Mrunalini-Chitale 
संपादकीय

पहाटपावलं : समजूतदार प्रवास

मृणालिनी चितळे

स्वित्झर्लंडमधील झरमॅट नावाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही आगगाडीत बसलो. झरमॅट म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. नोव्हेंबर महिना. वसंत ऋतू संपून पानगळ सुरू होण्यापूर्वीचे दिवस. खिडकीतून दिसणाऱ्या हळदीपिवळ्या रंगाच्या सूचिपर्णी वृक्षाच्या रांगा. मधेमधे असलेली मेपल्सची झाडं मात्र लाल, नारिंगी रंगाची.

झाडांपासून हाताच्या अंतरावर असलेली बर्फाच्छादित शिखरं. त्यावर तरंगणारे शुभ्रधवल ढग. स्फटिकाच्या रंगाची खळाळती नदी. सोनपावलानं नि हरणाच्या गतीनं बागडत येणारं ऊन. हिरव्यागार गवतावर रांगोळीनं रेघ ओढावी अशा ओलेत्या पाऊलवाटा टुमदार लाकडी घरांकडे घेऊन जाणाऱ्या. अनिमिष नेत्रांनी मी हे सौंदर्य निरखत होते. या दृश्‍यात व्यत्यय आला तो माझ्यासमोर बसलेल्या सहप्रवासिनीमुळं.

तिनं लॅपटॉप काढला आणि खिडकीचा पडदा ओढला. चिमूटभर ऊन तिच्या लॅपटॉपला सोसवत नव्हतं. ‘किती रूक्ष आणि अरसिक आहे ही.’ माझ्या मनात आलं. मी निमूटपणे बॅगेतून पुस्तक काढलं. पण, वाचण्यात लक्ष लागेना. मला एकदम मुळशी धरणाजवळचा प्रसंग आठवला. बोटीतून मुळा नदी ओलांडून आम्ही एका डोंगरावर जायला निघलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. पाण्यानं तुडुंब भरलेली भाताची खाचरं. त्यातून डोकावणारी पोपटी रोपं. श्रावणातील भिजपाऊस नि उन्हाचे कवडसे. डोंगररांगा आणि अथांग जलाशय कवेत घेऊ पाहणारं इंद्रधनू. चढताचढता आम्ही असंख्य वेळा थांबत होतो.

तेथील एक रहिवासी आमच्यासोबत होता. आमचं असं मधेमधे थांबणं त्याला पसंत नसावं. ‘काय सीन आहे.’ मी कितव्यांदा तरी म्हणाले. तसा तो उद्गारला, ‘तुम्हाला सीन आहे, आम्हाला मात्र शीण आहे.’ समोर पाहिलं. माझी सहप्रवासिनी आपल्या कामात मग्न होती. तिनं या मार्गानं असंख्य वेळा प्रवास केला असणार. काही मिनिटांपूर्वी मी तिला रूक्ष आणि अरसिक ठरवून टाकलं होतं. दुसऱ्याबद्दल किती पटकन मत बनवून टाकतो आपण. जजमेंटल होतो. अचानक वातावरण ढगाळ झालेलं पाहून पडदा अर्धवट उघडण्याचा मोह मला आवरता आला नाही. काही क्षणात गर्द झाडीत ऊन गडप झालं. माझ्याकडं एक समजूतदार कटाक्ष टाकून तिनं खिडकी पूर्ण उघडली. उन्हाचा कवडसा येताच मी अर्धी खिडकी बंद केली. एकाही शब्दाची देवघेव न करता, एकमेकींकडं पाहून ओठातल्या ओठात हसत, खिडकीची उघडझाप प्रवासभर चालू राहिली. प्रवास! सहजीवनाचा असो वा मुलाबाळांसोबतचा. मैत्रीच्या साकवावरून चालण्याचा वा संस्थात्मक काम करतानाचा. खिडकी बंद ठेवायची की उघडी, यावर दुसऱ्याचाही अधिकार असतो, हे मान्य केलं आणि खिडकीची उघडमिट समजुतीनं करता आली, की नेहमीच हवाहवासा वाटतो. शुभंकर नि सुकुमार ठरतो. पहाट पावलांसारखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT