संपादकीय

आनंददायी अवकाश

अलीकडच्या कालखंडात जग दिवसेंदिवस खूप जवळ आल्यासारखे वाटते. भारतीय मुलांना परदेशातील नोकरीच्या संधी खुणावत आहेत. अनेक तरुण-तरुणी परदेशात नोकरी-शिक्षणासाठी जाताहेत.

महेंद्र सुके mahendra.suke@esakal.com

अलीकडच्या कालखंडात जग दिवसेंदिवस खूप जवळ आल्यासारखे वाटते. भारतीय मुलांना परदेशातील नोकरीच्या संधी खुणावत आहेत. अनेक तरुण-तरुणी परदेशात नोकरी-शिक्षणासाठी जाताहेत.

अलीकडच्या कालखंडात जग दिवसेंदिवस खूप जवळ आल्यासारखे वाटते. भारतीय मुलांना परदेशातील नोकरीच्या संधी खुणावत आहेत. अनेक तरुण-तरुणी परदेशात नोकरी-शिक्षणासाठी जाताहेत. कुणी तिकडेच स्थायिक होत आहेत. त्यांची भविष्याची स्वप्नं साकार होत आहेत; पण त्यांच्या आई-वडिलांना आयुष्याच्या संध्याकाळी मुलांचा आधार मिळत नसल्याचे शल्य बोचते, रुतते आहे. त्यांना पैशापाण्याची चिंता नसते; पण अखेरचा श्‍वास घेतानाही आपला पोटचा मुलगा आपल्याजवळ नसेल, या भीतीने अनेक पालकांचा श्‍वास कोंडतो आहे. हे वास्तव नवे नाही, इतक्या निगरगठ्ठपणे समाज आता त्या पालकांच्या दु:खाकडे सराईतपणे बघायला लागला आहे. त्यावर उपाय काय, या गंभीर प्रश्‍नाची गुंतागुंत प्रयोगशील लेखक प्रशांत दळवी यांनी ‘संज्या-छाया’तून मांडली आहे.

मंत्रालयात उपसचिवपदावरून निवृत्त झालेले संजय पाटील अर्थात संज्या (वैभव मांगले) आणि त्यांची पत्नी छायाच्या (निर्मिती सावंत) घरात हे नाटक घडते. या स्थळदर्शक घरातील संवाद मात्र रसिकांना डोंबिवली, मंत्रालय, आझाद मैदान, न्यायालय, दिल्लीपासून थेट अमेरिकेपर्यंत चौफेर फिरवतात. संजय पाटील निवृत्तीनंतरचा काळ अडल्या-नडल्यांची कामे करून देण्यासाठी घालवतात. त्यांच्या पत्नीही ‘छाया टिफिन्स’च्या माध्यमातून अनेक महिलांना रोजी-रोटी देण्याचे काम करताहेत. हा समाजसेवेचा वसा त्यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर त्यांच्या अनेक मित्रमंडळीलाही ‘या हॅपीनेस सेंटर’शी जोडले आहे. ते गरजूंच्या मदतीला धावणारे आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी याच उपक्रमात डॉ. भागवत (अभय जोशी), रघू (आशीर्वाद मराठे), सदावर्ते मास्तर (मोहन साटम), इन्स्पेक्टर गायकवाड (संदीप जाधव) हे सारे व्यग्र आहेत. त्या व्यग्रतेत त्यांना जगण्यातला आनंद गवसला आहे. अशाच कामात ‘संज्या-छाया’ची धावपळ सुरू असताना किशोर नावाचा (राजस सुळे) एक तरुण संज्या-छायाचा अमेरिकेत राहणारा मुलगा कुणालचा एक निरोप घेऊन येतो. तो निरोप सांगण्याचे धाडस त्याला होत नाही. त्याला धीर देत संज्या-छाया निरोप सांगायला भाग पाडतात; पण त्या निरोपाने संज्या-छायाला राग येत नाही, उलट मुलाचा त्यांना अभिमान वाटतो. कुणालने अमेरिकेत तिथल्याच एका मुलीशी लग्न केले, असा हा निरोप असतो. तो ऐकून संज्या-छायाचा आनंद ओसंडून वाहतो. हे नाटक असेच धक्क्यांवर धक्के देत रंगत जाते आणि नाटक शेवटाला जाताना त्यांच्या या आनंदात जगण्याचे रहस्य प्रेक्षकांनाही चकित करते.

या कथेत न्यायमूर्ती कानविंदे आणि मिसेस कानविंदे या आणखी दोन व्यक्तिरेखा महत्त्वाच्या. सुनील अभ्यंकर आणि योगिनी चौक-बोऱ्हाडे यांनी अभिनयसामर्थ्याने या व्यक्तिरेखांचे सोने केले आहे. संज्या आणि छायाच्या भूमिकांमध्ये वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांची जुगलबंदी अध्ये-मध्ये हसवते. कधी डोळ्याच्या कडा पुसायला लावते. कधी समाजातल्या व्यंगावर चपखल भाष्य करून चिमटेही काढते. या दोन व्यक्तिरेखांच्या हळुवार जुगलबंदीतील तन्मयता या कलाकृतीचा प्राण आहे. तो प्राणपणाने जपण्यात या कलावंतांनी कसर सोडली नाही. सर्वांनीच भूमिका यथोचित साकारल्या आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा स्वत:चे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. त्यातही किशोरची छोटीशी भूमिका वठवताना राजस सुळे यांनी केलेली बॅटिंग लक्षात राहणारी आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, पुरुषोत्तम बेर्डे यांचे पार्श्वसंगीत, प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा आणि रवि रसिक यांची प्रकाशयोजना हे सारे पडद्यामागचे तंत्र नाट्यविचार रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांची निर्मिती असलेले नाटक जिगीषा-अष्टविनायक या संस्थांच्या वतीने सादर झाले आहे. सूत्रधार प्रणीत बोडके आहेत. हे सारे या कलाकृतीच्या यशाचे वाटेकरी आहेत.

नाटक माणसाला हसवते, रडवते, विचार करायला लावते. त्यातून मानवी जीवन समृद्ध होण्याची शक्यता असते. याच शक्यतांचे अनेक धागे या नाटकाच्या निमित्ताने गुंफले गेले आहेत. मात्र ‘संज्या-छाया’च्या जगण्यातला आनंद प्रत्येकाच्या वाट्याला येईलच, हे सांगणेही कठीण आहे. आनंददायी जगणे सर्वांनाच आवडेल; पण त्यासाठी दु:खाचे डोंगर पार करावे लागतात. ऊन असेल तर सावलीचे महत्त्व कळेल, तसेच दु:ख असेल तर आनंदाला महत्त्व उरेल, हे जगण्याचे तत्त्वज्ञान ‘संज्या-छाया’च्या आनंददायी अवकाशात दडले आहे. लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या रंगकर्मींची नाट्यविचार करण्याची ताकद अनेक कलाकृतींतून सिद्ध झाली आहे. रसिकांना विचारप्रवृत्त करायला भाग पाडणारी आणि प्रयोगानंतरही रसिकांच्या मनात उलथापालथ करणारी ‘चाहूल’ या द्वयींनीच करून दिली होती. ‘संज्या-छाया’ नाटकाचा मात्र विषय तसा जुना; पण हसत-खेळत नव्या विचाराची पेरणी त्यात आहे. तो विचार समाजमनात रुजेल, अशी अपेक्षा करू या.

mahendra.suke@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT