dayspring
dayspring 
संपादकीय

या जगण्यावर... : पहाटकऱ्यांची आनंदवारी     

डॉ. सतीश ठिगळे

नवजात बालकाकडे दुरून पाहताच जाणवते त्याच्या पायांची अथक हालचाल. याच पायांवर पांगुळगाड्याचा आधार घेत त्याचं पहिलं पाऊल जमिनीवर पडतं. त्याबरोबरच चार भिंतींच्या बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची उपजत वृत्तीही जागृत होते. त्यानंतर हळुहळू शिक्षण, व्यवसायानिमित्त दिवसभर पायपीट चालू होणार, बालपणी मोठी वाटणारी वाट हळुहळू लहान जाणवणार आणि दगदग वाढत जाऊन ताणतणाव निर्माण होणार हे ओघानं आलंच. त्यातून हरवत जाणाऱ्या स्वास्थ्यामुळे गरज भासणार पहाटफेरीची. सुरुवातीस नकोशी वाटणारी फेरी नंतर अंगवळणी पडत निरव शांततेत पावलं उमटवत राहते. तेथे त्यांना साथ मिळते दैनंदिनीतून विस्मरणात गेलेल्या पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि तेज या पंचमहाभूतांची. त्यांच्या सहवासात नयन, नासिका, कर, कर्ण या इंद्रियांचं अस्तित्व जाणवू लागतं. नयन आहेत म्हणून रम्यता, कर्ण आहेत म्हणून मधुरता, कर आहेत म्हणून स्पर्श, नासिका म्हणून गंध आणि या साऱ्यांची अनुभूती देण्यासाठी पाऊलखुणा उमटविणारे दोन पाय. या साऱ्यांच्या सान्निध्यात लहान-मोठ्या होणाऱ्या रात्रींबरोबर उत्तरायण आणि दक्षिणायणाची जाणीव होते. सुरुवातीस संथ पडणाऱ्या पावलांची गती वाढत जाते, त्याबरोबर समन्वय साधला जातो इंद्रियांमध्ये. ही सुरुवात असते निसर्गाशी संवाद साधण्याची. सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यांबरोबर संवाद बदलत जातो. त्यातून न्हाऊन निघताना पसरणारी प्रसन्नता आणि मिळणारा आनंद टाळ-मृदंगाच्या गजरासारखा जाणवतो आणि फेरी भासू लागते वारीसमान. या वारीचा नेहमीचा मार्ग पायाखालचा. त्यावरील वळणं, झाडंझुडुपं, दिसणारे ठराविक चेहरे सर्वच आपल्याच संप्रदायाचे भासतात. परंतु कधी वेळ येणार घरापासून दूर राहण्याची. तेथेही पावले पाठ थोडीच सोडणार? पहाटेच जाग येते. खेड्यातील मुक्कामी पावलं पायवाटेने कधी शेताच्या बांधाकडे, पर्वतराजीत आडवाटेकडे वळतात, तर समुद्रकिनारी वाळूवर उमटतात. शेतात वाऱ्याबरोबर पिकांवरून तरंगत अंगावर येणारा गंध, डोंगरावरील वाऱ्याचा मृदू स्पर्श, समुद्रकिनारी लाटांशी लगट, आकाशातील चंद्रकोरीची कधी शुक्राशी जवळीक, तर कधी दुरावा, सारंच चित्तवृत्ती फुलविणारं. 

निसर्गाशी संवाद साधताना कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक विचारांना थोडंच दूर ठेवता येणार? तेही मधूनच डोकं वर काढणार. त्याबरोबर मनाची अवस्था बदलणार आणि संवादाचं स्वरूपही. त्यातून कधी चिंता, कधी संभ्रम निर्माण होणार, तर कधी आनंद. मात्र पहाटेच्या शांततेत साधलेल्या एकाग्रतेतून नकारात्मकता झटकली जाते आणि सर्जनशील विचारतरंग उद्‌भवतात.

वारीच्या परतीच्या वाटेवर उगवतीकडचे क्षितिज लालसर होत सूर्यदेव तेजाची उधळण करत वर येताना दिसणार. तेंव्हा कोठे पक्ष्यांची किलबिल, पंखांची फडफड, तर कोठे त्यांची भरारी लक्ष वेधणार. काळोखात दडलेलं झाडाझुडुपांचं सौन्दर्य, पाना-फुलांवरचे दवबिंदू, धुकं, प्राजक्ताचा सडा सारं सुखावणार. त्याचवेळी मन भानावर येऊन सुरू होणार दिनचर्येची मांडणी. अशी ही पावलांची वाटचाल. पहाटेच्या वेळी भैरवी आळविताना गायकाचे सूर त्याच्या केवळ कंठातूनच नव्हे, तर हावभावातून, नयनांमधून, श्वासातून... नसानसातून भिनत रसिकांपर्यंत पोहोचत असतात. तेथे त्याला साथ असते वाद्यवृंदाची, तद्वत पहाटपावलांना साथ मिळते ईश्वरदत्त देण्यांची. त्यांची अनुभूती घेताना पावलांगणिक रसिकतत्व आपसूक भिनत जातं आणि त्यातून मनःशांती, शरीरस्वास्थ्य सारंच जपलं जातं. अशा जपण्यातून अवघा रंग एक झाल्याची भावना पहाटकऱ्यांना स्पर्शणार आणि जगण्यावर आनंदतरंग उठविणार, नाही का?

(मार्च महिन्यातील लेखक - रविशंकर झिंगरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT