happening-news-india

सर्च-रिसर्च : वाढत्या आम्लतेचा सागरी जिवांना धोका 

सम्राट कदम

महासागरांतील पाण्याचा खारटपणा आणि आम्लता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचे समुद्री जीवनावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या दीडशे वर्षांपूर्वीच्या एका समुद्री जिवाने महासागरांबद्दल नव्याने होत असलेल्या संशोधनावर डोळे उघडणारा प्रकाशझोत टाकला आहे. १८७२-७६ दरम्यान तेव्हाच्या संशोधकांनी समुद्री जिवांचे संकलन करण्यासाठी ‘चॅलेंजर मोहीम’ आखली होती. तीत सापडलेला हा जीव आधुनिक जगतातील हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढीवर प्रकाश टाकत आहे.

समुद्राच्या पाण्यात वातावरणातील जादा कार्बन डायऑक्‍साइड विरघळल्यास त्याच्या ‘पीएच’मध्ये अर्थात आम्लतेत वाढ होत असल्याची माहिती संशोधकांना आहे. महासागरातील पाण्याच्या आम्लतेत झालेली वाढ सागरी जीवनासाठी धोकादायक ठरत आहे. ॲसिडिक पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे समुद्री जिवांचे संरक्षण करणाऱ्या कॅल्शिअम कार्बोनेटच्या कवचाचे विघटन होत आहे. या जिवांनी कवच अधिक कठीण केले, तरी ते समुद्रातील आम्लयुक्त पाण्यात जास्त काळ टिकाव धरू शकत नसल्याचे प्रयोगांतून स्पष्ट झाले आहे.

‘चॅलेंजर’ मोहिमेतील जिवाच्या नमुन्यांची तुलना आधुनिक काळातील नमुन्यांशी करण्यासाठी संशोधकांनी २०११ मध्ये ‘तारा’ मोहिमेची आखणी केली. या मोहिमेत समुद्री जिवांच्या दोन प्रजाती ‘नेओग्लोबोक्वाड्रिना ड्युटरट्रेई’ आणि ‘ग्लोबीजेरिनॉइड्‌स रबर’ यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. १८७२ मध्ये प्रशांत महासागरात आखण्यात आलेल्या ‘चॅलेंजर’ मोहिमेची तपशीलवार टिपणे शास्त्रज्ञांनी मार्गदर्शक म्हणून वापरली. अतिशय आव्हानात्मक ठिकाणी असलेले हे नमुने त्यांनी मिळविले. ‘तारा’ मोहिमेच्या प्रवासामधून तुलनात्मक नमुने त्यांनी निवडले. त्याची ‘चॅलेंजर’ मोहिमेतील नेमकी ठिकाणे आणि वर्षाची वेळ निश्‍चित केली. पुढे संशोधकांनी समुद्री शंखांच्या अचूक थ्रीडी प्रतिमा तयार करण्यासाठी संगणकीकृत टोमोग्राफी स्कॅनर वापरला, ज्याचा व्यास एक मिलिमीटरपेक्षा कमी आहे. त्यांना आढळले, की शंखाच्या सरासरी सर्व आधुनिक नमुन्यांमध्ये ऐतिहासिक नमुन्यांपेक्षा पातळ टरफले होती. ‘एन. ड्युटरटेरी’ या समुद्री जिवाचे टरफल तर ७६ टक्के पातळ होते. शास्त्रज्ञांनी अलीकडेच ‘सायंटिफिक रिपोर्ट’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित केला आहे. सागरी जिवाच्या काही आधुनिक नमुन्यांमध्ये कवच इतके पातळ होते, की त्याच्या काही भागाची प्रतिमा संगणकीकृत स्कॅनरद्वारे तयार करणे शक्‍य झाले नाही. या प्रयोगांच्या आधारे संशोधकांनी म्हटले आहे, की महासागरातील जीवन ज्याप्रमाणे आम्लतेत वाढ झाल्यामुळे धोक्‍यात आले आहे; त्याचप्रमाणे आम्लीकरणाशी संबंधित इतर घटकांचा, ज्यात उष्ण पाणी आणि ऑक्‍सिजनचे कमी प्रमाण, यांचाही संबंध आहे. ब्रुकन युनिव्हर्सिटीमधील ब्रॅक्‍टोनिक फोरेमिनिफेराचा अभ्यास करणारे ललित जॉनकर्स म्हणतात, ‘‘महासागरातील आम्लतेबद्दल आपल्याला सध्या जी माहिती आहे, ती १९५०च्या दशकानंतर केलेल्या निरीक्षणावर आधारित आहे, जेव्हा महासागराच्या आम्लतेत आधीपासूनच वाढ होत होती. त्या आधीचे नमुने आपल्याला फक्त नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये मिळतात. आपल्याकडे समुद्री जिवांचा अनोखा खजिना उपलब्ध आहे.’’ महासागरांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी अतिरिक्त नमुने आणि समुद्रातील स्थान प्रयोगात समाविष्ट करण्यासाठी वैज्ञानिकांचा चमू कामाला गती देईल, अशी आशा जॉनकर्स यांनी व्यक्त केली आहे. लंडनच्या संग्रहालयातील दीडशे वर्षांपूर्वीचे हे सागरी नमुने आधुनिक जगाला कोणकोणत्या बाबींची ओळख करून देतील, हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT