Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : लॉकडाऊन, नॉकडाऊन वगैरे!

-ब्रिटिश नंदी

माझ्या तमाम बंधूंनो, भगिनीन्नो आणि मातांन्नो, दरवेळी मी सनडाऊन झाल्यावर (पक्षी : संध्याकाळी) टीव्हीवर तुमच्या घरात येतो, आणि ‘हात धुवा, मास्क लावा’ वगैरे सांगत असतो. संकट अजून टळलेलं नाही, हेच दरवेळी सांगावं लागतं. पण यावेळी मात्र वेगळी बातमी आहे! खरं तर ही बातमी मी स्वत: टीव्हीवर येऊन तुम्हाला सांगावी असं मला सुचवण्यात आलं होतं. पण तेवढ्यात आमचा कांप्युटर शटडाऊन झाला. त्यामुळे तुमच्याशी लिंक जुळेना! लिंक जुळली नाही तर ‘लाइव’ कसं करायचं? पण मी म्हणालो, ‘‘माझ्या महाराष्ट्राशी माझी लिंक पहिल्यापासूनच जाम जुळली आहे. यह फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं!’’

आता ज्याला मी लिंक म्हणतो, त्याला नाके मुरडून आमचे विरोधक विरोधी मतांची पिंक टाकतील. त्यांना दुसरं कामच उरलेलं नाही. पण मला राजकारण करायचं नाही. मी एवढंच सांगेन की, पिंक टाकताना काळजी घ्या! -शिंक येईल!! शिंक आली की टेस्ट करावी लागेल!! तेव्हा काही काळ तोंडाला डिंक लावा.

माझ्या बं. भ. मा. नो, बातमी अशी आहे की, माझा महाराष्ट्र आज (एकदाचा) टाळेबंदीतून बाहेर येत आहे. मला आनंद आहे. खरंच आनंद आहे. का नाही होणार? किंबहुना झालाच आहे. इतका की, या आनंदाने आमच्या बाराबंदीचे बंद तटतटा तुटले आहेत. माझ्या महाराष्ट्राला लागलेलं ‘लॉक’ एकदाचं ‘डाऊन’ झालं! अर्थात हे लॉक पूर्णत: डाऊन झालेलं नाही, हे माझ्या मराठी बं. भ. मा.नी ध्यानात घ्यावं. नाहीतर सगळंच पुन्हा ब्रेकडाऊन होईल. लाटांमागून लाट, लाटांमागून लाट असं सारखं अपडाऊन चाललं आहे. ते सगळं थांबायला हवं. कारण माझ्या महाराष्ट्राचं अर्थचक्र चालू ठेवायला हवं आहे. कोरोनाची दृष्टी पुन्हा वक्र झाली की चक्र पुन्हा थांबणार! पण (माझ्या बं. भ. मा. नो), तुम्ही फिक्र करु नका!

माझा महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे आणि ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं सुभाषित तुम्हालाही तोंडपाठ झालं आहे. चेक द ब्रेन... सॉरी... ब्रेन द चेक... पुन्हा चुकलो...’ चेक द ब्रेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने, हप्त्याहप्त्याने आणि सप्त्यासप्त्याने राज्यातील लॉकडाऊन उठणार आहे. त्यासाठी आपण पाच पातळ्या केल्या आहेत. आपण कुठल्या पातळीवर आहोत, हे लक्षात ठेवून वागा. पातळी सोडून वागू नका. नाक्‍यावर पोलिस उभे आहेत!

माणसाने आपली पातळी ओळखून वागावं. आमच्या विरोधकांची तळी उचललीत, तर पश्‍चात्तापाची पाळी येईल! जो पातळी राखी, तो सवलती चाखी! एका लेव्हलमधून वरच्या लेव्हलवर जाण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायला हवा. एकेक पायरी चढत चढत वर गेलात की, काम फत्ते! कोरोनाला पायऱ्या चढता येत नाहीत, तो लिफ्टने जातो, असं नवं संशोधन जर्मनीत झाल्याचं डब्ल्यूएचोनं कळवलंय!

बॉक्‍सिंगमध्ये मारतात तसा कोरोनाला पंच मारुन दुसऱ्या फेरीत नॉकडाऊन करण्यासाठी आपण लॉकडाऊन केला होता. आता तो पाणी मागायलाही उठणार नाही, अशी सोय करायला हवी. त्यासाठी स्वयंशिस्त पाळा, तुमच्यावरच माझी स्वयंभिस्त आहे. लॉकडाऊन झाला, नॉकडाऊनही झाला, आता तिसऱ्या लाटेचा शॉकडाऊन नको असेल तर... मास्क लावा, हात धुवा आणि गर्दी टाळा! लाटेगणिक माझ्या शाब्दिक कोट्या वाढत जातील, हा वैधानिक इशारासुद्धा आधीच देऊन ठेवतो! तेव्हा होश्‍शियार! जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT