PNE17N25662_org 
संपादकीय

शाळेच्या भिंती पाडून टाकूया 

प्रसाद मणेरीकर

शाळा ही व्यवस्था मुलांचं शिकणं "अधिक चांगलं' व्हावं या उद्देशाने उभी केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे या व्यवस्थेचा सारा विचार आणि भर हा मुलांचं शिक्षण अधिक चांगलं कसं होईल यावर हवा. चांगलं शिक्षण कशाला म्हणायचं याचं एक तत्त्व म्हणजे मुलांना भविष्यकालीन आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करणारं शिक्षण. त्यामुळे मुलांना भविष्यासाठी सक्षम करायचा विचार शिक्षणात व्हायला हवा. 

आज जगभरातील विविध क्षेत्रांतील विचारवंत, शास्त्रज्ञ पुढील वर्षांचा वेध घेत आहेत. या काळात कोणती कौशल्यं माणसाला गरजेची असतील, यावर विचार मांडले जात आहेत. ज्या वेगानं तंत्रज्ञान विकसित होतंय व पसरतंय त्या वेगाचा विचार केल्यास आणखी पन्नास- शंभर वर्षांनी जग कुठे असेल याचा केवळ अंदाजच बांधता येतो. मग या सगळ्यांत आपल्या आजच्या शिक्षणाचं काय, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. 

आजची शालेय व्यवस्था बंदिस्त स्वरूपाची आहे. हा बंदिस्तपणा केवळ शाळेच्या चार भिंतींपुरताच मर्यादित नाही, तर विषयांपासून ते अभ्यासक्रमापर्यंत सर्वच ठिकाणी आपण बंदिस्तपणा आणला आहे. आपण विषयांच्या भिंती उभ्या केल्या आहेत. एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी काही संबंध आपण बांधत नाही वा बांधायला मुलांना शिकवत नाही. याचा परिणाम असा होतो, की तो विशिष्ट विषयही आपल्याला पुरेसा स्पष्ट होत नाही. आपण इयत्तांच्या भिंती उभ्या केल्या आहेत. 

एका इयत्तेचा दुसऱ्या इयत्तेच्या मुलांशी कधी फारसा संबंध येतच नाही. आलाच तर तो मैदानी खेळांमध्ये काहीसा येतो. तोही आपण जाणीवपूर्वक प्रस्थापित करतो म्हणून नव्हे. इतकंच काय, पण एका इयत्तेच्या दोन तुकड्यांमधील मुलांचाही एकमेकांशी संबंध येत नाही. अशीच आणखी एक भिंत आहे ती हुशार आणि ढ अशी. ही भिंत एकाच वर्गात विविध क्षमतांची मुलं असली तरी त्यांच्यामध्ये असते. अध्ययन अक्षम आणि सक्षम अशा नावांनी ती एकमेकांना ओळखतात किंवा क्षमतेनुसार तुकड्या केल्या (व त्यांना कितीही गोंडस नावं दिली) तरीही भिंत असते. 

सहकार नावाचं सार्वजनिक जीवनात जगताना पदोपदी उपयोगी पडणारं तत्त्व आपण शिक्षणातून कायमचं हद्दपार केलं आहे. अशा अनेक प्रकारच्या भिंती उभारणं आपल्या सोयीचं असतं, कारण या भिंतीच्या आत एका विशिष्ट अशा व्यवस्थेत आपल्याला मुलांना बांधता येतं. त्यांचं आपल्या सोयीने मूल्यमापन करता येतं. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात याच्या उलट स्थिती असते. इथे जगताना विविध घटकांचा एकत्रित 
विचार करावा लागतो. रोज समोर येणारे प्रश्न हे विविधांगी असतात व त्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यावहारिक कौशल्यं पणाला लावावी लागतात. शाळेत नेहमी समवयस्क मुलांचा गट असतो, तर समाजात सातत्याने भिन्न वयस्कांशी व्यवहार करावा लागतो, जुळवून घ्यावं लागतं, वाद करावा लागतो, आपलं म्हणणं पटवून द्यावं लागतं. शालेय पुस्तकांतील नियम- व्याख्या- प्रमेयं कितीही पाठ केली, परीक्षेत लिहिली तरी रोजच्या जगण्यात त्याचं व्यावहारिक रूपच वापरावं लागतं. मग प्रश्न असा पडतो, की मुलाला ज्या भिंतीच्या बाहेरच्या जगात वावरायचं आहे, त्यासाठीचं शिक्षण भिंतीच्या आत बसून घेऊन कसं चालेल? आणि ते शिक्षण बाहेरच्या जगात कसं उपयोगी ठरेल? 

विनोबांनी शिक्षणविषयक एका लेखात लिहिलंय, "अश्व या शब्दाचा अर्थ घोडा असं 
आपण सांगतो; पण तो केवळ पर्यायी शब्द किंवा प्रतिशब्द झाला. अश्व याचा अर्थ मुलांना कळायला हवा असेल, तर तो तबेल्यात जाऊन दाखवायला हवा.' मुद्दा स्पष्ट आहे. आपल्याला शालेय शिक्षण आणि शाळेबाहेरचा परिसर म्हणजे समाज यांना एकत्र जोडावं लागणार आहे आणि त्यानुसार आवश्‍यक ती शिक्षणाची रचना करावी लागणार आहे. 

शाळेत एकाच वयोगटाच्या मुलांनी एकत्रित काम करण्यापेक्षा विविध वयोगटांतील मुलं जितकी एकमेकांशी मिळून मिसळून काम करतील, त्यातून ती अधिक कौशल्यं आत्मसात करतील. एकमेकांना शिकवतील, एकमेकांकडून शिकत जातील. ही घुसळण त्यांना भविष्यात जीवन जगताना उपयोगी ठरेल. आपल्या भोवतालच्या जीवनात, समाजात विविधता आहे. ही विविधता समजून घेताना 
त्यात असणारी समान सूत्रंही समजून घ्यावी लागतात, तरच ती विविधता नीट समजून घेता येते. हे समजून घ्यायला आजची आपली शालेय शिक्षणपद्धती वाव देत नाही ही तिची मोठी मर्यादा आहे. हा जगण्याशी संबंध न जोडता आल्याने अनेकांसाठी हे शिक्षण अनाकलनीय म्हणून कंटाळवाणं आणि म्हणून परीक्षेत नापास करणारं ठरतं. 

बाहेरच्या जगात जगताना सतत तर्क करावे लागतात, अंदाज बांधावे लागतात आणि हे 
सर्वांनाच करावं लागतं. व्यवसायाची जी गणितं मोठमोठ्या उद्योगपतींना मांडावी लागतात तशीच गणितं कोपऱ्यावर भाजी विकणाऱ्या वा भेळेची गाडी चालवणाऱ्यालाही मांडावी लागतात. यासाठी आवश्‍यक क्षमता शिक्षणाने विकसित करायला हव्यात आणि त्या पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारातून करायला हव्यात. कौतुक म्हणून शाळेत एक दिवस बालजत्रेचा साजरा करून मजेच्या पलीकडे काही निष्पन्न होत नसतं. 
गांधीजींनी "नयी तालीम' मांडताना मूलोद्योगाशी शिक्षण जोडलं. 

ते चार भिंतींच्या बाहेर काढलं, व्यवहारात उतरवलं. यामागचा मूळ विचार हा मुलांच्या क्षमतांच्या वापराचा आणि विकासाचा आहे. करून शिकण्याचा विचार हा सर्जक विचार आहे. गांधीजींनी शिक्षण हे परिसरातल्या उद्योगांशी जोडलं. कारण ते उद्योग मुलांच्या अनुभवात होते, दैनंदिन जीवनाशी निगडित होते आणि उद्योग करता करता मुलं विषय शिक्षण सहजतेने घेऊ शकतील याची त्यांना खात्री वाटत होती. आपण शिक्षणाच्या गुणवत्तावाढीचा विचार करत असू आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी हे आपलं ब्रीद असेल, तर त्यासाठी शिक्षणाची नवी रचना करायला हवी. त्याची सुरवात करूया, शाळांच्या भिंती पाडून टाकूया. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT