये फार महत्वाचे बदल होताना दिसत नाहीत. म्हणूनच तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे, असे तज्ज्ञ नोंदवत आहेत. अर्थात या साऱ्या विश्लेषणाला जर-तरचे जरतारी स्पाईक प्रोटिन्स आहेतच. सारे फासे मनासारखे पडले तर येत्या पाच-सहा महिन्यात कोरोना विषाणू एन्डेमिक होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला तर आपणही मास्कमुक्त होऊ शकतो, पण कोविड कमी होत आहे म्हणून निष्काळजी राहिलो तर हातात आलेली मॅच आपण गमावू देखील शकतो. शेवटच्या चेंडूपर्यंत आणि विजयाची शेवटची धाव काढेपर्यंत आपण सावध राहायला हवे.

येणाऱ्या दिवाळीत आपण कोविड निर्बंधांना अनुरुप वागायला हवे. कारण आपला निष्काळजीपणा म्हणजे विषाणूच्या प्रसाराला हातभार लावणे आणि विषाणू जेवढा अधिक पसरतो तेवढी त्यामध्ये जनुकीय बदलाची शक्यता वाढते. तेव्हा कोविड कमी होतो आहे हे दिलासादायक आहेच, पण आपण बेजबाबदार वागूनही चालणार नाही.

(लेखक सार्वजनिक आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT