Lokmanya Tilak sakal
संपादकीय

लोकमान्य आणि महाभारत

विविध विषयांचा सखोल अभ्यास हा लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा विशेष. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त (ता. १ ऑगस्ट) लोकमान्यांच्या तुलनेने अल्पपरिचित राहिलेल्या पैलूला उजाळा.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. सागर पाध्ये

विविध विषयांचा सखोल अभ्यास हा लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा विशेष. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त (ता. १ ऑगस्ट) लोकमान्यांच्या तुलनेने अल्पपरिचित राहिलेल्या पैलूला उजाळा.

‘शतकातल्या ग्रंथसंपत्तीत उठून दिसेल असा एखादा ग्रंथ निर्माण करेन’ या निर्धाराने लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेले ‘गीतारहस्य’ अनेकांना परिचित आहे. भगवद्-गीता म्हटलं म्हणजे ओघानेच महाभारत आले. टिळकांचा स्वतःचा महाभारताचा गाढा अभ्यास होता.

टिळकांच्या या महाभारताच्या अभ्यासाबद्दल कित्येक शास्त्री-पंडित आणि विद्वानांनाही आश्चर्य व कौतुक वाटले आहे. रा. द. रानडे हे एक विद्वान टिळकांच्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाचा गौरव करताना म्हणतात, 'गीतारहस्यासारखा तुलनात्मक तात्त्विक ग्रंथ कोणासही लिहिता आला असता; पण महाभारताचा अत्यंत निकट परिचय अन्य कोणासही दृग्गोचर करता आला नसता.'

चिपळूणकर मंडळींनी प्रकाशित केलेल्या महाभारताच्या मराठी अनुवादाचा उपसंहार भारताचार्य चिं. वि. वैद्यांनी लिहावा, असे टिळकांनी सुचवले होते. टिळकांची विद्वत्ता आणि स्मरणशक्ती यांबद्दल विलक्षण आठवणी वैद्यांनी सांगितल्या आहेत.

'महाभारतात चीनच्या इतिहासाचा उल्लेख येतो, याचा उपयोग तुम्ही केला आहे का?', 'महाभारतांतील रथांना चाके चार की दोन?' असे प्रश्न टिळक चिं. वि वैद्यांना विचारत. त्याचवेळेस टिळक चटकन महाभारतातील नेमके पर्व, श्लोक व प्रसंगही वैद्यांना दाखवत, यामुळे टिळकांच्या चिकित्सायुक्त आकलनाबद्दल वैद्यांची खात्री पटली होती (आठवणी आख्यायिका, खंड १)

स्वतः टिळकांवर महाभारताचा प्रभाव होता. 'माझे राजकारण तुम्हाला गीतारहस्यात दिसेल. स्वराज्य हा माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे, हे जे मी म्हणतो तें कार्याकार्य शास्त्रातील आत्मस्वातंत्र्याच्या सिद्धांतातून निष्पन्न होते.” असे टिळक म्हणाले होते. बंगालच्या फाळणीने हिंदुस्थान हादरलेला असताना, टिळकांनी ‘आशेची निराशा आणि निराशेची आशा’ असा एक लेख प्रसिद्ध केला.

त्याची सुरुवातंच मुळी ‘आशा बलवती राजन् नैराश्यं परमं सुखम्।’ या महाभारतातील श्लोकाने केलेली आहे. याच लेखात ‘उद्धरेदात्मनात्मानं’ या गीतेतील वचनाचा उल्लेख करून आपला उद्धार आपणच करावा, असाही उपदेश त्यांनी भारतीयांना केला आहे.

युरोपात जेव्हा महायुद्ध पेटले, तेव्हा टिळकांनीही भविष्यावर दृष्टी ठेवून ‘ही वेळ आहे, लष्करात शिरा’ असा लेख लिहिला. त्यात ‘हे पार्था, अनायसेच स्वर्गाचे द्वार म्हणून प्राप्त झालेली ही संधी सोडू नको’ या कृष्णाच्या उद्गारांची आठवण करून देऊन टिळक लष्करात भरती होण्यासाठी भारतीय तरुणांना आवाहन करू लागले (समग्र टिळक, खंड ३, ४).

मार्च १९०५ ते मे १९०५ या दोन-अडीच महिन्यांत टिळकांनी महाभारतावर आठ लेख लिहून प्रसिद्ध केले (समग्र टिळक, खंड ५). भरतकुलातील पुरुषांच्या इतिहासास ‘भारत’ हेच नाव पुरेसे आहे, ते मागाहून ‘महाभारत’ झाले असावे, हे चिं. वि. वैद्यांचे मत टिळकांनाही मान्य होते. मात्र व्यास, वैशंपायन व सौती यांनी प्रत्येकी ‘जय’, ‘भारत’ व ‘महाभारत’ रचले, यास काहीही पुरावा नाही, हे टिळकांनी नमूद केलेले आहे.

महाभारत संहितेस एक लाख श्लोकांचे स्वरूप इ. पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात प्राप्त झाले असावे, असे टिळकांचे मत होते. ‘आर्ष महाकाव्य’ म्हणून टिळकांनी साहित्य, इतिहास व काव्य म्हणून महाभारताचे जे परीक्षण केले आहे, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

‘शतपथ ब्राह्मण’ग्रंथात परीक्षितपुत्र जनमेजयाचा उल्लेख आहे; पण युधिष्ठिरादी पांडवांचा नाही, यावरून काही पाश्चिमात्य विद्वानांनी जनमेजय खरा; पण पांडव काल्पनिक अशी मांडणी केली. पाश्चात्यांचे हे मत टिळकांनी सप्रमाण खोडून काढले; उलट इतिहासात जनमेजय नावाने दोन राजे असून, शतपथ ब्राह्मणग्रंथातील परीक्षितपुत्र जनमेजय हा पांडवांचा वंशज नसून पूर्वज आहे, हे पुराव्यांसकट दाखवून दिले.

‘मॅगेस्थिनीस’ नावाचा ग्रीक वकील चंद्रगुप्ताच्या दरबारात होता. या मॅगेस्थिनीसने केलेल्या वर्णनावरून महाभारताचा काळ ठरवण्याचा प्रयत्न चिं. वि. वैद्य यांनी केला होता. या ग्रीक ग्रंथाचा आणि महाभारताचा सखोल अभ्यास करून टिळकांनी वैद्यांच्या निष्कर्षातील त्रुटी दाखवून दिल्या; इतकेच नव्हे, तर मॅगेस्थिनीसच्या ग्रंथातील उल्लेख आणि महाभारतातील वंशावळी यांचा सखोल अभ्यास करून त्याचे तुलनात्मक विवेचन केले.

महाभारत हा लोकशिक्षणाचा भाग

टिळक हे उत्तम गणिती होते, ज्योतिषग्रंथांचे जाणकार होते. आपल्या या ज्ञानाचे उपयोजन त्यांनी महाभारत अभ्यासासाठी केले नसते, तरंच नवल! टिळकांनी महर्षी गर्ग, आर्यभट्ट यांपासून ते चिं. विं वैद्य, लेले व मोडक अशा अनेक विद्वानांच्या निरीक्षणांतील व गणितांतील त्रुटी दाखवून दिल्या. इतकेच करून टिळक थांबले नाहीत.

एकीकडे ‘भारतीय असंतोषाचा जनक’ ठरून इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवणारा हा माणूस दुसरीकडे वेद, पुराणे, कल्हणाच्या राजतरंगिणीसारखे इतिहासग्रंथ यांचा अभ्यास करून, गणिते मांडत महाभारताचा काल ठरवण्याचा उद्योगही करत होता!

आज शालेय अभ्यासांत रामायण-महाभारत असावे, की असू नये; यावर सातत्याने चर्चा चालू असते. ज्यांना रामायण म्हणजे 'राम-रावण युद्ध' आणि महाभारत म्हणजे 'कौरव-पांडवांची भांडणे' यापलीकडे काहीही माहिती नाही, अशांना याबद्दल साहजिकंच अचंबा वाटतो. लोकमान्य टिळक मात्र महाभारत हा लोकशिक्षणाचा भाग असावा यासाठी आग्रही होते.

दत्तात्रय लिमये यांनी लिहिलेल्या ‘संपूर्ण महाभारत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत टिळकांनी ही संकल्पना विस्तृतपणे मांडून ‘आमच्या राष्ट्रीय ग्रंथाची पूर्ण ओळख मराठी सहाव्या इयत्तेची किंवा इंग्रजी मॅट्रिकची परीक्षा पास होण्यापूर्वी कोणाही विद्यार्थ्यास करुन दिली पाहिजे’, असे मत व्यक्त केले.

टिळकांना विनम्र अभिवादन करून महाभारताचे महत्व सांगणाऱ्या त्यांच्याच एका विधानाने लेखाचा समारोप करतो - ‘आर्ष महाकाव्य’ किंवा ‘एपिक पोऐट्री’ या नात्याने महाभारत सर्व काव्यांत श्रेष्ठ आहे. इतकेच नव्हे तर आचार, व्यवहार, राजनीती, धर्म, अध्यात्म, प्राचीन इतिहास वगैरे अनेक बाबतींत भारतीय लोकांचे महाभारत म्हणजे एक अनुपम व अक्षय्य ज्ञानभांडार होऊन राहिले आहे.’

(लेखक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, टिळक चरित्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT