Mahendra singh Dhoni
Mahendra singh Dhoni 
संपादकीय

अग्रलेख : थांबणे मंजूर नाही!

सकाळ वृत्तसेवा

एखाद्या महान खेळाडूच्या देदीप्यमान कारकिर्दीच्या निवृत्तीच्या क्षणाचा साक्षीदार होणे, हे नेहमीच क्‍लेशदायक असते. वर्षानुवर्षे त्याच्या पराक्रमांची सवय झालेल्या आपल्या क्रीडारसिकांचे मन तेव्हा हळवे होते. आपल्या राष्ट्रीय जाणिवा, अस्मिता आदी संवेदनांना मूर्त स्वरूप देणारा हा महान खेळाडू पुन्हा मैदानात त्याच तडफेने खेळताना दिसणार नाही, या कल्पनेने कासावीस व्हायला होते. त्या महान खेळाडूची निवृत्ती पचविणे त्याच्या चाहत्यांना जितके कठीण असते तितकेच; किंबहुना त्यापेक्षा जास्त अवघड त्या खेळाडूसाठी असते. इंग्रजीत या निवृत्तीच्या क्षणासाठी "हॅंगिंग द बूट्‌स' अशी संज्ञा आहे.

हे टिपिकल रणांगणावर पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकासंबंधीचे वर्णन! मैदान मारून परतल्यावर घरातल्या खुंटीवर आपले जोडे टांगून ठेवण्याचा हा क्षण त्या खुंटीमागल्या भिंतीलाही जडच जात असणार. परंतु, कधीतरी, कोठेतरी थांबावेच लागते. एरवी तोकडे पडणारे मैदान वाढत्या वयासोबत अचानक अवाढव्य वाटू लागते. छातीतला दमसास आटू लागतो. दृष्टीची तीक्ष्णता ओसरू लागते. शरीरातले स्नायू ऐनवेळी असहकाराच्या पवित्र्यात जाऊ लागतात. असे काही होऊ लागले, की शहाणा "खिलाडी' ओळखतो की थांबण्याची वेळ आली... 

निवृत्तीचा हा क्षण ओळखता आला, त्याला "जीवन कळले हो' असेच म्हणावे लागेल. महान टेनिससम्राज्ञी मार्टिना नवरातिलोवा वयाच्या 46व्या वर्षी निवृत्त झाली, तर तिची पूर्वसूरी महान बिली जीन किंग निवृत्तीनंतर पुन्हा रिंगणात येऊन सात वर्षे खेळत राहिली. बास्केटबॉल रसिकांच्या गळ्यातला ताईत आणि अमेरिकन अस्मितेचे जितेजागते रूप असलेला मायकेल जॉर्डन अवघ्या 33व्या वर्षी घरी बसला. विक्रमवीर सुनील गावसकरची निवृत्ती अशीच शांतपणे पार पडली. रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडण्याच्या ईर्ष्येने, छाती फुटेस्तोवर एका बाजूने चाळीस चाळीस षटके सलग टाकून शेवटी 1994 मध्ये पस्तिशीत निवृत्त झालेल्या कपिलदेवचे उदाहरणही लक्षणीय मानले पाहिजे.

जुन्यांचे सोडा, नव्या दमाचा क्रिकेटस्टार युवराजसिंग यानेही महिनाभरापूर्वी निवृत्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात अंबाती रायुडूनेही तोच कित्ता गिरवला. या नामावळीत अजून एक नाव सामील झालेले नाही, ही जाणीव मोठी सुखद आहे. ते नाव आहे महेंद्रसिंह धोनीचे. भारतीय क्रिकेटमध्ये अस्मितेची धग पुरती पेटवून त्याला मशालीचे स्वरूप देणारा हा क्रिकेटसितारा सोमवारी अडतिसावा वाढदिवस साजरा करता झाला! सध्या विश्‍वकरंडकाच्या धामधुमीत इंग्लंडच्या भूमीमध्ये धोनीने आपल्या मोजक्‍या कुटुंबीयांसमवेत आणि संघ सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात वाढदिवस साजरा केला असेल. पण, हा वाढदिवस त्याच्यासाठी आणखी एक इशारा घेऊन आलेला आहे, हे त्याच्या चाहत्यांना विसरता येणार नाही.

2007 मध्ये राहुल द्रविडकडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारलेल्या धोनीने पराक्रमाची एकही पायरी न सोडता भारतीय क्रिकेटला अशा काही उंचीवर नेऊन ठेवले, की तेथून खाली पाहतानाही सुखाने गरगरावे! त्याच सुमारास क्रिकेटने कसोटीसोबतच एकदिवसीय, 'ट्‌वेंटी-20' असे नवे रूपबंध आत्मसात करण्यासाठी कंबर कसली होती. पाहता पाहता धोनीच्या नेतृत्वाखाली 'ट्‌वेंटी-20' विश्‍वकरंडक, चॅम्पियन्स करंडक, विश्‍वकरंडक, 'आयसीसी'चे सर्वोच्च रॅंकिंग, देदीप्यमान विजयमालिकांचा सिलसिला... असा सुवर्णकाळ साकारत गेला. हे सारे विसरणे क्रिकेटप्रेमींना शक्‍यच नाही. तथापि, यंदाच्या विश्‍वकरंडकात अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत दिसलेला धोनी वेगळाच होता.

अद्वितीय 'फिनिशर' म्हणून लौकिकप्राप्त धोनी जिंकण्यासाठी खेळतच नव्हता. त्याचे चापल्यही ओसरल्यागत दिसत होते. तेवढ्यात 'आयसीसी'ने धोनीला सलाम ठोकणारी व्हिडिओ क्‍लिप व्हायरल केली. ही व्हिडिओ क्‍लिप केवळ त्याला सलाम ठोकण्यासाठी होती, की त्याला निवृत्तीच्या मार्गावर ढकलण्याची खेळी? समाज माध्यमे आज धोनीच्या तथाकथित निवृत्तीच्या चर्चेने गजबजली आहेत ती याच कारणांमुळे. अर्थात, "मी कधी निवृत्त होणार, हे मलाच माहीत नाही. पण, काही लोक मला श्रीलंका लढतीपूर्वीच रिटायर करायला निघाले आहेत,' असे कडवट उद्‌गार काढून धोनीने या चर्चेला उत्तर दिले आहे.

धोनीच्या निवृत्तीची चर्चा ना त्याच्या चाहत्यांना मंजूर आहे, ना कर्णधार विराट कोहलीला. 'धोनी हे संघाचे ऊर्जास्थान आहे,' असे तो म्हणतो ते काही उगाच नव्हे. महान खेळाडू हे संपूर्ण देशासाठी एक ऊर्जास्थान असतात. नव्या पिढ्या त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळवत पुढे येत असतात. त्यांच्या निवृत्तीचे चर्वण हे कसेही असले, तरी क्‍लेशकारक असणारच. क्रिकेटमहर्षी डॉन ब्रॅडमन फार लवकर निवृत्त झाले होते. 'इतक्‍यात का जाताय?' असे त्यांना विचारले असता त्यांनी कधी जाताय? असं लोकांनी विचारण्याआधी 'का जाताय?' असं विचारलं जात असतानाच जाणं श्रेयस्कर असतं,' हे अजरामर उद्‌गार काढले होते.

कुठे थांबायचे, हा निर्णय विक्रमादित्यांनीच घ्यायचा असतो. अन्य कुणीही नव्हे! तेव्हा धोनीच्या निवृत्तीची चर्चा न करता त्याच्या 'असण्या'चे कौतुक जमेल तितके करावे, हेच खरे. काळ कितीही इशारे देत असला, तरी त्यांचे थांबणे आपल्याला मंजूर असण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT