editorial-articles

अग्रलेख : आधारसरी!

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या मोसमी पावसाच्या सरींचा सांगावा सुखद आहे, तो अनेक अर्थांनी. शेतकऱ्यांना तर तो दिलासा देणारा आहेच, तथापि, प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेदेखील हा एक मोठा आधार ठरेल.

नकारात्मक, निराशाजनक घटना-घडामोडींच्या गडद अंधारात क्षितिजावर लख्खकन वीज चमकून जावी आणि तिने येऊ घातलेल्या प्रकाशाची वर्दी द्यावी, असेच काहीसे भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अंदाजामुळे अनेकांना वाटले असेल. ‘कोविड’मुळे साचलेली चिंतेची काजळी, टाळेबंदीमुळे व्यवहारांवर आलेली बंधने आणि त्यातून अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना बसलेला जबर फटका या पार्श्‍वभूमीवर ही सुखद वार्ता आली. यंदाचा मोसमी पाऊस ९८ टक्क्यांहून अधिक असेल, ही शक्यता वर्तविण्यात आल्याने धोरणकर्त्यांपासून सर्वसामान्यापर्यंत प्रत्येक घटकाला हायसे वाटले असेल. सर्वात मोठा दिलासा वाटला असेल तो शेतकऱ्यांना. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेदेखील ही एक ‘लाइफलाइन’च मिळाली आहे, असे म्हणावे लागते. वास्तविक कोविडचे संकट कोसळण्याच्या आधीपासूनच आपल्याकडील औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर मरगळच होती. इतर क्षेत्रातही उत्पादन आणि मागणीतही सगळा थंडा मामला होता. कोविडनंतर ही परिस्थिती आणखीनच बिघडली. याचा परिणाम साहजिकच आर्थिक विकास दरावर झाला. पण कोणत्या क्षेत्राने बाजू सावरून धरली असेल तर ती शेती क्षेत्राने. यंदाच्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातूनही हेच वास्तव ठळकपणे समोर आले होते. येत्या काळातही शेती क्षेत्रावर आपली मोठी भिस्त असेल, हे स्पष्ट झाले आहे. सरींचा सांगावा सुखद आहे, तो याही दृष्टिकोनातून. अर्थात पावसाने केवळ सरासरी गाठणे, एवढ्यावर संतुष्ट राहता येत नाही. या पाऊसमानाचे विभागवार आणि कालावधीच्या दृष्टीने विभाजन कसे असेल, ही बाब शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. यंदाच्या अंदाजात त्याविषयीदेखील सकारात्मक नोंद आहे, हे विशेष. भारतीय हवामान विभागाने २०२१साठी जून ते सप्टेंबर या चार महिने पावसाळ्याच्या कालावधीतील पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. अंदाजात पाच टक्के कमी-अधिक शक्यता गृहीत धरण्यात येते. त्यानुसार कमीत कमी ९३ ते अधिकाधिक १०३ टक्के पाऊस या वर्षी पडणार आहे. ९४ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो. त्यानुसार देशात या वर्षी सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. कमी पावसाचे प्रमाण १४ टक्के, तर अतिवृष्टीचे प्रमाण हे केवळ पाच टक्के आहे. त्यामुळे दुष्काळ तसेच महापुराच्या शक्यताही कमी आहेत.

मागील पाच वर्षांचा हवामान अंदाज पाहिला तर २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत अंदाजापेक्षा कमी पाऊस, तर मागच्या दोन वर्षांत अंदाजापेक्षा पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. एवढेच नव्हे, तर २०१९ची अतिवृष्टी आणि २०२० मधील सततचा पाऊस आणि लांबलेल्या पावसाळ्याने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान केले आहे. पाऊस सर्वसामान्य पडला तरी मॉन्सूनचे उशिरा होणारे आगमन, पडणारे मोठे खंड, अतिवृष्टी, लांबलेला परतीचा पाऊस तर कधी पावसाने लवकरच घेतलेली माघार यांनी खरीप हंगामाचे मोठे नुकसान होते. या वर्षीच्या हवामान अंदाजाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभर विभागनिहाय कुठे कमी, कुठे सर्वसाधारण आणि कुठे अधिक पाऊस पडेल, हे नकाशाद्वारे दाखविले आहे. पावसाच्या अंदाजाबाबत पहिल्यांदाच असा नकाशा देण्यात आला आहे, हे स्वागतार्ह असले तरी तो कोणत्या अभ्यासावर अथवा मॉडेलवर आधारित आहे, हे नमूद करायला हवे होते. या नकाशानुसार देशात पाऊसमान झाले की नाही हे सष्टेंबरअखेरच कळणार आहे. सप्टेंबर अखेरनंतर ‘आयएमडी’नेच आपण दिलेला नकाशा आणि पडलेला पाऊस याची पडताळणी करावी. या मॉडेलमध्ये काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा करायला हवी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संभाव्य पावसाची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशात महाराष्ट्रात चांगला पाऊस दाखविला आहे. असे असले तरी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भाग हा निसर्गतः कमी पाऊसमानाचा आहे. तर कोकण, पूर्व विदर्भ, सह्याद्री घाट माथ्याच्या भागात नेहमीच अतिपाऊस पडतो. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला तर ते चांगलेच, पण तसे होईलच अशा भ्रमात राहता येणार नाही. अतिवृष्टी, अनावृष्टी याचे नियोजनही शेतकऱ्यांपासून सरकारपर्यंत सर्वांनाच करावे लागणार आहे. खरे तर आजही दीर्घ कालावधीसाठीचे अनेक अंदाज चुकतात, हे नाकारता येणार नाही. हवामान अंदाज दीर्घ कालावधीसाठीचा असो, मध्यम कालावधीचा असो की अल्प कालावधीचा; त्यात अचूकता आणि स्पष्टता हवी आहे. तरच शेतीचे चांगले नियोजन करून त्यातील नुकसानही कमी होईल.

निसर्गाने दिलेले दान खऱ्या अर्थाने आपल्याला लाभदायक ठरण्यासाठी मानवी प्रयत्नही आवश्यक आहेत, याचे भान विसरता कामा नये. ‘कॅच द रेन’ ही मोहीम त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. पडणारा प्रत्येक थेंब कसा वाचवता येईल, याचे सर्व प्रयत्न केवळ सरकारी पातळीवर नव्हे तर नागरिकांच्या पातळीवरही व्हावेत. ती एक लोकचळवळ व्हायला हवी. दुसरे म्हणजे नालेसफाई वगैरे कामे वेळच्या वेळी, नीटपणे केली नाहीत, तर शहरी भागांत जे काही उत्पात घडताना दिसतात, त्यामुळे चांगला पाऊस होत असतानाही काहींचे चेहरे काळजीने काळवंडलेले दिसतात. निदान यावेळी तरी हे विरोधाभासी चित्र दिसू नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे केले तरच काळ्या ढगांना लाभलेली ही रुपेरी कडा खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT