rajendra shende
rajendra shende 
संपादकीय

आनंदाच्या खऱया 'आतषबाजी'साठी...

राजेंद्र शेंडे

फटाक्‍यांच्या वापरावर निर्बंध घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याकडे नेहमीप्रमाणे वादांचे फटाके उडू लागले आणि निर्णयाची अंमलबजावणी होणे कसे अशक्‍य आहे, असे जो तो सांगू लागला. भारतासारख्या लोकशाही देशात बदल हा टप्प्याटप्प्यानेच होत असतो. त्या दृष्टीने हा निर्णय मध्यममार्गी आणि योग्य दिशेने नेणारा आहे. उत्सव आणि सण यांतून आनंद मिळविणे हे उद्दिष्ट असते; मग त्याला पोषक अशा गोष्टी करायला नकोत काय? पर्यावरणपूरक दिवाळीची संकल्पना त्या दृष्टीने विचारात घ्यायला हवी. फटाक्‍यांवर बंदी हा त्याचा केवळ भाग आहे. जिथे फटाक्‍यांचा उगम झाला, त्या चीनमध्ये त्यांच्या नवीन वर्षाच्या उत्सवात फटाके उडविण्याची प्रथा आहे. तिथे 2005मध्ये शहरांत फटाके उडविण्यावर न्यायालयाने बंदी घातली; पण लोकांनी ती लगेच व संपूर्णपणे पाळली नाही. म्हणजे तिथेही झटकन बदल झाला नाही. तथापि, काही वर्षांत फटाके वाजविणाऱ्यांमध्ये तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली. आपल्याकडेही हे घडू शकते. तरुण पिढी वेगळा विचार करणारी आहे. फटाक्‍यांच्या प्रदूषणाच्या गंभीर परिणामांविषयी नीट समजावून सांगितले तर ते नक्कीच नवी वाट शोधतील.

मुळात फटाके वाजविण्याची प्रथा कशी सुरू झाली? दुष्ट, सैतानी प्रवृत्तींचा फटाक्‍यामुळे नाश होतो, अशी चीन किंवा भारतात आणि इतरही काही देशांत समजूत आहे. सुगीच्या वेळी फटाक्‍यांच्या आवाजाने टोळधाड निघून जाते आणि पीक साफ राहते, अशीही लोकधारणा आहे. मोठ्या आवाजाने तात्पुरती गंमत वाटणारेही अनेक जण आहेत. विज्ञानाची प्रगती होत जाते, तसतशी जुन्या समजुतींची चिकित्सा होऊ लागते. फटाक्‍यांच्या प्रथेच्या बाबतीतही असे व्हायला हवे होते; मात्र सण-उत्सव आणि फटाके यांचे समीकरण सवयीने डोक्‍यात घट्ट बसल्याने तसे झालेले दिसत नाही. ते समीकरण काढून टाकण्यासाठी सतत प्रबोधन करावे लागेल आणि तशा प्रयत्नांना आधारभूत म्हणून न्यायालयाच्या निर्णयाचा उपयोग होईल. फटाके फोडणे किती घातक ठरते, याची माहिती करून घेतली पाहिजे; इतरांनाही करून दिली पाहिजे. फटाक्‍यांमुळे होणारे प्रदूषण सर्वंकष आहे. हवेत सल्फरडाय ऑक्‍साईड, कार्बन मोनोक्‍साईड व इतर विषारी वायूंचे उत्सर्जन होते. फटाक्‍यांच्या उत्पादनापासून विचार केला, तर शिवकाशी आणि अन्य ठिकाणी सुरक्षिततेच्या उपायांअभावी झालेले अपघात आणि प्रदूषणामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याशिवाय फटाक्‍यांमुळे लागणाऱ्या आगींचे संकटही नित्याचे झाले आहे. फटाका फोडल्यानंतर हवेत पसरणारे सूक्ष्मकण फुफ्फुसात जातात आणि रक्तातही प्रवेश करतात. हे इतके धोकादायक आहे की मेंदूच्या आरोग्यावरही ते परिणाम करू शकतात. वेगवेगळ्या फटाक्‍यांमुळे अर्धवट ज्वलन होऊन पसरणारा धूर घातक असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा आपण मुकाबला करीत आहोत. वातावरणात पसरणाऱ्या ब्लॅक कार्बनमुळे (फटाक्‍यात कोळशाची पूड असते.) तापमान वाढते, हे लक्षात घ्यायला हवे. जगात 70 लाख लोक दरवर्षी वायूप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. भारतातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांनी वायूप्रदूषणाची धोकादायक पातळी कितीतरी पटींनी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या प्रदूषणात भर घालायची आणि तीदेखील सणाच्या आनंदाच्या नावाखाली, ही केवढी विपरीत गोष्ट आहे! एकीकडे मनुष्यबळ विकास हे आपले ध्येय आहे, असे आपण म्हणतो. बुद्धिमान तरुणवर्ग हे आपले बलस्थान आहे, याचाही अभिमानाने उल्लेख करतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणाऱ्या गोष्टी चालू ठेवतो. हे चित्र बदलायला हवे. प्रगत देशांतही दारूकामाची आतषबाजी होते, हे खरेच आहे; परंतु त्यासाठी विशिष्ट सार्वजनिक मैदान राखून ठेवले जाते. तेथेच फक्त ठराविक वेळात व प्रदूषणरहित पद्धतीने आतषबाजी होते. अशा गोष्टींचे अनुकरण करायला काय हरकत आहे? विविध देशांशी आपण सामंजस्य करार करीत असतो. मला असे वाटते, की अनौपचारिक पातळीवर "सामाजिक व पर्यावरण सामंजस्य करार' केले पाहिजेत. त्याद्वारे आमच्या चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या, तुमच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेतो, असे ठरवायला हवे. देशांतही प्रदूषणविरहित फटाके या बाबीवर संशोधन व्हायला हवे. disruptive technology चा सध्या बराच बोलबाला आहे. याही क्षेत्रात ती आली पाहिजे आणि दिवाळीसारख्या सणांचा आनंद पर्यावरणपूरक रीतीने कसा घेता येईल, याचे कल्पक आणि तंत्रज्ञानाधारित मार्ग शोधले पाहिजेत. ज्यांना मोठ्ठा फटाक्‍यांचा आवाज आनंददायक वाटतो, त्यांनी इलेक्‍ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरून धूरविरहित क्षणभर प्रकाशाचा झोत देणारा फटाका का नाही शोधायचा? निदान त्यामुळे जीवघेण्या धुरापासून तरी आपला बचाव होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT