Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
editorial-articles

अग्रलेख : छाप्यांमागील लपाछपी

सकाळ वृत्तसेवा

आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार या बाबी अत्यंत निषेधार्ह आहेत आणि सर्वसामान्य लोकांनाही त्याबाबत चीड आहे, यात शंका नाही.

आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार या बाबी अत्यंत निषेधार्ह आहेत आणि सर्वसामान्य लोकांनाही त्याबाबत चीड आहे, यात शंका नाही. मात्र या विषयाचा उपयोग करून ‘राजकीय नेमबाजी’ करण्याचा पायंडा पडला तर त्यातून मूळ विषयाचे गांभीर्यच कमी होण्याचा धोका असतो. सध्या तसे घडताना दिसत आहे. संजय राऊत यांच्या अटकेनंतर हे वास्तव आणखी प्रकर्षाने समोर आले आहे. शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले, तेव्हापासून भारतीय जनता पक्षावर सतत हल्ला चढवणारे संजय राऊत यांना केव्हाही अटक होऊ शकते, असे वातावरण गेल्या महिनाभरात उभे राहिले होते, ते त्यामुळेच. अखेर रविवारी राऊत यांच्या घरी जवळपास आठ-दहा तास चौकशी झाल्यानंतर प्रथम त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आणि मध्यरात्रीनंतर त्यांच्या अटकेची घोषणा झाल्यामुळे महाविकास आघाडीचा एक ‘आवाज’ गजाआड गेला आहे.

भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेत, महाविकास आघाडी स्थापन करण्यात राऊत यांचा मोठा वाटा होता आणि तेव्हापासूनच भाजपने त्यांना लक्ष्य केले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीमागे ‘ईडी’ची टांगती तलवार हे मोठे कारण होते, ही बाब लपून राहिलेली नव्हती. खरे तर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरातील ‘पत्रा चाळ’ पुनर्बांधणी प्रकल्पात झालेल्या मोठ्या गैरव्यवहारात राऊत यांचा सहभाग असल्याचे आरोप किरीट सोमय्या हे सातत्याने करत होते. पण त्यांचा पत्रा चाळ प्रकल्प गैरव्यवहारात हात असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेतून सिद्ध व्हावे लागेल.

मात्र, ठाकरे सरकार कोसळल्यानंतर झालेल्या राऊत यांच्या अटकेमुळे ‘ईडी’ने केलेल्या या कारवाईमागील हेतूंबाबत शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे. शिवाय, आणखी एक योगायोग असा की राऊत यांच्या घरावर ‘ईडी’ने छापा टाकला, त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘ईडी’च्या भीतीने आमच्या गटात सामील होऊ नका’, असा सल्ला शिवसेनेला दिला, तो नेमके ‘अडचणीत सापडलेले’ शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत! त्या सल्ल्याचा काय तो ‘बोध’ घेऊन मग खोतकर यांनी आपली भाषाही लगोलग बदलली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी उघडपणे दिलेल्या या सल्ल्यामुळेच केंद्राच्या अखत्यारीतील विविध तपासयंत्रणांचा वापर विरोधकांची कोंडी करण्यासाठी भाजप कसा मुक्तपणे करत आहे, हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

विरोधकांची सरकारे पाडण्याचा खेळ २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राची सत्ता स्वबळावर काबीज केल्यानंतर भाजपने कसा सुरू केला, ही बाब सर्वश्रुत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र काबीज केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता झारखंड, छत्तीसगड आणि प. बंगालच्या दिशेने वळवल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी पार्थ चटर्जी यांच्या घरी ‘ईडी’ने छापे टाकल्यानंतर केला होता. त्यांच्या या आरोपास पुष्टी देणारी आणखी एक घटना याच रविवारच्या मुहूर्तावर उघड झाली. झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांच्या गाडीच्या डिकीत रोकड रकमेचे गठ्ठेच्या गठ्ठे सापडल्यामुळे त्यांना पश्चिम बंगाल सरकारने ताब्यात घेतले आहे. शिवाय, त्याच दिवशी झारखंडमधील आणखी एक काँग्रेस आमदार कुमार जयमंगल यांनी ‘आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हेमंत बिस्व शर्मा यांच्या पुढाकाराने आपल्याला हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी दहा कोटींची ‘ऑफर’ देण्यात आल्याची’ तक्रार थेट पोलिसांत नोंदवली आहे!

गेल्या काही वर्षांत भाजपने राजकीय घोडेबाजार उभा केल्याचे अनेकदा दिसून आले होते. मध्य प्रदेश आणि कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापनेसाठी याच मार्गांचा अवलंब केल्याचे आरोपही झाले होतेच. राऊत यांची अटक आणि ही तक्रार बघता, भाजपच्या या कुटील कारवायांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागते. राऊत यांच्या घरावरच्या छाप्यांनंतर ‘ईडी’च्या हाती लागली ती अवघी साडेअकरा लाखांची रोकड. मात्र, राऊत कुटुंबियांनी त्यातील दहा लाख रुपये हे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनीच ते मूळ शिवसेनेत असताना पक्षकार्यासाठी दिलेले होते, असा खुलासा करून आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा सारा राजकीय साठमारीचाच खेळ असला, तरी त्याची सुरुवात ही भाजपने केली, हे नाकारता येणे कठीण आहे.

मात्र, राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेची मोठीच कोंडी झाली आहे. गेली अडीच वर्षे शिवसेना तसेच महाविकास आघाडीचा किल्ला लढवण्याचे काम राऊत एकटे करत होते. दररोज माध्यमांसमोर येऊन ते भाजपवर हल्ला चढवत होते. त्यामुळेच त्यांच्या या पत्रकारपरिषदेची टिंगल एकनाथ शिंदे यांनी ‘रोजचा मॅटिनी शो’ अशा शब्दांत केली होती! आता राऊत गजाआड गेल्यामुळे किरीट सोमय्या यांना अधिकच स्फुरण चढणार यात शंका नाही; कारण या दोघांनी परस्परांना अटक करण्याचे आव्हान दिले होते. आता सोमय्याच नव्हे तर भाजपच्या अन्य प्रवक्त्यांच्या आरोपांना तत्काळ ठोस उत्तर कोण देणार, असा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहिला आहे. एकेकाळी बुलंद नेत्यांची फौज बाळासाहेब ठाकरे यांच्या दिमतीला होती. याच शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने नेत्यांची वानवा झाल्याचे चित्र उभे राहणे, ही शिवसेनेची शोकांतिकाच आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT