Narendra_Modi 
संपादकीय

अग्रलेख : मोदींचा 'उत्तर'पक्ष!

सकाळ वृत्तसेवा

लोकांना आता उत्सुकता काँग्रेसने इतिहासकाळात काय चुका केल्या याची नसून भाजप भविष्यासाठी काय करणार याची आहे. समन्वयाचा पंतप्रधानांचा स्वर आश्‍वासक असला तरी राजकीय अभिनिवेशातून ते पुरते बाहेर आलेले नाहीत, हेच त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. 

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली फलंदाजी त्यांच्या निवडणूकपूर्व भूमिकांपासून बऱ्यापैकी फारकत घेणारी, विरोधकांना समन्वयाचे आवाहन करणारी आणि त्यामुळेच आश्‍वासक वाटणारी आहे. मात्र, नेहरूंच्या वचनाचा उच्चार करून काँग्रेसवर हल्ला चढवण्याचा त्यांचा पवित्रा ते राजकीय अभिनिवेशाच्या भूमिकेतून पुरते बाहेर आलेले नाहीत, हेही स्पष्ट करणारा आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर दिले तो दिवस आणीबाणीचा स्मृतिदिन होता आणि त्याचा योग्य वापर करून मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. कॉंग्रेसच्या सत्ताकाळातील गैरकारभाराचे वाभाडे त्यांनी यापूर्वीही काढले असले तरी 25 जूनचे मोदी शालजोडीतून अधिक भेदक मारा करताना दिसत होते आणि त्यामुळे काँग्रेसला "नेहरूंच्या उल्लेखामुळे आमचा नैतिक विजय झाला' या पलीकडे दुसऱ्या कशातही समाधान सापडण्याजोगे नव्हते. काँग्रेस आता विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे त्या पक्षाला समाधानाचे सुस्कारे सोडण्यासाठी अशी कारणे पुरेशी वाटली तर नवल नव्हे! मोदींचे तसे नाही. त्यांचा पक्ष प्रचंड बहुमत मिळवून केंद्रीय सत्तेत आला आहे. कॉंग्रेसला पुनः एकवार लोकांनी जागा दाखवून दिली आहे.

मोदींच्या नेतृत्वातील भाजपला तब्बल 54 टक्के मतदारांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गतकाळातील चुकांचे पाढे गाण्यापेक्षा आता भाजपने खरोखर समन्वय, संवाद आणि सहकार्याच्या भूमिकेवर आले पाहिजे. त्यादृष्टीने मोदींचे भाषण काहीसे आश्‍वासक वाटते खरे; पण त्यातील राजकीय अभिनिवेश खटकतोच. कॉंग्रेस मुळांपासून दुरावली, मुस्लिमांच्या उत्थानासाठी कॉंग्रेसने संधी असूनही फारसे काही केले नाही, गांधी घराण्याच्या पलीकडे कॉंग्रेसला कुणाचेच कौतुक नाही, अटलजींचे तर सोडाच नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचेसुद्धा नाही इत्यादी इत्यादी...! हे सारे तंतोतंत खरे मानले तरी लोकांना आता उत्सुकता कॉंग्रेसने काय केले, याची नसून भाजप काय करणार याची आहे. 

"तुम्ही संख्याबळाचा विचार करू नका, तुमचा शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे', असेही मोदी यांनी म्हटले होते. तीच भूमिका त्यांनी कायम ठेवणे गरजेचे आहे. मतदानाद्वारे सत्तांतर हेच लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. कॉंग्रेस एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला पक्ष होता. आता मात्र विरोधी पक्षनेतेपदावर दावासुद्धा करता येऊ नये, अशी केविलवाणी अवस्था त्या पक्षाची झाली आहे. पण, सत्ताधाऱ्यांनी इतिहास उगाळत सदासर्वकाळ निवडणूक प्रचाराच्या मानसिकतेत राहणे योग्य नव्हे. आता देशापुढील प्रमुख आव्हानांची चर्चा करायला हवी. झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाची जमावाने हत्या केली. ही घटना चिंताजनक आहे. लोकसभेत मोदींनी केलेल्या भाषणात त्याविषयी उल्लेख नव्हता; पण "दोषींवर कारवाई व्हायला हवीच', हे त्यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात ठामपणे सांगितले, हे बरे झाले. आता त्यादिशेने प्रत्यक्ष पावले पडली पाहिजेत. कायदा-सुव्यवस्था हा राज्याचा विषय असला तरी अशा प्रकारांना या देशात थारा नाही, असा संदेश देशात सर्वदूर पोचणे अत्यावश्‍यक आहे. शेवटी "सबका विश्‍वास' म्हणजे असते तरी काय?... सर्वांचा विश्‍वास प्राप्त करायचा असेल तर या बहुपेडी-बहुढंगी देशाचे राजकारण आणि सत्ताकारणदेखील सर्वसमावेशक व्हायला हवे.

सत्तेतली माणसे कोणत्याही पक्षाची असली तरी ती न्यायप्रिय आहेत आणि आपली आहेत, असे या देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे. भारतापुढचे सध्याचे प्रश्‍न अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. कॉंग्रेसच्या दीर्घकालीन सत्ताकाळात काही महत्त्वाच्या मुद्यांवर दुर्लक्ष झाले हे खरेच आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत हेही खरे आहे. पण, त्या नाकर्तेपणाचा पाढा गात राहिलो तर देश म्हणून आपण पुढे जाणार नाही, हे भाजपने सत्तेतला पक्ष म्हणून लक्षात घेतले पाहिजे. "लोकशाही हा आमचा आत्मा आहे', असे मोदींनी याच भाषणात म्हटले. ते वाच्यार्थानेच नव्हे, तर भावार्थाने आणि व्यवहारानेही खरे ठरवायचे असेल तर टीकाटिप्पणीचे लोकशाहीतील स्थान अबाधित राखतानाच सामाजिक सौहार्दाला तडा देणाऱ्या कोणत्याही घटनेच्या संदर्भात सरकार कठोर पावले उचलते, हेही ठळकपणे दिसले पाहिजे.

जमावाकडून झालेल्या हत्या हेसुद्धा लोकशाहीवरील कलंक ठरतात. त्यावरही ठोस भूमिका घेण्याची आवश्‍यकता आहे. अल्पसंख्याक समुदायांत ठिकठिकाणी आढळून येणारा भयगंड विकासाला बाधक ठरू शकतो, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. ते मुद्दे विरोधकांकडून येतील तेव्हा त्यातील राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून देशाचे ऐक्‍य आणि विकास या दोनच गोष्टींचा विचार सत्ताधीशांनी करणे अपेक्षित आहे. मोदींनी केलेले समन्वय आणि संवादाचे आवाहन हे त्यादृष्टीने आश्‍वासक पाऊल मानले जाऊ शकते. मोदी चर्चेचा उत्तरपक्ष कसा मांडतात, याची उत्सुकता होती; पण त्यात "उत्तरा'चा अभिनिवेश जास्त होता. तो जेवढा कमी होईल, तेवढे त्यांना अभिप्रेत असलेले संवादी वातावरण तयार होण्याची शक्‍यता वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT