Hous of Bamboo
Hous of Bamboo Sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : विद्वज्जन तो तेणे कहिए जे…!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! कम्मालचै. दर आठवडाअखेरीला छॉन छॉन बातम्या मिळण्याची नवी साथच (पुण्यात) सुरु झाली आहे की काय? पुण्यानं साथी म्हणून तरी किती अनुभवायच्या? गेल्या सप्ताहात ‘मसाप’ च्या पुरस्कारांची पहिली लाट आली. आता ही गोड बातम्यांची दुसरी लाट! नव्या गोड बातमीमुळे (कित्तीही टाळलं तरी) या वीकेंडलासुध्दा आम्हाला आमरस खावा लागणार आहे. बातमी आहे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीची आणि (लगेहाथ) विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचीही. या दोन्ही पदांवर आमचे परममित्र (खरे तर जगमित्रच) डॉ. सदानंद मोरे (देहूकर) आणि (मऊ मेणाहुनी) डॉ. श्रीधरपंत ऊर्फ राजाभाऊ दीक्षित (सदाशिवपेठकर). या दोघाही डॉक्टरांच्या सन्माननीय नियुक्त्यांबद्दल हार्दिक अभिनंदन! दोघांनाही आज सकाळीच शुभेच्छापत्रे (गुलाबी कागदावर) पाठवून दिली आहेत. कागदावर गुलाबगंधाचा सॅनिटायझर मारलेला आहे, त्यांना वासावरुन कळेलच! (विशेषत: डॉ. राजाभाऊ दीक्षित त्याला ‘गंधमेदिनी’च म्हणतील!) असो!!

डॉ. सदानंद मोरे (देहूकर) यांची नव्याने काय ओळख करुन द्यायची? तुम्हाला म्हणून सांगत्ये, या गृहस्थाला उभ्या महाराष्ट्रात एकही शत्रू नाही. सगळेच मित्र! इतका अजातशत्रू साहित्यिक मराठीच्या इतिहासात (प्रा. अनंत काणेकर सोडून) एकही नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही लष्टकं आहेत. पण मोरेसर? नाव सोडा! साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ते आधीही होतेच. पण खालच्या बाजूला पुनर्रचना झाली तरी ते वर (दशांगुळे) टिकले आहेत. सरकार कोठलंही असो, स्थितप्रज्ञ आणि डॉ. मोरे (देहूकर) हे (सदा) अलिप्त असतात, हेच यावरुन सिद्ध होत नाही का? बाकी डॉ. मोरे (देहूकर) यांनी (पुण्यात) लॉ कॉलेज रोडवरच्या कोहिनूर कट्ट्यावर चहा पीत पीत आमच्या विश्वंभर चौधरींशी गप्पा रंगव रंगव रंगवल्यान, पण मंडळाच्या पुनर्रचनेचा थांग काही लागू दिला नाही!! (याला म्हणतात चतुर बुद्धिमान विचारवंत!) शिवाय ते संत साहित्याचे अभ्यासक, कवी, प्रवचनकार, साहित्यिक, व्याख्याते,असे बरेच काही एकाच वेळी आहेत. असो.

आमचे दुसरे परममित्र तर टोटल अजातशत्रूच. डॉ. राजाभाऊ दीक्षितांबद्दल काय सांगायचं? इतका सज्जन माणूस मराठी साहित्याच्या गल्लीबोळात हिंडतो, याचंच मुदलात आश्चर्य वाटतं. (पुण्यात) विद्यापीठाच्या आवारात तंद्रीत चालता चालता भिंतीला धडकले तरी हे भिंतीला ‘सॉरी’ म्हणायचे म्हणे! इतकंच नव्हे, तर भिंतदेखील त्यांना ‘सॉरी’ म्हणायची, आणि स्वत:चे कान पकडायची, असं आमच्या ऐकिवात आहे. (होय, भिंतींना कान असतात, विद्यापीठातल्या भिंतींना तर असतातच असतात. असो.) ऐन सदाशिवात (तेही ज्ञानप्रबोधिनी समोरच्या बोळात) नित्य वहिवाट असूनही हे गृहस्थ अंतर्बाह्य सज्जन, कमालीचे अहिंसक, मृदू, आणि नेमस्त राहिले. ‘विद्या विनयेन शोभते’ हेच खरं. तुम्हाला म्हणून सांगत्ये, मध्यंतरी प्रार्थना समाजाच्या इतिहासाचं पुनर्मुद्रण झालं. त्याची प्रस्तावनाच राजाभाऊंनी दोन-तीन वर्ष खपून अशी काही प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं लिहून काढली की सगळ्यांनी प्रार्थनेसाठी सामाजिक हातच जोडले! केवढा हा व्यासंग! हल्ली पुण्यातही असला व्यासंग दुर्मिळच झाला आहे. मश्री दीक्षितांचा वारसा विश्वकोशापर्यंत पोचला, हे ‘याचि देही, याचि डोळा’ बघायला मिळालं. त्यात विलक्षण योगायोग म्हंजे विश्वकोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतिदिनीच विश्वकोश मंडळाचं अध्वर्युपण त्यांच्याकडे आलं…

एकंदरित, प्रदीर्घ काळ रखडलेल्या या नियुक्त्या आणि पुनर्रचनांना अखेर मुहूर्त मिळाला, हे आपल्या माय मराठीचं परमभाग्य. मराठी भाषामंत्री सुभाषजी देसाई यांनी ‘ओके’ असा मराठीत शेरा मारुन मराठी साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाची फाइल एकत्रच क्लिअर केली. त्यांनाही मी ‘कॉंग्रेच्युलेशन्स’ चा (लाल) गुलाब पाठवून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT