Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : चहावाला वि. लिंबू सरबत!

ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) हलोऽऽ...कोरोना गो!!मातोश्री?
दादू : (सावधपणे फोन उचलत) गो कोरोना!! कोण बोलतंय?
सदू : (आवाज ओळखत) दादूराया, मी बोलतोय, सदू!! कसा आहेस?
दादू : (अघळपघळपणे) मज्जेत! आणि तू?
सदू : (खुशालीत) टॉप!! इथं आमच्या शिवाजी पार्कात सगळं शांत आहे!
दादू : (समजुतदारपणे) घराबाहेर पडू नकोस हं!
सदू : (दिलासा देत) मी एरवीही बाहेर पडत नाही! 
दादू : (खवचटपणे) तेही खरंच! घरकोंबडा! हुहु!!
सदू : (दुर्लक्ष करत)...आणि तुझं काय दादूराया? 
दादू : (गंभीरपणाने) मी माझ्या महाराष्ट्राच्या काळजीत व्यग्र आहे, सदूराया! दिवसभर मी खूप बिझी असतो! माझ्या महाराष्ट्रावर संकट आलं आहे!
सदू : (कळकळीने) माझ्याही! 
दादू : (खवचटपणे) मला तुझीही काळजी वाटते रे! जो कोणी माझ्या महाराष्ट्राकडे वाईट नजरेनं बघेल, त्याची गाठ माझ्याशी आहे, असं तू म्हणायचास! आता काय करशील?
सदू : (त्वेषाने) गोळ्या घातल्या पाहिजेत यांना!
दादू : (गोंधळून) विषाणूला गोळी कशी घालणार? घातलीच तर औषधाची घालावी लागेल ना?
सदू : मी औषधाच्या गोळ्यांबद्‌दलच बोलत होतो!!
दादू : (भावविवश होत) केवढं मोठं संकट रे, केवढं मोठं संकट! या महामारीच्या संकटातून माझा महाराष्ट्र सुखरुप बाहेर काढण्याचं काम मला करायचं आहे! खूप मोठी जबाबदारी आहे, सदूराया! 
सदू : तुझ्या शेजारच्या गल्लीतल्या चहाच्या टपरीवरचा चहावाला विलगीकरण कक्षात गेला म्हणे! तुझे एकशेसत्तर कर्मचारीही आयसोलेट करण्यात आल्याचं कळलं!
दादू : (काळजीच्या सुरात) हो ना! पण कोणी दिली तुला ही ब्रेकिंग न्यूज?
सदू : (कोरडेपणाने) टीव्हीवर कालपास्नं दाखवताहेत! म्हणून तर फोन केला! तू तिथं, त्या टपरीवर चहा प्यायला गेला नव्हतास ना?
दादू : नाय, नो नेव्हर! एकतर मी चहाच पीत नाही! 
सदू : (जीव भांड्यात पडत) मग काही टेन्शन नाही! मला आपली उगीच काळजी वाटत होती!
दादू : (खुलासा करत) मी हल्ली लिंबू सरबत पितो! साध्या पाण्यात हं! फ्रिजमधली बाटली काढून तोंडाला नाही काही लावत!! शिवाय लिंबामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते म्हणे! सदूराया, तूसुद्धा लिंबू सरबत करुन पीत जा हं! संत्रीबिंत्री खात जा जरा! प्रकृतीची काळजी घे! महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझं आवाहन आहे की चहा सोडा, लिंबू सरबत प्या! 
सदू : (अमान्य करत) चहा हे आपलं राष्ट्रीय पेय आहे! अनेकांचं चहाशिवाय अडतं! 
दादू : (निर्धारानं) नहा चकोच...आपलं ते हे...चहा नकोच! मी तर माझ्या पुढल्या भाषणात "लिंबूसरबताचे फायदे'' जनतेला सांगणार आहे! "मास्क लावा, लिंबू सरबत प्या'' हाच माझा महाराष्ट्राला संदेश असणार आहे!
सदू : मास्क लावून सरबत कसं पिता येईल दादूराया? 
दादू : (शिताफीने विषय बदलत) तुमच्या परिसरात लॉकडाऊन व्यवस्थित चालू राहील, याची काळजी तू घ्यायला हवीस! ती तुझी जबाबदारी आहे, सदूराया!!
सदू : (शांतपणे) इथं चहाच्या सगळ्या टपऱ्या बंद आहेत! काळजी नको!
दादू : (चिडून) मघापास्नं बघतोय! सारखं "चहा, चहा, चहा'' चाललंय तुझं! माझा चहा आणि चहावाल्याशी आता काहीही संबंध नाही! कळलं? जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT