meghan markle and harry 
editorial-articles

अग्रलेख : राजमहालातील राग आणि रंग!

सकाळवृत्तसेवा

नव्या सहस्रकाचे तिसरे दशक उजाडले, माणूस मंगळावर वस्ती करण्याचे बेत रचू लागला, जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ कसे झाले आहे, याच्याही चर्चा झडू लागल्या आहेत, अशा परिस्थितीतही माणूस वर्णद्वेषाच्या भिंती तोडू शकलेला नाही. या वास्तवाला अगदी  ब्रिटनचे राजघराणेही अपवाद नाही.

भारतातील संस्थाने खालसा झाली, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली. त्यांचे उरलेसुरले राजेपणही पुढच्या दोनच दशकांत संपुष्टात आले. या राजघराण्यांचे शाबूत राहिलेले काही राजवाडे हल्ली पर्यटकांनी गजबजतात. हातात तिकिट घेऊन आपल्यासारख्यांना अर्ध्या विजारीत या महालांमध्ये हिंडता येते. तेथल्या ऐश्वर्यवान चीजवस्तूंचा अचंबा करता येतो. त्या राजस जीवनात थोडेफार डोकावता येते. राजघराण्यांच्या तेव्हाच्या राहणीमानाचे, इतिहासाचे साभिमान कौतुक स्थानिक ‘राजू गाईड’ ओतप्रोत स्वरात सांगत राहातो, आपण ते ऐकत राहायचे! गाईडच्या मुखातून इतिहासाचे राजस रुप ऐकू येत असते, दुसरे ‘झाकलेले रुप’ मात्र तिथल्या जुन्या भिंतींनाच ठाऊक असते. ते आपल्याला कानावर न पडलेले बरे. चुकून पडलेच तर त्याचे विद्रूप, ओंगळ स्वरुप तेवढे दिसते. नात्यागोत्यातील निर्दय राजकारणाचे, स्वार्थांध संघर्षांचे, विकारविलसितांच्या विकृत खेळांचे असे काही भयानक किस्से या भिंतींच्या पोटात असतात की वाटावे, ती सृष्टी दृष्टिआड राहिली तरच बरे.

नाचरा मोर नेहमी पुढून पाहावा! कधी तरी या राजघराण्यांच्या काळ्याकुट्ट इतिहास आणि वर्तमानावरचा, सारे काही झाकणारा तो पडदा दूर होतो, आणि अंगावर चाल करुन येतात, ती राजमहालातील उध्वस्त, उजाड, बेजान जीवनाची विद्रुप चित्रे. ब्रिटिश राजघराण्याची नूतन स्नुषा मेघन मर्केल आणि राजपुत्र हॅरी यांच्या ताज्या मुलाखतीने अशाच काही बीभत्स प्रतिमा लोकांसमोर बेधडकपणे मांडल्या आहेत. राजपुत्र हॅरी हे सुप्रसिध्द दिवंगत प्रिन्सेस डायना यांचे सुपुत्र. मेघन मर्केल ही चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे करुन पैका आणि प्रसिद्धी मिळवणारी एक तरुण अभिनेत्री. राजपुत्र हॅरी यांनी राजघराण्याचे संकेत झुगारुन मेघनशी विवाह केला. त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेले राजघराण्यातील अनुभव धक्कादायक आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अखेर राजघराण्याचे वंशपरंपरेने मिळणारे हक्क आणि अधिकार, संपत्ती, उपाध्या आणि बिरुदे यांचा परित्याग करुन या जोडप्याने अमेरिका गाठली. तेथेच आता सामान्य कुटुंबाप्रमाणे ते राहात आहेत. ब्रिटिश राजमहालातील वास्तव्यात बसलेले वर्णद्वेषाचे चटके, जाणवणारी पैशाची चणचण, पोकळ दाखवेगिरी, खालच्या पातळीवरली शेरेबाजी आणि सतत होणारा छळ याचा साद्यंत लेखाजोखा त्यांनी विख्यात मुलाखतकार ओप्रा विनफ्री यांच्यासमोर दोन तास मांडला. ती मुलाखत अमेरिकी टीव्ही वाहिनीवरुन रविवारी प्रसारित झाली. या मुलाखतीमुळे ब्रिटिश राजघराण्यातील छिद्रे आणि भगदाडे सर्वांच्या समोर उघड झाली.

प्रतीकात्मक अर्थाने का होईना, पण आजही तब्बल सोळा देशांची राजगादी म्हणून ओळखले जाणारे हे घराणे स्वत:च वर्णद्वेषाचा, आणि घरभेद्या राजकारणाचा किती मोठा बळी आहे, हे कळून चुकले. मेघन यांना तर ब्रिटिश नियतकालिकांनी अक्षरश: धारेवर धरले. तिच्या त्वचेच्या रंगावर प्रच्छन्न शेरेबाजी करण्यात आली, आश्चर्य म्हणजे राजघराण्याने या पीतपत्रकारांना कधीही साधा जाबदेखील विचारला नाही. इतकेच नव्हे तर मेघनच्या उदरात त्यावेळी वाढत असलेल्या अर्भकाचा वर्ण काळा निघाला तर काय? असाही सवाल काही राजघराण्यातील व्यक्तींनीच केल्याचे मेघन यांचे म्हणणे आहे. या साऱ्या घृणास्पद प्रकारामुळे वैतागलेल्या मेघन यांना नैराश्याने ग्रासले आणि त्यांच्या मनात आत्मघाताचे विचार घोळू लागले. राजपुत्र हॅरी यांच्या डोळ्यांदेखत हा शाही ‘जाच’ चालू राहिला. अखेर या दाम्पत्याने राजघराण्याशी संपूर्ण फारकत घेण्याचा निर्णय घेतला.

मेघन मर्केल आणि राजपुत्र हॅरी यांच्या मुलाखतीनंतर अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. कारण तेथे ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ हे वर्णविद्वेषविरोधी आंदोलन नुकतेच पेटले होते. जॉर्ज फ्लॉइड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीस एका गोऱ्या पोलिसाने मिनिआपोलिसमध्ये भर रस्त्यात गळ्यावर गुडघा रोवून मारुन टाकले होते. त्यानंतर या मोहिमेस आणखीनच उचल मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीतही ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चे पडसाद उमटलेच होते. साहजिकच, जे रस्त्यावर घडते आहे, तेच राजघराण्यांनाही चुकलेले नाही, हे मेघन-हॅरीच्या मुलाखतीवरुन स्पष्ट झाले. या साऱ्या प्रकाराकडे निव्वळ ‘एका शाही परिवारातील भानगडी आणि कुलंगडी’ एवढ्याच संकुचित दृष्टिकोनातून पाहाणे, हा सत्याचा अपलाप ठरेल. नव्या सहस्त्रकाचे तिसरे दशक उजाडले, माणूस मंगळावर वस्ती करण्याचे बेत रचू लागला, समाजमाध्यमांमुळे जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ कसे झाले आहे, याच्याही चर्चा झडू लागल्या आहेत, अशा परिस्थितीतही माणूस वर्णद्वेषाच्या भिंती तोडू शकलेला नाही, हा या प्रकरणात मिळालेला बोध आहे.

माणसाच्या पेशीत खोलवर जाऊन रुजलेले हे विकारविद्वेषांचे विषाणू कुठल्याही अन्य विषाणूंपेक्षा घातक आहेत. किंबहुना, समाजमाध्यमे आणि वंशवाद या दोन्ही विषारी सर्पांनी आपल्या जगाला विळखा घातल्यात जमा आहे, अशा आशयाचे उद्गार याच मुलाखतीत राजपुत्र हॅरी यांनी काढले, ते गांभीर्याने घ्यावे लागतील. मेघन-हॅरीच्या मुलाखतीवर ब्रिटिश राजमहालाकडून केवळ चिंता व्यक्त करण्यात आली आहे. खरे तर या निमित्ताने नवे वास्तव स्वीकारुन राजघराण्यांनीही आपल्या कालबाह्य परंपरा आणि बुरसट मानसिकतेमधून बाहेर पडून नव्या युगाशी नाळ जोडून घ्यावी, हेच हिताचे ठरेल. अन्यथा, पर्यटनाचे केंद्र म्हणून उरलेली त्यांची पुण्याईदेखील कालौघात आटून जाईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT