overcome blindness and Help professionals to startup business education online khata
overcome blindness and Help professionals to startup business education online khata sakal
संपादकीय

अंधत्वावर मात करत व्यावसायिकांना साथ

सकाळ वृत्तसेवा

शाळेत असतानाच त्यांना अंधांसाठीच्या शिक्षणाच्या संधी शोधण्यासाठी युरोपात जाण्याची संधी मिळाली.

छोट्या व लघु व्यावसायिकांसाठी ‘ऑनलाइन खाता’ नावाचे आगळे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करणारे हरहुन्नरी कृष्णकांत माने हे भारतातील पहिले अंध सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि व्यावसायिक आहेत. कृष्णकांत यांची कहानीच विलक्षण आहे.

- वैभव चाळके, मुंबई

मुंबईतील दादरमध्ये कृष्णकांत यांचे बालपण गेले. किंग्ज जॉर्ज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ते शिकले. शाळेत असतानाच त्यांना अंधांसाठीच्या शिक्षणाच्या संधी शोधण्यासाठी युरोपात जाण्याची संधी मिळाली.

घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील सोबत जाऊ न शकल्यामुळे ते एकटेच त्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तिथे बोलणारा टाईप रायटर पाहून त्यांना या नव्या तंत्रज्ञानाने काही साध्य करता येईल, अशी चाहूल लागली होती. दहावीत गुणवत्ता यादीत आल्यावर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला जाण्याचे प्रयत्न केले, पण तेव्हा अंधत्वामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही.

मग कृष्णकांत हे रुईया महाविद्यालयात दाखल झाले. तेथून अर्थशास्त्रात पदवी घेतली. अर्थात पुढे कॉम्प्युटरमध्येच जायचे असल्याने त्यांनी इथेही सायकॉलॉजी, स्टॅटिस्टिक, लॉजिक आदी विषय घेतले होते. पुढे बोलणारे कॉम्प्युटर भारतात आले आणि २००३ या वर्षी ते भारतातील पहिले अंध सॉफ्टवेअर इंजिनिअर बनले.

सहकारी बनल्या जोडीदार

पदवी मिळवण्याआधीच ते सॉफ्टवेअर बनवायला शिकले. त्यानंतर व्यवसायही सुरु केला, पण यश आले नाही. मग त्यांनी होमी भाभा सेंटरमध्ये काही काळ नोकरी केली. पुढे जीएनयू खाता (GNUKhata) नावाचे मोफत अकाउंटिंग सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या सामाजिक उपक्रमात ते सामील झाले.

प्रकल्पाला केरळ राज्य सरकारने निधी दिला होता. दरम्यान, त्यांनी ‘डिजिटल फ्रीडम फाउंडेशन’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. याच काळाच २०१३ मध्ये त्यांची प्राजक्तासोबत ओळख झाली. २०१६ मध्ये प्राजक्ता त्यांच्या फाउंडेशनमध्ये दाखल झाल्या आणि २०२० मध्ये जीवनप्रवासात अर्धांगिनी म्हणून त्यांनी प्रवेश केला.

काही काळ दोघांनी एका परदेशी कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर काम केले, मात्र स्वतःचे काही करायची इच्छा स्वस्थ बसू देईना, तेव्हा दोघांनी नवा विचार सुरू केला आणि त्यातून दोघांनी बुकमॅट्रिकची (Bookmatic PVT) स्थापना केली. ‘ऑनलाईन खाता’च्या विकासाला चालना देणाऱ्या ‘जीएनयू खाता’ ची सुरुवात कृष्णकांत यांनी २००९ मध्ये केली होती; परंतु ‘ऑनलाइन खाता’ हे साॅफ्टवेअर त्यांनी प्राजक्तांच्या जोडीने विकसित केले.

लहान व्यावसायिकांचा आधार

या सॉफ्टवेअरचा फायदा कसा होतो, यासाठी एक उदाहरण पाहू. दिवसाला हजार-दोन हजारांची विक्री करणाऱ्या रामू दुकानदाराला वर्षाकाठी हिशोब नोंदवून ठेवणे आणि कर भरणे यासाठी वर्षभर अकाउंटंटची मदत घ्यावी लागते.

डाटा एन्ट्री करणे आणि रिटर्न फाइल करणे यासाठी वर्षभर त्याचे साधारण ३० हजार रुपये खर्च होतात. आता एका नव्या सुविधेने रामूचा मनस्ताप आणि खर्चही कमी केला आहे. वर्षाकाठी त्याचे २५ हजार रुपये ऑनलाइन खाता या नव्या सॉफ्टवेअरमुळे वाचू लागले आहेत.

‘ऑनलाईन खाता’ची कल्पना सुचली तेव्हा प्राजक्तानेच सुरुवातीपासून सर्व काही व्यवस्थित करण्याचा ध्यास घेतला. कृष्णकांत तांत्रिक संसाधने एकत्र करण्यात आणि व्यावसायिक धोरण तयार करण्यात व्यग्र असताना प्राजक्ता या कल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्या आणि त्यांनी इतर पैलूंवर काम केले.

‘ऑनलाइन खाता’ हे सॉफ्टवेअर आता देशभरातील काही हजार छोट्या व्यावसायिकांचा आधार झाले आहे. हे सॉफ्टवेअर छोट्या व्यावसायिकांचे पैसे आणि वेळ वाचवत असल्याने त्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

गरजवंत केवळ अंध नसतात

कृष्णकांत म्हणतात, ‘‘अंध व्यक्तींनी जेव्हा जेव्हा समाजासाठी काही करायचा विचार केला तेव्हा बहुधा त्यांनी अंधांसाठी काम करण्याला प्राधान्य दिले. गरजवंत केवळ अंध नसतात... गरजवंत समाज फार मोठा आहे. त्यातूनच अतिसूक्ष्म, सूक्ष्म आणि छोट्या व्यवसायासाठी काम करायचे हे पक्के ठरले. त्यातूनच ‘ऑनलाइन खाता’ हा व्यवसाय सुरू झाला. लवकरच कंपनीचा आयपीओ घेऊन येऊ व अधिकाधिक व्यावसायिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT