Sanen Goat 
संपादकीय

अल्पमोली बहुदुधी

आ. श्री. केतकर

महाराष्ट्रात ‘सानेन’ जातीच्या अधिक दूध देणाऱ्या शेळ्या आयात करण्यात येणार असल्याची बातमी(सकाळ: २६ फेब्रु.) वाचली. लहान शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अधिक दूध देणाऱ्या या प्रजातीमुळे फार श्रम न पडता त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकते. गाय अथवा म्हैस पाळण्यापेक्षा शेळी पाळणे ही अधिक सोपी आणि कमी खर्चिक बाब. शेळीपालनासाठी मोठी जागाही लागत नाही. तसेच गोठा वगैरेची साफसफाई हे मोठेच काम असते तेही शेळीपालनात करावे लागत नाही. शिवाय जवळपास बोकड नसेल तर वासही येत नाही. (हे मुद्दाम सांगायला हवे, याचे कारण मुख्य तक्रार ही वासाबाबतचीच असते.) महत्त्वाचे म्हणजे शेळीपालन महिला सहज करू शकतात, अगदी मुलांची काळजी घेतल्याप्रमाणे त्या शेळ्यांची काळजी घेतात.

या साऱ्या गोष्टींचा विचार करून १९८०च्या दशकात  ‘रेन’ (रूरल अ‍ॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट, नारायणगाव.) यांनी साधारण तीन वर्षांत, जवळपासच्या ३९ गावांत १५०० शेळ्यांना सानेन  संकर करून दिला होता. पालन करणाऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी शेलीपालनाचे वर्गही आयोजित केले होते. ‘आमच्याकडे चहाला दूध मिळण्याचीही मारामार  होती, पण आता आम्ही मुलांना दूध देऊनही उरलेले दूध विकून संसाराला हातभार लावू शकतो’ असे तेथे शिक्षण घेतलेल्या महिला सांगत. या अनुभवाने इतरांनाही प्रेरणा मिळत असे.

संस्थेचा गावठी वा देशी शेळ्यांचा ‘सानेन’ या जातीशी संकर करण्याच्या उपक्रमामागील विचार असा होता की, परदेशांमधून प्रत्यक्ष सानेन शेळ्या येथे आणल्या तर त्यांना येथील हवामान सोसणार नाही आणि मोठे नुकसान होईल. (अनेक प्राण्यांच्या बाबतीत असा अनुभव येतो) त्यांना मानवणाऱ्या हवामानात वाढवायचे तर प्रचंड खर्च होणार. म्हणून त्यांचा सानेन बोकडाशी संकर करून दिला तर संकरित शेळ्या पूर्वीच्या तुलनेत जास्त दूध तर देतीलच, त्याचबरोबर या हवामानात टिकून राहण्याचा गावठी शेळ्यांचा गुणही त्यांच्यात असेल. शिवाय प्रत्येक नव्या पिढीगणिक शेळ्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होत जाईल. इस्राईल किंवा अन्य परदेशातून सानेन बोकड प्रत्यक्ष आणणे तेव्हाच्या बंधनांमुळे शक्य नव्हते. समजा शक्य झाले तरी खर्च खूप आला असता. याला पर्याय म्हणून त्यांचे गोठवलेले वीर्य येथे आणून गावठी शेळ्यांना कृत्रिम रेतन पद्धतीने ते देणे. अर्थात यातही अडथळा होता. ते वीर्य अतिशीत तापमानातच ठेवावे लागते आणि त्यासाठी द्रवरूप नायट्रोजन ठेवलेल्या थर्मासमधून लवकरात लवकर ते आणावे लागले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गरिबांची गाय
जागतिक अन्न व शेती संस्था, रोम, यांच्या त्यावेळच्या (१९८३) अहवालात जगात ४९ टक्के लोक शेळीचे दूध वापरतात, असे म्हटले होते. म. गांधी यांनीही शेळीला ‘गरिबाची गाय’ म्हणून गौरवले होते. ते रास्त होते. सध्याच्या काळात धार्मिक भावनेमुळे गोवंश-हत्येला अनेक राज्यांत मनाई आहे, (त्यामुळे गायी भाकड झाल्यानंतर त्यांना सांभाळणे खर्चिक होऊन बसते). शेळीच्या बाबतीत ती अडचण नाही. शेळी जोपासण्याचा खर्च कमी. त्यामुळे गाय न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना काही शेळ्या पाळणे निश्चतच परवडेल. 

शेतकऱ्यांचा जोडधंदा
संकरित शेळीची जमेची मोठी बाब म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर दुधात करण्याची तिची क्षमता गायीपेक्षा जास्त आहे,  आणि चारापाण्याची गरज गायीच्या अन्नाच्या एक पंचमांश आहे. भारतात खुराक आणि चारा वैरणीची कमतरता असते. तेव्हा फक्त शेळीच खुराकाचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर करू शकेल. नोकराची गरज न भासता शेतकर्‍याला त्याच्या रिकाम्या वेळ शेळीच्या दूध उत्पादनासाठी उपयोगात आणता येईल. या शेळ्यांचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा आहे. शेळी जात्याच काटक असून तिच्यात रोगराई होण्याचे प्रमाण कमी.त्यामुळे धोकाही कमी. दुसरी गोष्टः शेळी बहुतेक वेळी दोन पिलांना जन्म देते. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. क्वचित दोनपेक्षाही जास्त पिले झाल्याची उदाहरणे आहेत. 

भारतात ८० टक्के शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांच्या आहारात दुधाचा समावेश नसतो. चांगली शेळी ठेवल्यास त्यांना आहारात दुधाचा समावेश करणे शक्य होईल. शेळीला फार जागा लागत नाही. घराचा आडोसाही तिला पुरतो. दोनतीन शेळ्या पाळल्यास कुटुंबाला पुरून उरलेले दूध विकता येईल. इतर जनावरांपेक्षा शेळी गाभण राहण्याचे प्रमाण जास्त असते. शेळीला शेळी (पाठ) झाल्यास दुधाचे दृष्टीने ती उपयुक्त असते आणि बोकड झाल्यास तो विकून गरजेच्या वेळी पैसे मिळवता येतात. अर्थात शेळीपालन हा छोट्या शेतकऱ्यांसाठी जोडधंदा बनू शकतो, तसेच शेतमजुर आणि बेरोजगारांनीही.

योग्य मार्गदर्शनाखाली अधिकाधिक शेतकऱ्यांनी आणि बेरोजगारांनी योग्य प्रशिक्षण घेऊन शेळीपालन केले तर त्यांनाही उत्पन्नाचे हुकमी साधन उपलब्ध होऊ शकेल. संस्थेने शेळीपालनासाठी चार पुस्तके तयार केली आहेत, ती वाचली तर तर पालनकर्त्यांचे काम आणखीच सोपे होईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT