maharashtra politics devendra fadnavis conspiracy lok sabha election 2024 Sakal
संपादकीय

ढिंग टांग : गेले, ते दिन गेले..!

करावे तसे भरावे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, पुढच्यास ठेच मागचा शहाणा, सौ दिन सास के, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले…मराठीतील अशा बऱ्याच म्हणी!

- ब्रिटिश नंदी

आजचा दिवस : क्रोधी नाम संवत्सर श्रीशके १९४६ वैशाख कृ. त्रयोदशी.

आजचा वार : निर्बुध्दवार.

आजचा सुविचार : करावे तसे भरावे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, पुढच्यास ठेच मागचा शहाणा, सौ दिन सास के, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले…मराठीतील अशा बऱ्याच म्हणी!

न मो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) कालपासून कानात सारखे खटाखट खटाखट खटाखट खटाखट खटाखट असे आवाज येत आहेत. डोळे मिटले की हे असले आवाज येतात, आणि उघडले की मिटावेसेच वाटतात. हा दिवस दिसेल असे वाटले नव्हते…

मन विषण्ण झाले आहे. इतके सारे प्रयत्न करुनही शेवटी नशिबी भोपळा आला. कालपर्यंत मज्जेत होतो. विजयाचे किमान तीसपस्तीस लाडू खाईन, असे वाटले होते. दहा हजार बुंदीच्या लाडवांची ऑर्डरही दिली होती.

लाडू बनवणाऱ्या हलवायाने दहा हजार लाडवांचे खोके (हा शब्द आला की अंगावर शहाराच येतो. बॉक्से म्हणावे!) आणून पक्ष कार्यालयात आणून टाकले. त्याचे करायचे काय? असा प्रश्न पडला. पण तिथेही महाविकास आघाडीवाल्यांनी वाचवले. ‘अर्ध्या किंमतीत सगळे लाडू घेतो’ अशी ऑफर दिली. जाऊ दे.

दिवसभरात एकही फोन घेतला नाही. सकाळी उठून स्नानादी कर्मे उरकून टीव्हीसमोर बसलो. तासाभरात पोटात खड्डा पडतोय असा भास होऊ लागला. चॅनल बदलून बघितले, पण व्यर्थ! एकाही चॅनलवर जरा बरे वाटेल, अशी बातमी नाही. शेवटी सिनेमाच बघत बसावे, असे वाटू लागले. टीव्ही बंद केला.

संध्याकाळी चारच्या सुमारास घाबरत घाबरत आमचे नवे मित्र दादासाहेब बारामतीकरांना फोन केला. त्यांनी उचलला, पण बोलले काहीच नाहीत. थोडा वेळ शांतता पसरली. मी नुसते ‘हलो’ म्हटले तर समोरुन चक्क हुंदका ऐकू आला.

मी ‘बरं बरं, नंतर फोन करतो’ असे सांगून फोन ठेवला. थोड्या वेळाने आमचे ठाण्याचे मित्र कर्मवीर भाईसाहेबांचा फोन आला. ते नेहमीप्रमाणे उत्साहात होते. कल्याण आणि ठाणे त्यांनी जिंकले होते. त्यांनी फोनवर विचारले, ‘‘काहो, जिंकलो की आपण, आवाज का पडलाय तुमचा?’‘ मी पुन्हा फोन ठेवला. काय बोलणार?

त्यानंतरच कानात ते खटाखट खटाखट खटाखट असे आवाज येणे सुरु झाले. ‘इंडिया’वाल्या राहुलजींनी खटाखट खटाखट यश मिळणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले होते, तेव्हा आम्ही त्यांना खूप हसलो होतो.

यावर उपाय म्हणून दिल्लीला पक्षश्रेष्ठींना दोन-तीन फोन करुन पाहिले. कोणीही फोन उचलायला तयार नाही. शेवटी पूजनीय नड्डाजींनी फोन उचलला. त्यांनी सांगितले की, ‘‘मान्यवर, जय-पराजय तो होती रहती है! कानात तीळाचे तेल घाला, आवाज थांबतील. डोक्याला तेलाने मालिश करा. ठंडा ठंडा कूल कूल!’’ मी निमूटपणाने फोन ठेवून दिला.

रात्री उशीरा फोन सहज बघितला तर आमचे जुने मित्र माननीय उधोजीसाहेबांचे सतरा मिस्ड कॉल होते. मी उचलला नाही, तेच बरे झाले!! चारेक वर्षापूर्वी त्यांनी आमचा कात्रज केला होता, तेव्हा आम्ही त्यांना सतरा फोन केले होते. त्यांनी उचलले नव्हते. एकेकाचे दिवस असतात.

पुढल्या विधानसभा निवडणुकीत या पराभवाचे व्याजासह उट्टे फेडू, असे सांगून मी वेळ मारुन नेली खरी, पण…उधोजीसाहेबांनी जो रात्री मेसेज पाठवला, तो नको पाठवायला होता. त्यांचा मेसेज होता : जैसी करनी, वैसी भरनी…माझा शाप लागला! जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT