editorial-articles

अग्रलेख : गर्तेतील पाकिस्तान

सकाळवृत्तसेवा

‘यह जो दहशत गर्दी हैं, इसके पिछे वर्दी हैं...’ पाकिस्तानातील पश्‍तुन तहफूज मुव्हमेंटची ही घोषणा खरीच आहे, यावर पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये शिक्कामोर्तब झाले. मंत्री फावद चौधरी यांनी, ‘हमनें हिंदुस्थान को घुस के मारा’, अशा शब्दांत आपल्याच प्रतिनिधीगृहात सांगून एका अर्थाने या हल्ल्याची कबुलीच दिली आहे. भारताच्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर गेल्या वर्षी पुलवामाजवळ तीनशे किलो स्फोटकांनी भरलेली कार आदळवली गेली. ४० जवान हुतात्मा झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगापुढे वेगळा मुखवटा घेऊन वावरू पाहणारे पाकिस्तान सरकार आपण त्या गावचेच नाही, असा आव आणत होते. तो खोटेपणा आता उघड झाला आहे. चौधरी महाशय खरंतर सारवासारव करत होते. तथापि, बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच झाले. या हल्ल्याला सडेतोड उत्तरादाखल भारताने पाकिस्तानात घुसून त्यांच्या बालाकोटजवळील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्धवस्त केले. या मोहिमेत भारताचे मिग-२१ विमान पाकिस्तानने पाडले, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शत्रूच्या हाती पडले. पण पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष आणि पाकिस्तान मुस्लिम लिगचे (नवाज) अयाज सादिक दोन दिवसांपूर्वी सांगतात की, अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवांना घाम फुटला. पाय थरथर कापायला लागले. या विधानावर खुलासा करणाऱ्या चौधरींवर आता खुलाश्‍यांवर खुलासे करण्याची वेळ आली आहे. ‘ऑपरेशन स्विफ्ट रिसॉर्ट’ राबवत असताना जी कारवाई झाली, त्याबाबत बोलताना व्यापक अर्थाने पुलवामाचा उल्लेख केल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. 

भारताने गेल्या दशकांत पाकिस्तानचा दहशतवादामागील चेहेरा उघड केला. तथापि, न्यूयॉर्कमधील ट्‌विन टॉवर जमीनदोस्त होईपर्यंत अमेरिकेला ते तेवढ्या तीव्रतने जाणवत नव्हते. तालिबान्यांनी पाकिस्तानात मूलतत्ववाद्यांचा दहशतवाद अधिक विस्तारला. गेली दोन दशके पाकिस्तानही दहशतवादाने होरपळतोय, हे गेल्या आठवड्यातल्या हल्ल्याने सिद्ध झाले आहे. पण ही आपल्या कर्माची फळे आहेत, याची जाणीव या सरकारला झाली आहे किंवा नाही, हा प्रश्‍नच आहे. आजवर वेगवेगळ्या संस्था उभारणे, प्रगती साधणे तर दूरच, पण त्यांनी भारतद्वेषाच्या एककलमी कार्यक्रम राबवला आणि दहशतवाद- मूलतत्त्ववादाला खतपाणी घातले. यामुळे आपण गाळात जातोय, याचे भान विसरलेला पाकिस्तान आज आर्थिकदृष्ट्या कंगाल होत चालला आहे. कधी अमेरिका तर कधी चीन यांच्याकडे कटोरा घेऊन धाव घेणे या व्यतिरिक्त तिथल्या बहुतेक राज्यकर्त्यांनी काहीही केले नाही. लोकांच्या हलाखीत भरच पडत गेली. इम्रान खान यांनी तर लष्कराच्या निर्णयांना ‘मम’ म्हणण्याचे काम केले. या सगळ्यातून साचलेल्या असंतोषाची धग वाढत चालली असून विरोधक आता लष्कराविषयीही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

अकरा विरोधी पक्षांच्या क्वेट्टातील सरकारविरोधी रॅलीतही नवाज शरीफ यांनी लष्करावर टीका केली. सर्वसामान्यांच्या दैन्याला लष्कर जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नव्वदच्या दशकात भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा पाकिस्तानचे अधिक होते. आता भारताने त्यांना केव्हाच मागे टाकले आहे. संरक्षणावर  भारत‘जीडीपी’च्या अडीच तर पाकिस्तान साडेतीन टक्के खर्च करतो. फलित हे की, पाकिस्तानातील देशांतर्गत आणि परकी गुंतवणूक रोडावली. उद्योगधंदे संपले. बेरोजगारी वारेमाप वाढली. जीवनावश्‍यक वस्तू महागल्या. कर्जाचा बोजा वाढला. चीनच्या दावणीला पाकिस्तान बांधल्याने कर्ज झपाट्याने वाढत आहे. शिक्षण, आरोग्यासह कल्याणकारी योजनांवरील खर्च घटल्याने युवापिढीचे भवितव्य करपले. मुडीज, फिज, एस अँड पी यांच्यासारख्या पतमानांकन संस्था खालावत्या आर्थिक स्थितीवर भाष्य करीत असूनही पाकिस्तान सरकार उपाययोजना करत नाही. कारण ज्या लष्कराच्या मांडीवर बसून पंतप्रधानपदाची खुर्ची इम्रान खान यांनी पटकावली, त्याचे प्रमुख कमर बाजवाच अर्थकारण हाताळत आहेत.

शीतयुद्धकाळात कधी रशिया तर कधी अमेरिका यांच्या कच्छपी लागून त्यांच्या मदतीवर ते जगायचे. आता आंतरराष्ट्रीय पटावर आपले प्यादे दामटण्यासाठी पाकिस्तानला सोबत घेण्यास तुर्कस्तान, चीन आणि मलेशिया सरसावलेत. तरीदेखील सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही, या उक्तीप्रमाणे पाकिस्तान दहशतवादाला पोसतोच आहे. फायनान्शियल ॲक्‍शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) कितीदा सुचवूनही चुकलेल्या मार्गावरून पाकिस्तान माघारी फिरत नाही. उलट, भाडोत्री सैन्य देण्याचा धंदा तेजीत चालवलेला आहे. अझरबैजान यादवीने होरपळत असताना तुर्कस्तानच्या मदतीला प्रतिसैनिक बाराशे ते दीड हजार डॉलर आकारून पाकिस्तानने तिकडे कुमक धाडली आहे. एकूणच जडलेल्या सवयी सोडायला पाकिस्तान तयार नाही. पण धर्मांधतेची वाट कशी विनाशाकडे घेऊन जाते, याचे उदाहरण पाकिस्तानच्या रूपाने जगाला पहायला मिळत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT