tirath-singh-rawat 
editorial-articles

अग्रलेख : ‘अज्ञान’तीर्थ!

सकाळवृत्तसेवा

आपल्या देशात अज्ञानाचा तेज:पुंज प्रकाश पाडणाऱ्यांची कमी नाही. एक मोजायला गेले तर दहा मिळतील अशी परिस्थिती! त्यातही राजकीय पक्षांमध्ये जेव्हा एकचालकानुवर्ती नेतृत्व उदयास येते, तेव्हा तेव्हा अशा ‘अज्ञान’तीर्थांची मांदियाळीच एकदम सामोरी येत राहते. असेच एक तर्काचे झेंगट खुंटीला बांधून ‘क्रांतिकारक’ निरूपण करणारे नवेच व्यक्तिमत्त्व सध्या उत्तराखंडात भारतीय जनता पक्षाच्या हाती लागले आहे. त्या राजस आणि सत्त्वगुणी व्यक्तिमत्त्वाचे नाव तीरथ सिंग रावत असे आहे. जेमतेम दोन आठवड्यांपूर्वीच उत्तराखंडचे राज्य त्यांच्या हाती देण्याचा निर्णय भाजपच्या दिल्लीतील मुखंडांनी घेतला आणि लगोलग त्यांची वाक् गंगा ओसंडून वाहू लागली. त्याने अनेकांची डोळे दिपून गेले असतील. आपल्या हाती हे राज्य देताना पक्षश्रेष्ठींनी ‘संस्कृतिरक्षक’ म्हणून काम करण्यासाठीच राजदंडही हातात सोपवल्याचा भ्रम या रावतसाहेबांना झाला की काय, न कळे! –कारण मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी ‘फाटक्या’ जीन पॅण्ट्‍स घालणाऱ्या महिलावर्गावर टीकेची झोड उठवली.

आपल्या आया जर अशा फाटक्या आणि विशेषत: गुडघे दाखवणाऱ्या जीन्स घालत असतील, तर त्या मुलांवर  नेमके कोणते संस्कार होत असतील, असा जाहीर सवाल त्यांनी केला आणि लगोलग सोशल मीडियावर त्यांना ‘ट्रोलिंग’ सुरू झाले. कोणी तर गुडघे दाखवणारी शॉर्ट जीन घातलेल्या स्वत:च्याच मुलीबरोबरचा या रावतसाहेबांचा फोटोही व्हायरल केला. अर्थात, भाजपमध्ये हे असे स्वयंघोषित आणि तथाकथित ‘संस्कृतिरक्षक’ पायलीला पासरी या भावाने मिळत असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची फारशा गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. मात्र, केवळ करमणूक करणे एवढेच आपले काम नाही, हे या रावतसाहेबांनी पुरते ठरवलेले दिसते आणि त्यामुळेच त्यांच्या अशा चमत्कृतिजन्य वक्तव्यांचा ओघ हा पुढेही सुरूच आहे. अर्थात, त्यामुळे त्यांचे अगाढ अज्ञान प्रकाशात आले असले, तरी त्यांच्या वक्तव्यातून समाजात दुराव्याची दरी वाढू शकते आणि म्हणूनच त्याची गांभीर्याने दखल घ्यायला लागते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना काळात सरकातर्फे जनतेला तांदळाचा पुरवठा केला जात असताना, छोट्या कुटुंबाच्या वाट्याला कमी प्रमाणात तांदूळ आला आणि ज्यांची कुटुंबे मोठी होती, त्यांच्या वाट्याला तो अधिक आला आणि त्यांनी त्याची साठेबाजी करून, तो चढ्या भावाने गरजूंना विकला, असे निरीक्षण त्यांनी रविवारी नैनिताल येथे एका कार्यक्रमात नोंदवले. मात्र, त्याचवेळी त्यांची जीभ घसरली आणि ‘जे दोनच मुले पैदा करतात त्यांना साहजिकच वीस-वीस मुले पैदा करणाऱ्यांबद्दल असुया वाटू लागली!’ असेही तारे त्यांनी यावेळी भाषणाच्या ओघात तोडले. त्यांच्या या ‘ताऱ्यां’चा लखलखता प्रकाश नेमका कोणाच्या दिशेने होता, हे सांगण्याची गरज नाही; पण त्यामुळे समाजात दुही माजवण्याचा त्यांचा उद्देश मात्र स्पष्ट झाला. खरे तर या अशा अश्लाघ्य आणि बेजबाबदार वक्तव्यांबद्दल त्यांची पक्षश्रेष्ठींना कानउघाडणीच करायला हवी होती.

मात्र, ते तरी बिच्चारे काय करणार? सध्या ‘बंगाल एके बंगाल’ असे पाढे मोजण्यातच त्यांचा दिवस आणि रात्रही खर्ची पडत असल्याने या बेताल वक्तव्याकडे त्यांचे दुर्लक्ष होणे साहजिकच होते. मात्र, एवढ्याने थांबले तर ते रावतसाहेब कसले! ही एवढी पक्षनिष्ठा कमी पडेल की काय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट देवत्व बहाल करून ते मोकळे झाले! मोदी हे भविष्यात साक्षात प्रभू रामचंद्र म्हणून ओळखले जातील आणि अमित शहा यांची ओळख ही ‘रामदूत हनुमान’ म्हणूनच लोकांना राहील, अशी भविष्यवाणीही त्यांनी वर्तवली! काँग्रेस पक्षात गांधी घराण्याची हुजरेगिरी तसेच चमचेगिरी चालते, अशी टीका कायम करणाऱ्या भाजप नेतृत्वापुढे आता या अशा लंपट मनोवृत्तीच्या नेत्याचे काय करावे, असाच प्रश्न पडला असणार. अर्थात, भाजपमध्ये अशा प्रवृत्तीच्या नेत्यांची कमी नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र भाजपमधील एकाने तर ‘मोदी श्री विष्णूचा अकरावा अवतार आहेत’, असे सांगून टाकले होते.  त्यावर झोड उठल्यानंतर त्यांनी इन्कारही केला. तो खरा आहे, असे गृहित धरले तरी अशा प्रकारच्या व्यक्तिपूजेला अलीकडे वारंवार बहर येताना दिसतो, हे नाकारता येणार नाही. 
अमेरिकेवर ‘आरोप’

मात्र, या रावतसाहेबांनी खरी बहार आणली ती ‘आंतरराष्ट्रीय वन्यदिना’च्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात. अमेरिकेने भारतावर दोनशे वर्षं राज्य केले आणि पुढे त्या गुलामगिरीतून आपली मुक्तता झाली, अशा कोणालाही ठाऊक नसलेल्या माहितीचे अज्ञानामृत त्यांनी उपस्थितांना पाजले. अमेरिकेनेच एके काळी संपूर्ण जगावर राज्य केले होते, अशी आपल्या विद्वत्तेची आणखी काही पुटेही त्यांनी जोडली. मोदी यांचे नेतृत्व नसते तर कोरोना काळात आपला देश रसातळाला गेला असता, हे त्यांच्या आख्यानाचे अर्थातच मुख्य सूत्र होते. हा इतका ‘ज्ञानी’ पुरुष भाजपने इतका काळ पडद्याआड दडवून का ठेवला होता, असाच प्रश्न त्यामुळे अनेकांना पडला आहे. आता उत्तराखंडची सत्ता राबवताना ते आणखी कोणते ज्ञान आपल्याला देतात, एवढीच उत्सुकता या भारतवर्षातील तमाम पामर जनांच्या मनात आता दाटून आली आहे!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT