Ronaldo Sakal
editorial-articles

अग्रलेख : फुटबॉल विश्वातील ‘शीत’युद्ध!

‘ठंडा मतलब…’ या सवालाचे उत्तर भारतातले एखादे दुर्गम खेड्यातले पोरदेखील सहज सांगेल, पण पोर्तुगालचा फुटबॉल सितारा क्रिस्तियानो रोनाल्डोला मात्र हा जबाब मान्य नाही.

सकाळ वृत्तसेवा

हॉलिवूड, बॉलिवूड किंवा क्रीडा क्षेत्रातले तारे-सितारे हल्ली सामाजिक समस्यांवरही मुखर होऊ लागले आहेत, याला कारणीभूत आहे समाजमाध्यमांचे जबरदस्त पाठबळ!

‘ठंडा मतलब…’ या सवालाचे उत्तर भारतातले एखादे दुर्गम खेड्यातले पोरदेखील सहज सांगेल, पण पोर्तुगालचा फुटबॉल सितारा क्रिस्तियानो रोनाल्डोला मात्र हा जबाब मान्य नाही. ‘ठंडा मतलब आग्वा…म्हणजे पाणी’ असेच तो म्हणणार! किंबहुना, तेच त्याने चार दिवसांपूर्वी आपल्या जाहीर कृतीतून साऱ्या जगाला ओरडून सांगितले. सध्या युरो करंडकासाठीची फुटबॉल स्पर्धा जोशात सुरु झाली आहे. तुरळक प्रेक्षकांसमोर ‘युरो’ करंडकाचे सामने रंगू लागले आहेत; पण जगातल्या बहुतेक देशांतले कोट्यवधी फुटबॉल चाहते टीव्हीच्या पडद्याला नाक लावून घरात बसले असणार, यात शंका नाही. याचे कारण कोरोनाचे संकट अजून पूर्णत: टळलेले नाही. युरोपातली मद्यगृहे आणि मौजगृहांचे दरवाजे मात्र घाईघाईने उघडले गेले आहेत. बेटिंगवाल्यांची पुन्हा चलती सुरु झाली. कारण यंदा काहीही झाले तरी ‘युरो करंडक’ पार पडलाच पाहिजे, असा जणू साऱ्यांनी मुळी चंग बांधला होता.

स्पर्धेतील लढतीपूर्वी शिष्टाचारसंमत अशी उभय कर्णधारांची पत्रकार परिषद होते, तेव्हा पत्रकारांना सामोरे जाताना रोनाल्डोने पुढ्यात ठेवलेल्या कोकाकोलाच्या बाटल्या दूर सारल्या आणि पाण्याची बाटली उचलून तो एवढेच म्हणाला : ‘आग्वा!’ पुर्तुगाली किंवा स्पॅनिश भाषेत आग्वा म्हणजे पाणी. त्याच्या त्या कृतीचे माध्यमांतून मोठे पडसाद उमटले. न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात गडबड उडाली, आणि ‘कोकाकोला’चे शेअर घसरुन, कंपनीला तब्बल २३९ कोटींना मुकावे लागले, अशी वदंता आहे. अर्थात हे अर्धसत्य आहे, हे अर्थतज्ज्ञ जाणतात. एक तर ही घट दोन टक्के आहे. असे चढउतार एरवीही शेअर बाजारात होतच असतात. आजमितीस ‘कोकाकोला’ची एकूण संपदा सुमारे ८६ अब्ज डॉलर इतकी आहे! खेरीज कंपनीच्या शेअरमधली अंशत: घसरण रोनाल्डोच्या कृतीच्या आधीच सुरु झाली होती, असे शेअरबाजाराचे तज्ज्ञ म्हणतात. तरीही शीतपेयाला जाहीररित्या नाक मुरडणारा रोनाल्डो हा मात्र महानायक ठरला आहे.

‘तंदुरुस्तीचा दिवाना’

रोनाल्डो हा ‘तंदुरुस्तीचा दिवाना’ मानला जातो, आणि आदर्शही. जगभरातले कोट्यवधी चाहते, विशेषत: कोवळ्या वयातली मुले आपल्याला आदर्श मानतात, आणि अनुकरणही करतात, याचे भान असलेला तो सितारा आहे. त्यादृष्टीने त्याने केलेली कृती समर्थनीयच ठरते. अचूक आहार नियमन आणि व्यायाम साधण्यासाठी त्याने डझनावारी आहारतज्ज्ञ आणि प्रशिक्षकही पदरी बाळगले आहेत. मैदानातल्या तुफानी कारकीर्दीत त्यानेही कोट्यवधींची माया जमवली आहे. समाजमाध्यमांचा तर तो ‘आॅंख का तारा’ आहे. या सितारेमंडळींची हुकूमतच अशी असते, की त्यांची कुठलीच गोष्ट चाहत्यांना खटकत नाही. साहजिकच रोनाल्डोचे नाक मुरडणे कोकाकोलाला चांगलेच गरम पडणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. रोनाल्डोच्या पाठोपाठ फ्रान्सच्या पॉल पोग्बाने अशीच कृती केली. त्यानेही पत्रकार परिषदेत समोर ठेवलेली हायनेकेन बीअरची बाटली उचलून खाली ठेवून दिली.रोनाल्डो आणि पोग्बा या दोघांनीही ज्या कंपन्यांची शीतपेये कॅमेऱ्यासमोरुन हटवली, त्या दोन्ही कंपन्या यंदाच्या ‘युरो करंडक’ स्पर्धेच्या प्रायोजक आहेत. फुटबॉलसाठी या कंपन्या सढळ हाताने खर्च करत असतात.

फुटबॉल या खेळाचे कल्याण व्हावे, आणि त्यायोगे विश्वात शांतता व बंधुभाव नांदावा, असला काही त्यांचा हेतू नसतो. आपल्या उत्पादनांचा प्रसार साधून तिजोरीतल्या ठेवी आणखी फुगाव्यात एवढीच त्यांची अपेक्षा असते. पैशाच्या जोरावर दादागिरी करणाऱ्या या बलाढ्य ब्रँडची पत्रास पोग्बा आणि रोनाल्डोने ठेवली नाही, याचेच सध्या जगभरात कौतुक होत आहे. विशेषत: शीतपेयांना चटावलेल्या लहानग्यांचे समस्त आईवडील त्याच्यावर बेहद्द खुश असतील. ‘तुझा रोनाल्डोच पिऊ नकोस, असं सांगतोय, मग कशाला हवाय तुला ते तसले पेय?’ असे आता जगभरातल्या माऊल्या आपापल्या बाब्यांना ठणकावून सांगतील. तेवढे नैतिक बळ त्यांना रोनाल्डोने तीन सेकंदांच्या आपल्या कृतीतून पुरवले आहे. आपल्या देशातही अनेक खेळाडूंनी कोकाकोलाची जाहिरात करण्याचे नाकारले होते, हे अनेकांना आठवत असेल. बॅडमिंटन गुरु पुलेला गोपीचंद यांनी तर जाहीर नकार देऊन कोकाकोलाची पंचाईत केली होती. परंतु, गंमतीची बाब म्हणजे हाच रोनाल्डो २००६मध्ये कोकाकोलाच्याच जाहिरातीत बिनदिक्कत झळकला होता. ‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ असा सवाल काही शीतपेयवादी आता करतीलही. तूर्त तरी बलाढ्य शीतपेयाच्या कंपनीवर रोनाल्डोने अनपेक्षित मैदानी गोल चढवला. अचानक ही सितारे मंडळी मैदानावरील कामगिरीसोबत सामाजिक कृतीशीलता का बरे दाखवू लागली असतील? हॉलिवूड, बॉलिवूड किंवा क्रीडा क्षेत्रातले तारे-सितारे हल्ली सामाजिक समस्यांवरही मुखर होऊ लागले आहेत, याला कारणीभूत आहे समाजमाध्यमांचे जबरदस्त पाठबळ! लक्षावधी ‘फॉलोअर्स’ची फौज पाठीमागे असली की वलयांकितांनाही वेगळी स्वप्ने पडू लागतात. चाहत्यांनी दिलेले देवत्त्व अंगोपांगी भिनू लागते. त्यातून समाजाचे भले साधले जात असेल तर त्याला कुणी हरकत का घ्यावी? प्रायोजकांची ‘ब्रॅड व्हॅल्यू’ कितीही प्रबळ असली तरी खेळाडूंची ‘स्टार व्हॅल्यू’ही काही कमी नसते, हे सत्य मात्र या प्रसंगातून लकाकून गेले खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT