Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : नांदतो देव ‘हा’ आपुल्या अंतरी...!

औंधातले मंदिर प्रकरण कानावर आले का? तेथे एका भक्ताने ‘मंदिर वही बनायेंगे’ असा चंग बांधून चक्क परम आदरणीय मा. नमोजी यांचे मंदिर उभारले.

-ब्रिटिश नंदी

मा. नानासाहेब फडणवीस यांसी, (घाईघाईत) शतप्रतिशत प्रणाम.

औंधातले मंदिर प्रकरण कानावर आले का? तेथे एका भक्ताने ‘मंदिर वही बनायेंगे’ असा चंग बांधून चक्क परम आदरणीय मा. नमोजी यांचे मंदिर उभारले. हे वृत्त ऐकून मी तर हातच जोडले. केवढी ही भक्ती! काय हे अद्वैत!! काय ही निष्ठा!! या आधुनिक पुंडलिकाने भल्या भल्या भक्तांना मागे टाकले हो! परंतु, त्याचे हे कृत्य बघून काही नतद्रष्ट विरोधकांनी रागाने हातात वीट घेतल्याचेही आमच्या कानावर आले. तथापि, हे सगळे मंदिरनाट्य नाट्यमयरित्या रातोरात शमले! खरेतर कधी एकदा औंधाला जातो, आणि दर्शन घेतो, असे झाले होते. परंतु, तेवढ्यात बातमी आली की रातोरात ते मंदिर हटविण्यात आले.

मा. नमोजी हे आपल्या सर्वांच्या अंतरी वास करुन असतात. (खुलासा : वास करुन म्हंजे…राहतात! ) त्यांचे मंदिर उभारण्याची खरे तर काही गरजच नव्हती. जे दैवत अहोरात्र देहमनात असते, त्याच्या मूर्तीची काय गरज? परंतु, रातोरात मंदिर हटवण्यासारखे काय घडले, हे मात्र कळत नाही. कोरोनाचे कारण देऊन प्रशासनाने मंदिर बंद केले असेल, तर आपल्याला आंदोलन वगैरे करण्याची संधी आहे. सध्या इतर देवळेही बंदच आहेत. परंतु, सदरील नमोमंदिर उघड्यावरच होते. बंद करायला काही स्कोप नव्हता. सबब, ते हटवण्यात आले असावे.

जे काही असेल ते असो, आपणही राज्य पातळीवर असे एखादे मंदिर उभे करण्याची चळवळ सुरु करावी, अशी कल्पना मनात घोळत आहे. मंदिरासाठी मेहनत करायला आपला पक्ष मागेपुढे पाहणार नाही, हे निश्चित. हे तर साक्षात नमोजींचे मंदिर! मी तर म्हणतो की, नमोमंदिरात डाव्या बाजूस मा. श्री. मोटाभाई आणि उजव्या बाजूस मा. श्री. नड्डाजी यांच्याही मूर्ती बसवाव्यात. कशी वाटते कल्पना? कृपया कळवावे.

आपला. चंदूदादा कोल्हापूरकर (सध्या मुक्काम : पुणे) कमळाध्यक्ष.

ता. क. : सदरील नमो मंदिरातील मूर्ती राजस्थान येथून घडवून आणली होती व त्यासाठी सदरील भक्ताने स्वत:चे एक लाख ६० हजार रुपये खर्च केले होते, असे बातमीत म्हटले आहे. आपल्याला (किमान) तीन मूर्त्या लागतील! कळावे. दादा.

मा. दादासाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम विनंती विशेष.

एखादे सुंदरसे नमोमंदिर असावे, त्याच्या भव्य प्राकारात मोर फिरावेत, भक्तांची मने दर्शनहेळामात्रे तृप्त व्हावीत, हे तर माझे जुने स्वप्न आहे. परंतु, राजकारणाच्या धामधुमीत ते मागे पडले. पुण्याजवळ औंधमध्ये एका भक्ताने माझे स्वप्न साकार केले. त्या भक्ताचा आधी सत्कार व्हावा. सदरील भक्तश्रेष्ठास मुंबईतील प्रदेश कार्यालयात बोलावून घ्यावे व त्यास शाल-श्रीफळ (माझ्या हस्ते) देऊन सत्कारावे, असे मला वाटते. पहा, जमते का? जमेलच. मंदिरांचा औंध पॅटर्न इतर राज्यातही राबवायला हरकत नसावी. यासाठी मी स्वत: दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीन. ते नाही म्हणणार नाहीत, याची खात्री आहे. नमो-नड्डाजी-मोटाभाई या त्रिमूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या हृदयात झालीच आहे. त्यांचे मंदिर उभे करायचे झाल्यास आणखी एका मूर्तीची सोय पुढेमागे करता येईल का, हे कृपया पाहावे. मी पुन्हा येणारच आहे ना!!

कळावे. आपला. नानासाहेब फ.

ता. क. : एक लाख साठ हजार? बापरे! मग राहू दे!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT