95th Marathi Sahitya Sammelan Sakal
editorial-articles

अग्रलेख : साहित्यावरच बोलू काही...!

सुग्रास पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यानंतर पूर्णविरामाच्या मसालेपानासाठी पोटात थोडी जागा असतेच. ही भोजनोत्तर मुखशुद्धी पचनालाही साह्यभूत ठरते.

सकाळ वृत्तसेवा

सुग्रास पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यानंतर पूर्णविरामाच्या मसालेपानासाठी पोटात थोडी जागा असतेच. ही भोजनोत्तर मुखशुद्धी पचनालाही साह्यभूत ठरते.

सुग्रास पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यानंतर पूर्णविरामाच्या मसालेपानासाठी पोटात थोडी जागा असतेच. ही भोजनोत्तर मुखशुद्धी पचनालाही साह्यभूत ठरते. पण म्हणून कोणी भोजनापूर्वीच पानपट्ट्या मुखात सारुन बसले तर त्याला काय म्हणायचे? आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या उदगीरच्या ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका बघून कुठल्याही सुजाण वाचकाच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या साडेचार महिन्यांच्या अंतराने आणखी एका साहित्य संमेलनाची मांडामांड करावी लागल्याने आयोजकांची उडालेली गडबडघाई समजून घेण्याजोगी आहे. वेळेची अपरिहार्यता म्हणून चार-पाच महिन्यात पुन्हा तेच ते परिसंवाद, त्याच त्या चर्चा, तीच ती भाषणे आणि तेच ते वाद हा सारा खटाटोप करण्याची खरोखर गरज होती का? असा प्रश्नही पडू शकतो. पण आता तो मुद्दाच निकालात निघाला आहे. काहीही असले तरी उदगीरसारख्या ऐतिहासिक आणि संतमहात्म्यांच्या वावरामुळे पुनीत झालेल्या भूमीत हा शब्दांचा जागर होतो आहे, याचे स्वागतच करायला हवे.

परंतु, प्रश्न पडतात ते कार्यक्रमपत्रिकेतील काही आगांतुक ‘इव्हेंट’मुळे. या इव्हेंटबाजीचे मराठी साहित्याशी नाते काय? असे कोणीही विचारेल. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच्या दोन दिवस आधी, ख्यातनाम संगीतकार जोडी अजय-अतुल गोगावले यांची संगीतमय ‘नाइट’ ठेवण्यात आली आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ ‘चला, हवा येऊ द्या’ या टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोचलेल्या हास्यकल्लोळी कार्यक्रमासाठी राखून ठेवली गेली आहे. तिसऱ्या दिवशी रीतसर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उडत्या गाण्यांचा बादशहा अवधूत गुप्ते याच्या धडाकेबाज संगीतवृंदाने साहित्य संमेलनाचा मांडव संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी दणाणून जाईल. अर्थात, नाही म्हणायला, तोंडीलावणे म्हणून गोंधळ, जागरण, दिंडार, लेहंगी अशा लोककलांसाठीही एखाद्या दुपारी दीडेक कलाक वेळ आयोजकांनी राखून ठेवला आहे. हे सगळे रंगारंग ‘इव्हेंट’ संमेलनाच्या मुख्य मांडवातच पार पडणार असले तरी मुख्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे ते भाग नाहीत. एवढे तरी औचित्य आयोजकांनी दाखवले, हे योग्यच झाले. तथापि, संमेलनाच्या आधी किंवा समारोपाला हा मनोरंजनाचा गुलाल उधळण्याची काही गरज होती का, हा खरा प्रश्न आहे.

अजय-अतुल, अवधूत गुप्ते किंवा ‘चला, हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातले सुप्रसिद्ध विनोदवीर यांनी वर्षानुवर्षे मराठी रसिकांना रिझवले आहे, आणि मराठी कलाप्रांतात ही मंडळी आघाडीला आहेत, यात शंका नाही. त्यांच्या कलागुणांचे महाराष्ट्राने वेळोवेळी कौतुकही केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची साहित्य संमेलनाच्या मांडवात गरज नाही, असे म्हणताना त्यांचा अधिक्षेप करण्याचा बिलकुल इरादा नाही. पण जेथे साहित्य-व्यवहार, चर्चाविमर्श, लेखक-वाचक संवाद यांचा सोहळा असावा, असे अभिप्रेत आहे, तेथे मनोरंजनी कार्यक्रमांचे प्रयोजन काय, असा उलटा प्रश्न येथे उपस्थित होतो. हे कार्यक्रम समाविष्ट करुन आयोजकांना नेमके काय साधायचे आहे? गर्दी जमवण्यासाठी हा खटाटोप असेल, तर तो व्यर्थ म्हटला पाहिजे.

कारण साहित्य संमेलनाचा तो हेतू याआधीही कधी नव्हता, आणि नसावा. साहित्य संमेलनांना सरकारी अनुदान मिळत असते. या पैशाचा विनियोग व्यावसायिक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी होत असेल तर ते निश्चितच अनुचित वाटते. यापूर्वीही साहित्य संमेलनांच्या मांडवात नाटकांचे प्रयोग किंवा संगीत कार्यक्रम झाले आहेत. परंतु, त्यामध्ये काही शालीनता पाळली जात असे.

तथापि, वाद्यवृंद आणि कॉमेडीसदृश कार्यक्रमांमुळे साहित्य संमेलनाचे स्वरुपच पालटून जाते. उदगीरला यंदा ‘कोंबडी पळाली’पासून ‘झिंगझिंग झिंगाट’पर्यंत अनेक नृत्योद्दीपक गाण्यांची बरसात होणार, आणि त्यामध्ये उपस्थित मराठी सारस्वत ओलेचिंब होणार यात शंका नाही! अवधूत गुप्तेच्या ‘बुरुम बुरुम’ गीतांच्या तालावर मांडवभर रसिक शतप्रतिशत बेभान होणार, आणि ‘चला, हवा येऊ द्या’मधल्या धमाल विनोदी नाटुकल्यांमधल्या भाऊ कदम-कुशल बद्रिकेप्रभृती विनोदवीरांच्या करामतीने सारस्वतांच्या हसून हसून मुरकुंड्या वळणार हे तर ओघाने आलेच. उदगीरच्या ३६ एकराच्या मांडवात यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली तर त्यातले मराठी साहित्याचे भोक्ते किती, आणि रंगारंग कार्यक्रमांच्या ओढीने आलेले रंगीले रसिक किती, हे ओळखता येणे कठीण जाणार असे दिसते. अर्थात चर्चा-परिसंवादातील जडजंबाल चर्चेनेही मराठी साहित्याचे भले होतेच, याची काही हमी नसते. तसेच असल्या रंगारंग कार्यक्रमांनी अपरिमित नुकसान होईल, इतके आपले मराठी साहित्यही लेचेपेचे नसावे. परंतु, मुद्दा औचित्याचा आहे.

साहित्य संमेलने ही प्रत्यक्ष मांडव पडण्यापूर्वीच गाजू लागतात. निरनिराळे वाद, भांडणे, शाईफेक, मान-अपमान आदी घटक यासाठी कारणीभूत असतात. यंदाचे संमेलनही त्यास अपवाद ठरणार नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ गोमंतकीय साहत्यिक दामोदर (भाई) मावजो यांना उद्घाटनासाठी निमंत्रित केल्याच्या मुद्द्यावरुन आत्ताच वादाची धूळ उडू लागली आहे. परंतु, हा झाला साहित्यिक वाद. रंगारंग कार्यक्रमांचे लोण मात्र वाढत गेले तर कालांतराने खमंग गॉसिप रकान्यांमध्येही साहित्य संमेलनाचे नाव गाजू लागेल, असे संभवते. सारस्वतांनी साहित्यपक्वान्नांचा आस्वाद घ्यावा, रंगारंग कार्यक्रमांच्या पानपट्ट्या देणाऱ्या अनेक सांस्कृतिक टपऱ्या अन्यत्र खुल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT