ding dang maharashtra politics eknath shinde ajit pawar shiv sena ncp bjp  sakal
satirical-news

ढिंग टांग : त्रिशूल आणि त्रिदेव...!

ब्रिटिश नंदी

स्थळ : अज्ञात. वेळ : अपरात्रीची. पात्रे : तीन! प्रकाश योजना : अंधाराची. वेषभूषा : वेषांतराची.

दादासाहेब : (चिंताग्रस्त सुरात) आपलं कसं होणार, काही कळंना झालंय!! असा किती वेळ काढणार? एवढा मोठा गेम केला, पण अजून हाती काही लागलं नाही!!

भाईसाहेब : (समजूत घालत) तुम्ही असं म्हणायला लागलात, तर आमच्यासारख्यानं कुठं जावं? आम्हाला तर कुठं कुठं हिंडावं लागलं! गुवाहाटी, सुरत, गोवा... काही विचारु नका!! तुमच्यावर ती वेळ तरी आली नाही! तुमची सगळी माणसं राजरोस हिंडताहेत!!

दादासाहेब : (करवादून) गबसा हो! हिते ज्याचं जळतं, त्याला कळतं! आमचे लोक तुम्हाला माहीत नाहीत! चांगली, निवडक खाती मागून घ्यायला हटून बसले आहेत! कुठून आणायची चांगली, निवडक खाती?

भाईसाहेब : (नानासाहेबांकडे बोट दाखवत) ते सगळं हे ठरवतात! त्यांना विचारा!!

नानासाहेब : (दोघांचीही समजूत घालत) होईल, होईल! सगळं काही नीट होईल! मी आहे ना?

दादासाहेब : (निर्वाणीच्या भाषेत) जे काय खातेवाटप करायचंय ते लौकर करा! माझ्याकडे तितका वेळ नाही! आधीच मी तुमच्याकडं आलो, त्यामुळे हवा तापली आहे!

नानासाहेब : तवा तापायच्याऐवजी हवाच तापली!! हीही!!

भाईसाहेब : (कुरकुरत) तुम्ही आल्यामुळे आमचा भाव डाऊन झाला, त्याचं काय? कालपर्यंत मंत्रिपदाची स्वप्नं बघणारी आमची पर्यटक मंडळी हवालदिल होऊन गेली...

दादासाहेब : (जबाबदारी झटकत) तुमचं तुम्ही बघून घ्या! आम्हाला मलईवाली खाती देऊन टाका! पुढचं पुढं बघू!!

भाईसाहेब : (वाद घालत) आणि आमच्या लोकांनी काय पुन्हा पर्यटनाला निघायचं का? आता तर चारधाम यात्राच काढावी लागेल आम्हाला!!

दादासाहेब : (घुश्शात) तुमचे चार धाम परवडले, आमचं काय हुईल याचा विचार करा! तुमच्यासाठी पिसांच्या टोप्यासुद्धा घालून घेतल्या परवा गडचिरोलीत! आजवर असलं काही केलं नव्हतं, च्यामारी!! (पिसांच्या टोप्या घातलेली अवस्था आठवून शहारतात.)

भाईसाहेब : (जाणतेपणाने) मी तर हल्ली कुठलीही टोपी घालून घेतो! मंत्रिमंडळ विस्तार नीट होईपर्यंत काय वाट्टेल ते सहन करायची तयारी आहे आपली! कधी होणार खातेवाटप?

नानासाहेब : (खेळीमेळीनं) होईल हो! येवढी काय घाई आहे? आत्ता तर एकत्र आलोय! तुम्ही फार कुरकूर करता बुवा! आता आम्ही काही तक्रार करतोय का? खातेवाटपासाठी आपण एकदा फुरसतीत बसलं पाहिजे! लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत!!

दादासाहेब : (थोड्याशा नरमाईनं) सध्या वातावरण ठीक नाही, म्हणून घाई करतोय! एकदा आमची लोकं संतुष्ट झाली की मग काही टेन्शन उरणार नाही!!

भाईसाहेब : (हात पुढे करत) द्या टाळी! माझीही हीच कंडिशन आहे!

नानासाहेब : (वीरश्रीनं) हे पहा, माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, आज महाराष्ट्र आपल्याकडे फार अपेक्षेनं पाहातो आहे! आपल्याला गतिमान विकास साधायचा आहे! म्हणून तर आपण ही तीन चाकी महायुती केली आहे!

दादासाहेब : (कंटाळून) पण आमचं चाक तुमच्या महायुतीच्या रिक्षाला फिट हुईना झालंय, त्याचं काय?

भाईसाहेब : (बजावून सांगत) रिक्षाची उपमा द्यायची नाही हां!

नानासाहेब : (छप्पन इंची छातीसकट) आपलं त्रिशूल आहे त्रिशूल! किंवा त्रिदेव म्हणा हवं तर... (नाटकीय ढंगात) पाप से धरती फटी, अधर्म से आसमाँ, अत्याचार से कांपी इन्सानियत, राज कर रहे हैवान... जिनकी होगी ताकद अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद, जो करेंगे इनका सर्वनाश... वही कहलायेंगे त्रिदेव...त्रिदेव...त्रिदेव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT