editorial-articles

मामा, बोका आणि काका! 

सकाळवृत्तसेवा

खोडकर जेरीच्या कुरापतींमुळे जेरीला आलेल्या टॉमने मिशा फेंदारत धाव घेतली आणि आपल्या पंजाचा सणसणीत फटका चढवला, पण... सगळे मुसळ केरात! चपळ जेरी क्षणार्धात आपल्या बिळात अदृश्‍य झाला. इतकेच नव्हे तर सुरक्षित ठिकाणी पोहोचून बेट्या टॉमला वाकुल्यादेखील दाखवू लागला. जेरी हा आहे एक चलाख उंदीरमामा आणि टॉम आहे एक आगाऊ बोका. टॉम आणि जेरीच्या या सदाबहार जोडगोळीने तब्बल ऐंशी वर्षांहून अधिक काळ जगभरातील असंख्य बाळगोपाळांना मनःपूत रिझवले आहे. कित्येक पिढ्यांची बालपणे समृद्ध केली आहेत. 1940 च्या सुमारास विल्यम हॅना आणि जोसेफ बार्बरा या दोघांनी टॉम आणि जेरी या कार्टून व्यक्तिरेखांना जन्म दिला. तेव्हापासून हे दोघे माणसांच्या मानसविश्‍वात धुमाकूळ घालत आहेत. हॅना - बार्बरा हे दोघे टॉम अँड जेरीचे जन्मदाते खरेच, पण त्यांना जगभर ख्याती मिळवून दिली ती युजिन डाइश नावाच्या प्रतिभावान कलावंत दिग्दर्शकाने. या युजिनकाकांनी टॉम आणि जेरी यांना इतके बहारदार कारनामे करायला लावले, की विचारू नका! साहजिकच टॉम आणि जेरीची लोकप्रियता आणि तिचे श्रेय युजिनकाकांकडेच आपोआप गेले. "जिन' या लाडनावाने प्रसिद्ध पावलेल्या युजिन डाइश यांचे प्रागच्या एका उपनगरात सोमवारी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी टॉम आणि जेरीला पोरके करून गेलेल्या युजिनकाकांच्या जाण्याने सारे जग हळहळते आहे. 

युजिन डाइश हे जन्माने अमेरिकन, पण कामाच्या शोधात चेकोस्लोवाकियात गेले काय आणि तिथेच स्थायिक झाले काय, सारीच अजब कहाणी. युजिन डाइश चेकोस्लोवाकियात राहायला गेले, तेव्हा तिथे कडवट कम्युनिस्ट राजवट होती. गुप्त पोलिसांची दिवसरात्र पाळत असे. फोनवरचे संभाषण ऐकले जात असे. पण युजिन यांची काही तक्रार नव्हती. त्या तसल्या वातावरणात तीस वर्षे राहून त्यांनी "टॉम ऍण्ड जेरी'चे कारनामे पडद्यावर आणलेच. शिवाय समस्त बाळगोपाळांचा लाडका, उठता-बसता "स्पिनॅच' खाऊन पुष्ट होणारा "पॉपआय'ला जन्म दिला. "पॉपआय' ही कार्टून व्यक्तिरेखा म्हणजे कैक पिढ्यांचे आणखी एक आनंदाचे निधान होते. "पॉपआय' हा एक खलाशी आहे. थोडासा बुद्धू, थोडासा चलाख. चिक्कार प्रेमळ आणि तेवढाच रागीट. पालकाची भाजी खाल्ली, की त्याच्या काटकुळ्या दंडात टणटणीत बेटकुळ्या फुगतात. मग तो शत्रूला दणादण लंबे करतो. ही व्यक्तिरेखा युजिन यांनी अल्पावधीत घरोघरी पोचवली. "मॅन्‍रो' नावाच्या एका लघुपटासाठी त्यांना 1961 मध्ये ऑस्कर पुरस्कार बहाल करण्यात आला होता. "स्पायडरमॅन', "बॅटमॅन' अशा सुपरहिरोचे जनक स्टॅन ली हे गेल्या वर्षी निवर्तले. युजिन यांना स्टॅन ली यांच्याइतकी कीर्ती मिळाली नाही, तरीही त्यांचे नाव कायम आदराने घेतले गेले. युजिन डाइश यांनी कधी प्रसिद्धीची पर्वा केली नाही. गडगंज म्हणावा असा पैसाही गोळा केला नाही. पण त्यांच्या कामाबद्दल मात्र ते कायम उत्साही असत. "कम्युनिस्टांच्या राजवटीत मुक्ततेने हिंडणारा मी एकमेव अमेरिकन होतो', असे ते गंमतीने म्हणत. चित्रकला, ऍनिमेशन आणि कल्पकतेचा त्यांचा वारसा पुढे नेणारी त्यांची तिन्ही मुले कार्यरत आहेत. आपल्या मानसविश्‍वात ठाण मांडून बसलेला टॉम नावाचा बोका, जेरी नावाच्या उंदीरमामा आणि बलभीम "पॉपआय' ही देखील त्यांचीच अपत्ये. ती तर अजरामर आहेत. त्यांचे सारे कल्पनाविश्‍व जिथल्या तिथे आहे. फक्त त्यांचे लाडके युजिनकाका मात्र आता नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT