dhing tang 
संपादकीय

चहाभारत! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

मा णसाने एका दिवसात किती कोप चहा प्यावा, ह्याला लोकशाहीत काही लिमिट नाही. आमच्या मते दिवसाकाठी सोळा कोप चहा किंवा बत्तीस कटिंग एवढी मात्रा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी ठरावी. चहा जितका ज्यास्त, तितकी लोकशाही सशक्‍त, असे हे साधे समीकरण आहे. परंतु, लोकशाहीविरोधकांना त्याचे काय होय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला चहाबाजीखातर नावे ठेवणाऱ्या विरोधकांना आम्ही इतकेच म्हणू की ‘ऐ कंबख्त, तुमने (चाय) पीही नही!’ मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर हमेशा बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांचे आम्हाला नवल वाटते. (फुकट मिळणाऱ्या) चहाला ‘नको’ म्हणणे कसे शक्‍य आहे?

वाचकहो, आज भारताला जगाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे ते कोणामुळे? अर्थात चहामुळे!! ‘केल्याने होत आहे रे, आधी चहाचि पाहिजे’ ह्या उक्‍तीनुसार सर्वांत आधी माणसाला चहा लागतो. चहाच्या घोटाने लोकशाही खडबडून जागी होते व बिछान्यात उठून बसते. चहाच्या दुसऱ्या घोटाने चलनवलन होऊ लागते. तिसऱ्या व चौथ्या घोटाला लोकशाही सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते, हे आपण गेली चार वर्षे जवळून पाहत आहोत.

एरवी वैयक्‍तिक पातळीवर आपलेदेखील चहाशिवाय काय होते? काही लोकांना तर चहाशिवाय काहीच होत नाही. आम्हाला तर सकाळी चहाचा गरम घोट नरड्यातून उतरल्याखेरीज नीटशी जागदेखील येत नाही. चहाचा गरमागरम घोट मुखातून नरड्यात, नरड्यातून जठरात, जठरातून आतड्यात गेल्यावर अचानक सामसूम रेल्वे फलाटास गाडी लागावी, तसा पोटात भास होऊ लागतो. सिग्नल पडतात, उघडतात. इंजिनाच्या शिट्ट्या वाजतात. एकच पळापळ होते, आरडाओरडा सुरू होतो. हलकल्लोळ होऊन गाडी फलाट सोडेपर्यंत हा प्रकार चालू राहतो. शिंगल पडून गाडी सुटली की फलाटदादा पुनश्‍च सामसूम होतात. अहाहा!!

माणूस हा सोशल ॲनिमल आहे. समाजात मिसळून राहण्यास त्यास भारी आवडते. चहा हे त्याचे एक साधन आहे. पहा, ‘चहा घेणार का?’ ह्या पृच्छेत किती आत्मीयता भरली आहे!! अन्य कुठल्याही पेय वा खाद्याला ही आत्मीयता चिकटलेली नाही. उदा. ‘चिकन घेणार का?’, ‘वांग्याचे काप घेणार का?’ वगैरे वगैरे. अन्य काही पेये सन्माननीय अपवाद असतीलही, परंतु, त्या पेयांचा आग्रह आंगठा मुखाशी नेऊन डोळा मारुनदेखील साधता येतो. चहाचे तसे नाही. ‘चहा घेणार का?’ हा चारचौघांत उजळमाथ्याने विचारला जाणारा प्रश्‍न आहे.

बालपणापासूनच आम्हाला चहाबद्दल विशेष आस्था आहे. ‘‘बाळ, चहा घेतोस का?,’’ असा प्रश्‍न आम्हास एका काकांनी विचारला असता आम्ही पलंगावर दोन्ही हात मागे टाकून पाय हलवत बेसावधपणे ‘होऽऽऽ’ असा रुकार भरला. ‘‘घेऊ नये ह्या वयात...शाखेत जातोस ना? चल! उचला रे याला,’’ असे त्या काकांनी पुढे मिश्‍या पुसत म्हटले. पुढील इतिहास सांगण्यात हशील नाही. तात्पर्य येवढेच, शाखेत चहा मिळत नाही!!

आपण मूळ विषयाकडे म्हणजेच चहाकडे वळावे, हे बरे. चहा हे पेय उत्तेजक मानले जाते. परंतु, हा गैरसमज असावा! कां की चहा ढोसून उत्तेजित झालेला इसम आमच्या तरी पाहण्यात आजवर आलेला नाही. चहामुळे मनुष्य मोकळाढाकळा होतो. त्याचा लोकशाहीवरील विश्‍वास वृद्धिंगत होतो. इतके असूनही विरोधक चहाला नावे ठेवत असल्याचे पाहून आमची जीभ खवळते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांस दरसाल साडेतीन कोटीचा चहा लागतो, ह्या वस्तुस्थितीचा गौरव करावा की हेटाळणी? आमच्या मते लोकशाही सशक्‍त करण्याची ही मुख्यमंत्र्यांची चाहत अतुलनीय आहे. साडेतीन कोटीचा चहा! महाराष्ट्रासाठी एवढे आम्लपित्त सहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा विजय असो!!

तळटीप : चहाच्या अतिसेवनाने आम्लपित्त वाढते, असे आयुर्वेदशास्त्र म्हणते. त्यात पथ्य असले तरी तथ्य मात्र नाही, असे आमचे प्रामाणिक मत्त आहे. इति.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT