Horn of Africa Ethiopia towards progress  sakal
संपादकीय

प्रगतीच्या दिशेने इथिओपिया!

इथिओपिया आफ्रिका खंडाच्या पूर्वेला स्थित आहे. ज्याला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणूनही ओळखले जाते. १९७०च्या दशकापर्यंत हा देश सोलोमन साम्राज्याच्या अधीन होता.

सकाळ वृत्तसेवा

इथिओपिया आफ्रिका खंडाच्या पूर्वेला स्थित आहे. ज्याला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणूनही ओळखले जाते. १९७०च्या दशकापर्यंत हा देश सोलोमन साम्राज्याच्या अधीन होता.

आपले पूर्वग्रह टाकून देण्याइतका नम्रपणा दुसऱ्या कशातच नाही. नुकतीच मी इथिओपियाला भेट दिली तेव्हा मला असाच अनुभव आला. खरे सांगायचे तर आफ्रिका खंडात मी पहिल्यांदाच गेले होते. तेथील देश, नागरी अशांतता, असुरक्षितता, विकासाचा अभाव याबद्दल माझ्या मनात अनेक नकारात्मक धारणा होत्या, पण सात दिवसांच्या माझ्या मुक्कामाच्या अल्पकाळात माझे केवळ इथिओपियाच नाही, तर आफ्रिकेबद्दलही मत बदलले. इथे सुरक्षेच्या कोणत्याही समस्या नव्हत्या. लोक विनम्र आणि मैत्री जागवणारे होते. येथील अन्न आणि संस्कृतीने मला भारतातील घराची आठवण करून दिली.

इथिओपिया आफ्रिका खंडाच्या पूर्वेला स्थित आहे. ज्याला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणूनही ओळखले जाते. १९७०च्या दशकापर्यंत हा देश सोलोमन साम्राज्याच्या अधीन होता. इटालियन लोकांनी येथे वसाहत स्थापन्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. स्वाभाविकच इथिओपियन लोकांना या गोष्टीचा अभिमान वाटतो, की ते कधीही बाह्यशक्तींच्या दीर्घकाळ गुलामगिरीत नव्हते. इथिओपियाने लष्करी सत्ता, गृहयुद्ध, दुष्काळ यांचा गेल्या पन्नास वर्षांत सामना केला आहे, पण मागील काही वर्षांमध्ये पूर्व आफ्रिकेत इथिओपिया एक महत्त्वाची शक्ती म्हणून उदयास आला आहे. देशाची झपाट्याने आर्थिक प्रगती होत आहे. त्यामुळे या प्रदेशात ते महत्त्वाचे स्थान प्राप्त करत आहेत.

पंतप्रधान अबी अहमद यांनी २०१८ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर दीर्घकाळ सुरू असलेल्या अशांततेला राजकीय आणि आर्थिक सुधारणांनी उत्तर दिले. शेजारील इरिट्रियाशी त्यांनी ऐतिहासिक शांतता करार केला. याचा परिणाम म्हणून त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले.

इथिओपियाची लोकसंख्या २०२०च्या जनगणनेनुसार ११५ मिलीयन आहे. नायजेरियानंतर इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वांत जास्त लोकसंख्या असणारा दुसरा देश आहे आणि तरीही खंडातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये इथिओपियाच्या आर्थिक वृद्धीचा दर ६.३ टक्के होता. गेल्या १५ वर्षांत इथिओपियाची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. (दरवर्षी सरासरी ९.५ टक्के). सार्वजनिक सेवा आणि उद्योगात केलेल्या गुंतवणुकीमुळे ही वृद्धी झाली आहे. इथिओपिया हा संधीचा प्रदेश बनत आहे. या वाढीस हातभार लावणारे अनेक घटक आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान अबी अहमद यांच्या शांततेच्या धोरणामुळे इथिओपियात व्यापार वाढण्यास मदत झाली. इथिओपियाच्या सर्व बाजूंनी विविध देशांच्या सीमा आहेत. इरिट्रिया, सोमालिया, केनिया, दक्षिण सुदान या देशांच्या सीमा इथिओपियाला लागून आहेत. या देशांमधील परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून अस्थिर आहे. अबी अहमद इथिओपियात शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. म्हणूनच इथिओपियासह सर्व देशांना व्यापार आणि आर्थिक वाढीच्या बाबतीत फायदा झाला. याआधी जवळपास दोन दशके इथिओपिया आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी शेजारच्या जिबूतीच्या (Djibouti) मुख्य बंदराचा वापर करत होता. दरम्यान, इरिट्रियाबरोबर झालेल्या शांतता करारामुळे, इथिओपियाने असाब आणि मासावा या इरिट्रियन बंदरांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय ते बर्बेरा, पोर्ट सुदान आणि लामू यांचा पर्याय आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच डेवेले मार्गे जिबुतीपर्यंतचा दक्षिणी कॉरिडॉर विकसित करण्याचीही शक्यता आहे. (उत्तरेकडील मार्गापेक्षा १५० किमी लहान).

एकाधिकारशाहीला दूर सारून प्रगतिशील, लोकशाही मार्गाने अर्थव्यवस्था खुली करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्था खुली करण्याच्या निर्णयामुळे इथिओपियाला युरोपियन युनियन, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून पाठबळ मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या इथिओपियन लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ज्यामुळे देश एक तरुण राष्ट्र बनत आहे. या मानवी संसाधनाचा आर्थिक वाढीच्या प्रक्रियेत उपयोग होणार आहे. तरुणांच्या शिक्षणावरही त्यांनी भर दिला आहे. २०१७ च्या जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे, की २००५ पासून येथील उच्च शिक्षणातील नोंदणी पाच पटीने वाढली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेही या नोंदणीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. २००५ मध्ये इथिओपियामध्ये फक्त आठ संस्था होत्या; तर २०१७ मध्ये ही संख्या ३६ पर्यंत पोहोचली. ज्यामुळे अनेक तरुणांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरही सरकारचा भर आहे. तरुणांनाही या क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. शैक्षणिक धोरणामध्ये ७०:३० गुणोत्तर निश्चित करण्यात आले आहे. याचा अर्थ ७० टक्के तरुणांना तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रशिक्षित केले जात आहे आणि उर्वरित ३० टक्के तरुणांना सामाजिक विज्ञान आणि मानववंश शास्त्रात प्रशिक्षित केले जात आहे. इथिओपियाला शिक्षण, प्रशिक्षण आणि उद्योगाच्या बाबतीत इतर देशांच्या बरोबरीने आणण्यात याचा उपयोग होत आहे. तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या आधारे उद्योग व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. इथिओपियामधील संसाधनाच्या वाजवी किमती आणि मानवी संसाधनाची उपलब्धता या सकारात्मक गोष्टी आहेत. देशातील तरुणांनी कौशल्ये आत्मसात केली तर हे मानवी संसाधन अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेली तांत्रिक धार देण्यासाठी इथिओपियाने २०२० मध्ये आपली पंचवार्षिक योजना सुरू केली. डिजिटल इथिओपिया २०२५ या राष्ट्रीय धोरणाच्या अंतर्गत चार प्रमुख क्षेत्रांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन होणार आहे. कृषी, उत्पादन, आयटी सेवा आणि पर्यटन ही ती क्षेत्रे आहेत. या क्षेत्रांच्या डिजिटायझेशनमुळे येत्या पाच वर्षांत देशाचा दर्जा जगातील मध्यम-उत्पन्न देशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याबरोबर इथिओपिया आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. तसेच सायबर-गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानावर काम करत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांची प्रतिभा ओळखत त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ बनण्यास सरकार मदत करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स क्षेत्र विकसित करण्यावरही सरकार भर देत आहे. या उपक्रमांकडे पाहिले तर इथिओपिया भविष्यासाठी काय तयारी करत आहे, हे लक्षात येईल.

इथिओपिया उद्योगांनाही प्रोत्साहन देत आहे. अलीकडच्या काळात स्टार्टअप्सच्या संख्येत वाढ झाली आहे. अदिस अबाबासारख्या मोठ्या शहरांमध्ये तीन कॉल- कॅब सेवा सुरू झाल्या आहेत. चामड्याच्या उत्पादनातूनही मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकते. इथिओपिया ही चामड्याच्या वस्तूंची एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक जागतिक ब्रँड ही उत्पादने घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या जागतिक ब्रँडच्या नावाखाली प्रीमियमवर विकतात. जर सरकारने यापैकी काही चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरांना त्यांचे स्वत:चे उच्च श्रेणीचे घरगुती ब्रँड तयार करण्यासाठी आणि विकण्यासाठी निधी दिला तर तो एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकेल, परंतु स्टार्ट-अप चळवळ खरोखरच योग्य दिशेने नेण्यासाठी विद्यापीठे, मोठ्या कंपन्या, सेवा पुरवठादार, संशोधन आणि निधी संस्था इत्यादींसारख्या विविध संस्थांकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

इथिओपिया भौगोलिकदृष्ट्या आफ्रिकेच्या शीर्षस्थानी आहे. आतापर्यंत इथिओपिया हे केवळ लांब पल्ल्याच्या हस्तांतरणाचे केंद्र होते आणि आता तयार कपड्यांच्या उत्पादनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. सर्व प्रगतिशील उपाय योजल्यामुळे ते मध्य-पूर्व आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक पसंतीचे स्थान बनले आहे. जे आतापर्यंत बांगलादेश, व्हिएतनाम इत्यादी आशियाई देशांवर उत्पादनासाठी अवलंबून आहेत. उत्पादन केंद्रे आणि युरोप, पश्चिम आणि मध्य-पूर्वेतील बाजारपेठांमधील अंतरामुळे त्यांना जास्त किंमत मोजावी लागते. इथिओपिया त्यांच्या तरुणांना प्रशिक्षित करू शकले तर धोरणात्मक स्थान आणि स्वस्तातील श्रमाच्या आधारे ते कपड्याच्या उत्पादनात अव्वल स्थानावर पोहोचतील.

आव्हाने

जागतिक नकाशावर आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी अनेक आव्हाने पेलण्याची गरज आहे. तुटपुंजी इंटरनेट सेवा आणि मोबाईल वापराची कमतरता हे पहिले आव्हान आहे. आज सर्व व्यवसायांत ऑनलाईन व्यवहार होत आहेत. त्यामुळे ही महत्त्वाची गरज आहे, पण इथिओपिया अजूनही कनेक्टिव्हिटीच्या समस्येशी झुंजत आहे. अर्थात, डिजिटल इथिओपिया २०२५ ही योजना या समस्येचे निराकरण काही प्रमाणात तरी यशस्वी ठरेल अशी आशा आहे. आर्थिक वाढीचा वेग चांगला असूनही ८९० डॉलर दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नासह इथिओपिया सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे. त्यामुळे या बाबतीत विशेष लक्ष देण्याची गरज आहे, पण ही समस्या दूर करण्यासाठी इथिओपिया सावकाश वाटचाल करत आहे. अलीकडच्या काळात याबाबत सुधारणा दिसून येत आहे. गेल्या दशकभरात सातत्यपूर्ण आर्थिक वाढीमुळे शहरी आणि ग्रामीण भागात दारिद्र्याचे प्रमाण कमी झाल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. २०११ मध्ये देशातील ३० टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. २०१६ मध्ये हे प्रमाण २४ टक्के झाले आहे, तसेच मानव विकास निर्देशांकातही सुधारणा झाली आहे.

कोविड-१९ ने २०१९ ते २०२१ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग कमी केला. उद्योग आणि सेवांमधील वाढही एकअंकी राहिली. तथापि, शेतीवर कोविड- १९ साथीच्या रोगामुळे फारसा परिणाम झाला नाही. ज्यावर ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अवलंबून आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वाढीतील शेतीच्या योगदानात किंचित सुधारणा झाली. एकूणच आव्हाने असूनही इथिओपिया विकासासाठी आणि समृद्धीसाठी सज्ज आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रगतिशील उपक्रम राबवले जात आहेत. उदाहरणार्थ, सरकारने २०१९ गृह-उत्पन्न आर्थिक सुधारणा अजेंड्यावर आधारित नवीन दहा वर्षीय विकास योजना सुरू केली, जी २०२०-२१ ते २०२९-३० पर्यंत चालेल. मागील दशकभरात विविध योजनांच्या मार्फत केलेली प्रगती टिकवून ठेवण्याचे इथिओपियाचे उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेला अधिकाधिक खासगी धोरणांकडे नेण्याचे धोरण आहे. कार्यक्षमतेला चालना देणे आणि झपाट्याने विकसित होऊ शकणाऱ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धेचे वातावरण तयार करणे हा त्यांचा हेतू आहे. (ऊर्जा, लॉजिस्टिक आणि दूरसंचार). तसेच, उद्योगस्नेही वातावरण तयार करणे आणि अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म असंतुलन दूर करण्याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. या सर्व गोष्टींवरून इथिओपिया कोणत्या दिशेने जात आहे याचे सकारात्मक चित्र उभे राहते. आगामी काळात इथिओपिया आफ्रिकन खंडासाठी प्रगती, समानता आणि शांततेचा प्रतीक बनू शकेल. त्यांच्या विकासाची कहाणी केवळ डोळे उघडणारी नाही, तर त्यात जाणीवपूर्वक लक्ष घालण्यासारखी आहे.

आफ्रिकेतील इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा जिथे मी सात दिवस राहिले, ती पूर्णपणे भारताची आर्थिक राजधानी मुंबईसारखीच आहे. मी तिथे जाईपर्यंत मला असेच वाटत होते, की इथिओपियात वंशभेदाची समस्या प्रचंड आहे आणि याचा त्रास तेथील नागरिक भोगत आहेत; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जसे चित्र निर्माण केले जाते, त्यापेक्षा इथिओपिया किती तरी वेगळा आहे.

- मालिनी नायर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT