Representational Image 
संपादकीय

...तोचि 'राष्ट्रप्रेमी' ओळखावा (सुभाष वारे)

सुभाष वारे

सध्याच्या काळात काही लोकांनी 'राष्ट्रद्रोही' हा शब्द चलनी नाणे करून टाकला आहे. राष्ट्रप्रेमाची व्याख्यासुद्धा इतकी स्वस्त करून टाकली आहे की बोलायलाच नको. तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला आलात की तुम्ही आपोआप राष्ट्रप्रेमी. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे सभासद झालात किंवा किमान सत्तापक्षाच्या धोरणांचे समर्थक झालात की तुम्ही राष्ट्रप्रेमी. गाईला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून गुंडगिरी केलीत की तुम्ही राष्ट्रप्रेमी. असे एकूणच राष्ट्रप्रेमाचे घाऊक कंत्राट सध्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटना आणि व्यक्तींनी घेऊन टाकले आहे. 

या देशाला राज्यघटना आहे. तीत नागरिकत्वाची धर्मनिरपेक्ष अशी व्याख्या आहे. नागरिकांनी कुठली मूलभूत कर्तव्ये पाळावीत, याबद्दल राज्यघटना नेमकेपणाने भाष्य करते. या मूलभूत कर्तव्यात राष्ट्रध्वजाबद्दल आदर बाळगायला राज्यघटना जसे सांगते, तसेच या देशाच्या बहुविध संस्कृतीबद्दल आदर बाळगायला आणि तिचे संवर्धन करायलाही सांगते. दुसऱ्या धर्माबद्दल किंवा वेगळी आस्था बाळगणाऱ्याबद्दल द्वेषभाव न ठेवण्याची अपेक्षा करते. महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करायला राज्यघटना सांगते. आपल्या जगण्याच्या पद्धतीत पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगते. व्यक्तिगत जीवनात सुधारणावाद, शोधक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची अपेक्षा करते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करण्याचे कर्तव्य सांगते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपले काम शिस्तीने, मेहनतीने, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी संसाधने वापरून, पण गुणवत्तापूर्ण असे पार पडावे; जेणेकरून देश उन्नतीच्या चढत्या श्रेणी गाठेल ही राज्यघटनेची नागरिकांकडून अपेक्षा आहे. 

या पार्श्वभूमीवर एखादा सरकारी अधिकारी त्याच्या कार्यालयात आलेल्या नागरिकाला साध्या साध्या कामासाठी हेलपाटे मारायला लावत असेल, कागदावर वजन ठेवल्याशिवाय सहीच करत नसेल, दुसरा एखादा नागरिक व्यापारी असेल आणि गिऱ्हाईकाकडून अव्वाच्या सव्वा नफा उकळत असेल आणखी एखादा नागरिक दुसऱ्या धर्माच्या नागरिकांबद्दल द्वेष पसरवत असेल, एखादा नागरिक जातीआधारित उच्चनीचता मनात ठेवून दुसऱ्याबद्दल हिणकस शेरेबाजी करत असेल, एखादा नागरिक घरातील / कार्यालयातील महिलांशी अरेरावीने वागत असेल, एखादा नागरिक हुंड्याचा आणि त्याबरोबरच लग्नात वधुपित्याकडून पाय धुऊन घेण्याचा आग्रह धरत असेल, एखादा प्राध्यापक मजबूत पगार घेऊनही वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या नोट्‌स घेऊन शिकवत असेल, एखादा विद्यार्थी कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करत असेल... आणि हे सर्व नागरिक रोज उठल्याबरोबर आणि झोपायला जाण्यापूर्वी 'भारतमाता की जय' म्हणत असतील किंवा तिरंग्याला न चुकता सलामी देत असतील तर केवळ तेवढ्याने ते राष्ट्रप्रेमी ठरतील काय? की राष्ट्रप्रेमी बनण्यासाठी नागरिकांकडून आणखी काही जास्तीचे अपेक्षित आहे? नागरिकत्वाच्या कर्तव्यांचे कोण किती पालन करतो यावर देशप्रेमाची व्याख्या आपण कधी ठरवणार आहोत? 

अलीकडच्या काळातील एक उदाहरण नमूद करण्यासारखे आहे. सध्याच्या काळातील बहुतेक सर्व शेतकरी आंदोलक स्वातंत्र्यलढ्याशी नाते सांगणारे आहेत. राष्ट्रध्वजाबद्दल आदरभाव बाळगणारे आहेत. पण आपल्या आंदोलनाच्या रणनीतीचा भाग म्हणून ते, शेतकरी समाजास न्याय देण्यास अपयशी ठरलेल्या सरकारच्या प्रतिनिधीने म्हणजेच पालकमंत्र्याने ध्वजारोहण करू नये, अशी भूमिका घेत असतील तर लगेच त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करणे आक्रस्ताळे आणि बेजबाबदार ठरते. शेतकरी आंदोलकांची भूमिका ध्वजवंदन होऊ नये, अशी कधीच नव्हती. 'एखादा शेतकरी अथवा हुतात्मा जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करा, आम्हीही त्यात सामील होतो,' अशीच आंदोलकांची भूमिका होती. पण राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून आंदोलकांच्या भूमिकेचा विपर्यास केला गेला. पण यावरून करून समाजात चुकीचा संदेश देणे कितपत योग्य आहे? 

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दल आदरभाव मनात असलाच पाहिजे, पण केवळ तेवढ्याच मुद्द्याभोवती राष्ट्रप्रेमाची चर्चा घोळवत ठेवणे हे उथळ आहे. नकली राष्ट्रवादाची (Pseudo Nationalism) भलावण करणारे आहे. नकली राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांनी राज्यघटनेतील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये एकदा समजून घ्यावीत आणि त्या कर्तव्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पालनाचा कसोशीने प्रयत्न करावा आणि प्रचारही करावा. तेच देशाच्या भल्याचे होईल. तेच राष्ट्रप्रेमी भूमिका घेणारे ठरेल. 

 (लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT