बांधकाम क्षेत्रात काम करताना आता सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होण्यापेक्षा बांधकामाच्या विविध टप्प्यांवर कामे करताना सुरक्षितता तपासली तर प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
दुर्घटना टाळण्यासाठी असणाऱ्या उपाययोजना या क्षेत्रातील सर्वांनाच माहीत असणे आवश्यक आहे. बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षितता, दर्जा आणि वेग या तीनही गोष्टीं महत्वपूर्ण असतात. अनेकदा वेग वाढला असता दर्जा घसरण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टींचे संतुलन ठेवणे ही खरी कसोटी ठरते. पूर्व प्रकल्पांच्या सर्वेक्षणानुसार बांधकाम प्रकल्पांवर घडणाऱ्या अपघातांची वर्गवारी वेगवेगळी असते. यामध्ये सर्वसाधारणपणे उंचीवरून पडणे ५६ टक्के, बांधकाम अंगावर कोसळणे २१ टक्के, चालत्या वाहनांचा धक्का लागणे १० टक्के, विद्युतप्रवाहाचा शॉक बसणे ५ टक्के, उचललेली वस्तू अंगावर पडणे ३ टक्के, चलयंत्राच्या संपर्कात येणे ३ टक्के, उष्ण आणि हानीकारक वस्तूंचा संपर्क होणे २ टक्के असे आहे . या सर्व ठिकाणी वेळप्रसंगी वित्त अथवा जीवितहानी होण्याचा संभव असतो.
जागतिक स्तरावर सुरक्षा प्रमाणपत्राची ओळख ‘ऑक्युपेशनल हेल्थ अॅन्ड सेफ्टी असेसमेंट सिस्टीम’ अशी आहे. सन १९९० पासून बांधकामक्षेत्रात ‘आयएसओ १८०००१’ प्रमाणपत्र देण्याची सुरवात झाली. आयएसओ १८०००१ मधील सुरक्षिततेबाबत असणारे नियम कडक आहेत. त्यानुसार बांधकाम प्रकल्पावरील कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत दुर्घटना घडू नये म्हणून प्रयत्न केले जातात. यामधील जोखीमांचा पूर्व अभ्यास करुन, त्या कमी अथवा संपूर्णपणे नाहीशा करण्या बाबतचे प्रयत्न सातत्याने केले जातात. प्रकल्पावरील संभाव्य अपघात, त्यांची कारणे , ते कमी करण्याबाबतचे सुरक्षा नियम, त्यांची कठोर अंमलबजावणी यांचा कृती आराखडा प्रथमतः तयार करावा लागतो . सर्वच आयएसओ गुणवत्ता प्रणालीत कंपनी व्यवस्थापनाला नियोजन, कार्यवाही ,तपासणी आणि पुनर्रकार्यवाही अशा क्रमाने बांधकामातील टप्पे पूर्ण करावे लागतात. आयएसओ गुणवत्ता प्रणाली बनवताना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाते.
स्वतंत्र सुरक्षा अधिकारी
बांधकामाचे विविध टप्पे सुरक्षितपणे होत आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक अशा कंपन्यांमधे केली जाते . असे सेफ्टी ऑफिसर प्रकल्पावरील अभियंते आणि कामगारांच्या कामावर सतत नजर ठेवतात. प्रत्येकाला ‘सेफ्टी हेल्मेट’ आणि ‘सेफ्टी शूज’ वापरणे बंधनकारक असते . कामगारांना या व्यतिरिक्त कामाच्या स्वरूपानुसार सेफ्टी जॅकेट, सेफ्टी बेल्ट , हॅन्ड ग्लोज, गॉगल, मास्क इ. सुरक्षा साधनांचा वापर करावा लागतो. उंच इमारतींना विविध उंचीवर सेफ्टी नेट बांधावी लागतात. प्रकल्पावर वाहने आणि विविध यंत्रप्रणाली चालवणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक वाहनांचे ब्रेक, रिव्हर्स हॉर्न, प्रदूषण चाचणी, लायसेन्स इत्यादी गोष्टींची नियमित तपासणी केली जाते. रात्रीच्या वेळी काम करताना प्रखर दिव्यांची सोय असते. आगीच्या आपत्कालीन प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज अग्निप्रतीबंधक यंत्रणा असते. संकटकाळी सर्व व्यक्तींना एका विशीष्ठ जागी मार्गयेण्यासाठीचा असेम्ब्ली पॉईंट असतो. आपत्कालीन वेळी बाहेर पडण्यासाठीचा मार्ग निश्चित केलेला असतो. एखाद्या ठिकाणी असुरक्षितपणे काम चालू असेल तर संबंधित व्यक्तींना प्रथम समज दिली जाते. त्यात सुधारणा दिसली नाही तर त्या व्यक्तीला जाब द्यावा लागतो. झालेल्या प्रकाराची लेखी नोंद सुरक्षा अधिकाऱ्यास करावी लागते . घटनेची माहिती त्वरित प्रकल्प व्यवस्थापनाला कळवावी लागते. यामधे जाणीवपूर्वक निष्काळजीपणा आढळल्यास संबंधिताला कामावरून कमी करून मायदेशी धाडले जाते. सुरक्षिततेच्या उपाययोजना आपल्या देशात कसोसीने पाळल्या गेल्या तर ज्या दुर्घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात त्यावर मात करणे शक्य होईल.विनाकारण होणारी वित्त आणि जीवितहानी टाळता येईल
कामगारांची आरोग्य तपासणी
आठवड्यातील एक दिवस सुरक्षिततेबाबतीत नियमांची उजळणी करण्यासाठी सेफ्टी मीटिंग घेतली जाते. यावेळी खड्ड्यात, उंचीवर, स्कॅफोल्डिंगवर कामे करताना , मिशनरी चालवताना, यंत्रे हाताळताना, काँक्रीट, बांधकाम आणि प्लास्टर इत्यादी करताना आपल्या स्वतःची आणि इतरांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत सेफ्टी ऑफिसरद्वारे मार्गदर्शन केले जाते. साईट ऑफिसमधे प्रथमोपचार पेटी, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल , रुग्णवाहिका, संबंधित डॉक्टर, अग्निशामक यंत्रणा यांचे नंबर ठळकपणे बोर्डावर नमूद केलेले असतात. ज्वलनशील पदार्थांचा साठा,गोदामे, जिने, तळघर, रॅम्प, असेंम्ब्ली पॉइंट, ऑफीस या ठिकाणी नामदर्शक बोर्ड लावावे लागतात. महिन्यातील एक दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो. त्यामुळे प्रकल्पावरील वातावरण निरोगी राहते. प्रकल्पावरील सर्वांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. सर्वांचा विमा उतरवला जातो. व्यवस्थापनाला दरवर्षी एक अंतर्गत सुरक्षा ऑडिट करावे लागते. त्यामधील त्रुटी दूर करुन त्रयस्थ तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत अंतिम ऑडिट केले जाते. सर्व त्रुटी दूर झाल्यानंतरच पुढील एका वर्षासाठी सुरक्षा प्रमाणपत्राची मुदत वाढवली जाते.
(लेखक स्थापत्य सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.