Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : ए, चला रे अयोध्येला!

‘कृष्णकुंजगडा’वर एकच गडबड उडाली होती. बालेकिल्ल्यात जाग होती. हजारो मनसैनिक हाताच्या घड्या घालून रस्त्याकडे टक लावून पाहात उभे होते.

- ब्रिटिश नंदी

नेमकी तिथी सांगावयाची तर श्रीशके १९४३ मधील आश्विनातली त्रयोदशी. टळटळीत सकाळ होती. (खुलासा : शिवाजी पार्काडात सकाळसुध्दा टळटळीतच असत्ये.)

‘कृष्णकुंजगडा’वर एकच गडबड उडाली होती. बालेकिल्ल्यात जाग होती. हजारो मनसैनिक हाताच्या घड्या घालून रस्त्याकडे टक लावून पाहात उभे होते. इशारत होताच बालेकिल्ल्यात वर्दी देण्याचा हुकूम होता. तेवढ्यात गडाच्या मुख्य दिंडीदरवाजापास एक रसदीची गाडी येऊन उभी राहिली. दारवानाने त्यास हाकलून देण्यासाठी दांडके शोधले. पण तोवर गाडीवानाने ‘प्रकाशमधून साबुदाणा खिचडी, साबुदाणावडा, थालिपीठ आणले आहेत. जाऊ का परत?’ अशी धमकी दिली. ‘प्रकाश’चा साबुदाणावडा ही एक परमेश्वरी कृती (पक्षी : रेसिपी) आहे. तीस नाही म्हणणे म्हंजे घोर पाप! दारवानाने निमूटपणे रसद आत घेतली.

‘बाळाजी, दर्शन की आपूर्ती हुई?’’ राजियांनी मांडचोळणा परिधान करीत शुद्ध घीमधल्या हिंदवी भाषेत पृच्छा केली. (खुलासा : मांडचोळणा हे वस्त्र कसे दिसते, हे इतिहासास ठाऊक नाही. पण या वस्त्राचे नाव कालौघात बदलले तर बरे होईल, अशी नोंद त्याने करुन ठेवली. असो.) हल्ली राजेसाहेब हिंदी शिकून घेत असल्याची कुणकूण गनिमाच्या गोटात लागली आहे.

‘अलबत, वो क्या बोलनेका वो…आपुनका…जाऊ दे! अयोध्येहून गुरु मां आणि आपलं ते हे…आले आहेत! आपल्या भेटीची वेळ मागताती!’’ बाळाजीपंतांनी अखेर मातृभाषेतच खबर दिली. महंमद पर्वताकडे गेला नाही, तर पर्वतानं महंमदाकडे जावं’ हे सुप्रसिद्ध वचन राजियांना आठवले, आणि ते मुस्करले. अयोध्येला जाणं झालं नाही, पण अयोध्या अखेर शिवाजी पार्काडापर्यंत आलीच! याला म्हणतात खळ्ळ…खट्याक!!

तेवढ्यात ‘गाड्या आल्या, गाड्या आल्या’ अशी हाकाटी गडाच्या पायथ्याशी उठली. राजियांनी डोकावून पाहिले. काही साधुवस्त्रांकित व्यक्ती गाडीतून उतरल्या. झेंडूच्या फुलांचे हार इकडेतिकडे झाले. साग्रसंगीत स्वागत झाले. प्रवेशद्वाराशीच राजियांच्या श्वानमित्रांचा पिंजरा होता, परंतु, तो रिकामा बघून साधुमंडळींनी घाईघाईने बालेकिल्ला गाठला… राजियांनी त्यांचे मनोभावे स्वागत केले.

‘हे धर्मपुत्र, आपही अब हम सब के लिए आसा का अस्थान है, क्रिपया अजुध्या पधारिए, हम आपका वहां बडी प्रफुल्लतासे स्वागत करेंगे!’’ अशा आशयाचे निमंत्रण साधुमंडळींनी राजियांना दिले. बेसावधपणाने राजेसाहेब प्रथम ‘‘बरं बरं, बघू’’ असे नेहमीप्रमाणे म्हणाले.

‘अयोध्येत किती टोलनाके आहेत?,’’ असा प्रश्न कुणीतरी तिथे गाढवासारखा विचारला, त्यास हाकलून देण्यात आले. तदपश्चात उत्तरेतून आलेली ती ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे आणि राजेसाहेब यांच्यामध्ये बराच विचारविमर्श झाला. अखेर सर्व साबुदाणे वडे, साबुदाणा खिचडी, थालिपीठे यांचे समुचित निर्दाळण करुन साधुमंडळी रवाना झाली.

या भेटीनंतर साधुमंडळींनी जे काही सांगितले ते ऐकून काही पत्रकार निपचित पडले. इतिहासपुरुषाने तर महागामोलाचा कांदाच मागवला! साधुमंडळी म्हणाली : राजेसाहब को हमने अजुध्या आने का हार्दिक निमंत्रण दिया है, और वह दिसंबर में वहां पधारेंगे ऐसा आश्वासन उन्होने दिया है! राजेसाहब को उत्तर भारतीय बंधुंओं के प्रति बहुत प्रेम एवं आदर है…बाकी सब अपप्रचार है!’’

राजेसाहेबांनी डिसेंबरचे वेळापत्रक आत्तापासूनच ठरवले, यावरच मुळात अनेकांचा विश्वास बसत नव्हता. राजेसाहेब एकटेच विचारात पडले होते. त्यांनी शेजारी अदबीने उभ्या असलेल्या बाळाजीपंतांना विचारले की, ‘‘…परवा दसऱा मेळाव्यात ते ‘नवहिंदू, नवहिंदू’ कोणाला चिडवत होते हो?’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT