Terrorist
Terrorist Sakal
editorial-articles

अग्रलेख : कट उधळला; सावट कायम

सकाळ वृत्तसेवा

सणासुदीच्या काळात देशात दहशत पसरविण्याचा कट दहशतवाद्यांच्या अटकेने निष्फळ ठरला आहे. तथापि, भारताभोवतीच्या बदलत्या राजकीय स्थितीचे पुरते आकलन करून घेता, पाकपुरस्कृत दहशतवाद तोंड वर काढणार याची ही नांदी म्हणावी लागेल.

अफगाणिस्तानात झालेल्या तालिबान्यांच्या सरशीनंतर भारताने संयुक्त राष्ट्रात जागतिक दहशतवादाचा संघटितपणे मुकबला केला पाहिजे, असे सांगत जगाला परिस्थितीतील गांभीर्य लक्षात आणून दिले होते. पाकप्रणीत दहशतवाद पुन्हा डोके वर काढेल आणि भारताची डोकेदुखी वाढेल, ही व्यक्त केलेली भीती अनाठायी नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश या राज्यांतील महानगरात ऐन सणासुदीच्या हंगामात दहशतवादी कारवायांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. देशवासीयांनी सुटकेचा निश्वासही सोडला. मात्र, अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतरच्या काही आठवड्यातच भारतात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात सापडणे हा योगायोगच म्हणावा लागेल. याचे प्रमुख कारण म्हणजे दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दोघांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर सरकारातील मंत्री ठरवताना ‘आयएसआय’ने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्याचे प्रमुखही काबूलला गेले होते. एवढेच नव्हे ‘हक्कानी नेटवर्क’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यास या सरकारात अंतर्गत सुरक्षेचे खाते मिळावे, म्हणून ‘आयएसआय’ने दबावही टाकला. या पार्श्वभूमीवर भारताविरोधातील दहशतवादाचा वणवा पेटता ठेवण्यासाठी मुंबईवर २००८ मध्ये २६/११ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडेच यावेळच्या हल्ल्याचेही सूत्रसंचालन ‘आयएसआय’ने सोपवले होते. या दहशतवादी कारवायांसाठीची शक्तिशाली स्फोटके आणि ग्रेनेड्‍ससारखी सामग्री भारतात आणण्याची जबाबदारीही दाऊदच्या ‘डी गँग’वर होती. त्यामुळे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतात अशांतता माजवण्यासाठी कशा सरसावल्या आहेत, तेच उघड झाले आहे. हा सारा कट ‘आयएसआय’ने मोठ्या नियोजनाअंती रचला होता.

जामियानगरचा ओसामा उर्फ सामी यास २२ एप्रिल रोजी लखनौ येथून मस्कतला पाठवले. तेथे त्याची गाठ अलाहाबादच्या झिशान कमरशी घालून दिली. पुढे त्या दोघांना पाकिस्तानात पाठवले. याचा अर्थ, भारतीय तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागासाठी प्रवृत्त करण्याचे काम भारतातच कसे सुरू आहे, हेही स्पष्ट झाले आहे. मात्र, भारत सरकारने पाकिस्तान सीमेवर तैनात केलेल्या कडक बंदोबस्तामुळे या तरुणांना प्रशिक्षणासाठी थेट पाकिस्तानात जाणे कठीण झाले. त्यामुळेच ओसामा मस्कतमार्गे गेला. सुदैवाने भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांना कटाच्या लागलेल्या सुगाव्यामुळे कारवाया हाणून पाडण्यात यश आलंय.

दहशतवादाचे नवे रूप भारतीयांनी पहिले ते मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या रुपाने. त्या एकाच दिवशी मुंबईतील प्रमुख व्यापारी तसेच आर्थिक केंद्रे येथे अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांत अडीचशेहून अधिक निरपराध्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती. अर्थात, त्या आधी मुंबईतच दंगली आणि हत्याकांडाच्या घटना घडल्या होत्या. मुंबईतील बॉम्बस्फोटांमुळे दहशतवादाचे जगभर पसरलेले सावट आणि अशा कारवायांना असलेला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या होत्या. त्यानंतरही भारताच्या जागतिक दहशतवाद्याच्या इशाऱ्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिले जाण्यास आठ वर्षे जावी लागली. अमेरिकेतील ‘ट्वीन टॉवर्स’ दहशतवादी कारवाईत ११ सप्टेंबर २००१ रोजी जमीनदोस्त झाले आणि मग अमेरिकेने ‘वॉर आॅन टेरर’ आरंभले. तथापि दहशतवाद संपला नसल्याचे अफगाणिस्तानातील घटनांनी स्पष्ट झाले आहे.

अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर गेल्या काही दिवसांत रशिया, अमेरिका यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारतदौरे करून देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी केलेल्या चर्चेला त्यामुळे विशेष महत्त्व आहे.

तालिबानच्या नाकाखाली पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षणाचे तळ राबवेल; ‘इसिस’, अल कायदासारख्या दहशतवादी कारवायांना बळ देईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तालिबानमधील काही नेत्यांनी काश्‍मीरकडे आपली नजर वळवत असल्याचा इशारा काही दिवसांपुर्वीच दिला होता.

अर्थात, पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेले दहशतवादी आणि या सगळ्या घटनांचा संबंध आहे, असा लगेचच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र गेल्या काही दिवसांतल्याच या घटनांची सांगड घालून तपासाची सूत्रे फिरवावी लागतील, हेही खरे. दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यायचे असते. त्यामुळे दहशतवाद्याच्या मुकाबल्यासाठी सातत्याने दक्ष राहावे लागणार आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि फूस, त्यांच्या कारवायांसाठीची रसद यावर करडी नजर ठेवावी लागेल. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरी गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे मनसुबे रचण्यात आले होते. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी अवघ्या ११ मिनिटांच्या अंतरात उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या अर्ध्या डझनाहून अधिक स्फोटांत दोनशेहून अधिक लोकांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती ‘आयएसआय’ घडवू पाहणार होते. आजही मुंबईत दहशतवादाचे पहिले पाऊल रोवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद पाकिस्तानच्या कृपाछत्राखालीच ऐषारामात जगत आहे. दहशतवादी कारवायांसाठीची प्रशिक्षण देणारी केंद्रे पाकिस्तानात कार्यरत आहेत, हेच वास्तव या उधळलेल्या कटातून स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT