editorial pune edition North East is the best 
संपादकीय

नॉर्थ-ईस्ट इज द बेस्ट! 

सकाळवृत्तसेवा

प्रिय कमळे, सप्रेम नमस्कार. जिंकलीस हो! शतप्रतिशत जिंकलीस!! ह्याच दिवसांसाठी आम्ही एकेकाळी गावोगाव पणत्या लावीत हिंडत होतो. सायकली मारत गावोगाव प्रचार करीत होतो. तेव्हा कुणी आम्हाला सांगितले असते, की त्रिपुरात तुमचा मुख्यमंत्री बसणार आहे, तर आम्ही ख्यॅख्यॅ करून हसलो असतो. एरवी आम्ही हाडाचे कार्यकर्ते कधी असे हसत पाहिले आहेस का? नसणारच. कारण श्रीमान नमोजी हसले तरच आम्ही हसतो ! नमोजी हसले की आम्ही आमचे कमळाध्यक्ष श्रीमान मोटाभाई ह्यांच्याकडे पाहतो. त्यांनी खूण केली की मगच हसतो. पण ते असू दे. सर्वप्रथम तुझे हार्दिक अभिनंदन. 

हल्ली तुला विजयाची चटकच जणू लागली आहे. चटक कसली, व्यसनच ते ! ऊतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. बरीच वर्षे तुझ्या पत्रिकेतला कुठला ग्रह वक्री होता, कुणास ठाऊक. त्रिपुरा, नागालॅंड वगैरे राज्यांत तुला चांगले यश मिळाले आहे. ह्या विजयाचे श्रेय सारीजणे त्रिपुरातल्या कार्यकर्त्यांना देत आहेत. पण मी खरे काय ते सांगतो. ह्या नेत्रदीपक विजयाचे श्रेय राजधानीतल्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील पक्षाच्या नव्या वास्तुला आहे. ह्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतरच विजयाचे दान तुझ्या पदरात पडले, हे विसरू नकोस. राजस्थान, मध्य प्रदेशमधल्या पोटनिवडणुकांमध्ये दैना झाल्यावर ही वास्तू शास्त्रोक्‍त पद्धतीने बांधण्यात आली नसल्याची टीका मध्यंतरी छापून आलेली होती. वास्तुशास्त्रानुसार घराचे दार नॉर्थ-ईस्ट फेसिंग असणे बरे असते म्हणे. नॉर्थ-ईस्ट चांगली राखली म्हणून काम फत्ते झाले, असे श्रीमान नमोजी त्यांच्या भाषणात म्हणाले, ते काही उगीच नाही. त्यांना वास्तुशास्त्रातले कळते, आणि श्रीमान अमितभाईंना थेट कुंडलीच मांडता येते म्हणे. ह्या दोघांच्या कर्तृत्वामुळेच पक्षाला हे (पक्षी : चांगले) दिवस दिसत आहेत. पक्षकार्यालयात सुख-शांती नांदू लागली आहे. 

बाय द वे, त्रिपुरा-नागालॅंडचे निकाल येत असताना आम्ही काही हाडाचे कार्यकर्ते नेमके दिल्लीत होतो. हल्ली दिल्लीतले पर्यटनवाले "यह देखिए भाजपाका नया घर' असे बसमधून हिंडून दाखवतात. आम्हीही बघितले. सोहळ्याच्या थोडा वेळ आधीच आम्ही तिथे पोचलो. आपल्या लाडक्‍या पक्षाचे कार्यालय आतून बघावे, अशी अनिवार इच्छा होती. पण केवढे ते जिने !! ते बघून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना दम लागला !! त्यात हल्ली गुडघे दुखतात. इमारत सजवलेली होती. त्रिपुरा जिंकल्याबद्दल वरती लाडू वाटताहेत, असे कळल्याने आम्ही शेवटी मनाचा हिय्या केला. तेवढ्यात वर पाहिले तर इमारतीच्या उंच सौधावर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक लालजीभाई अडवानीजी उभे होते. ते "वर या, वर या' अशा सारख्या खुणा करत होते. मी खालूनच ओरडलो, ""अजून लाडू उरलेत का? वर कशाला?'' तर ते ओरडून म्हणाले, "लाडू संपले, पण मला खाली यायचे आहे, जिना सापडत नाहीए !' 
"आलोच' असे सांगून आम्ही सटकलो !! असो. 

कार्यक्रमानंतर आम्ही कमळाध्यक्ष मोटाभाईंना भेटलो. त्यांच्या गळ्यात एक झेंडूच्या फुलांचा हार घातला. त्यांनी "लाडू मळ्या के?' असे प्रेमाने विचारले. मला नीट ऐकू आले नाही. मी दोन बोटे दाखवली. तिथेच फसलो ! कारण मी साधी व्हिक्‍टरीची खूण करत होतो. त्यांना वाटले मी दोन लाडू लाटले !! कार्यकर्त्यांचे असेच असते. मोटाभाईंनी तातडीने कर्नाटकात कार्य करण्यासाठी जाण्यास फर्मावले आहे. तिथे पोचलो की कार्ड टाकीन. चिंता नसावी. कळावे. लोभ असावा. तुझाच निरलस कार्यकर्ता. 

ता. क. : कांग्रेसचे कार्यालयसुद्धा आपल्या नजीक बांधले जाणार आहे. पण त्यांना ऍड्रेसमध्ये "दीनदयाळ मार्ग' असे नको असल्याने ते प्रवेशद्वार पलीकडच्या बाजूला कोटला मार्गावर काढणार आहेत. याचा अर्थ नॉर्थ-ईस्ट गेली !! पुन्हा लाडू मिळणार !! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT