Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : व्हान गॉगची चांदरात!

ब्रिटिश नंदी

थंडगार खोलीच्या पूर्वेकडल्या 
खिडकीतील आभाळभर तुकड्याकडे
त्यानं पाहिलं क्षणभर, 
तो पाहातच राहिला...
निश्‍चेष्ट वस्तुजातावर
पिठूर चांदणे सांडले होते.
दूरवर संन्यस्त दिवसाच्या
तात्पुरत्या मुक्कामाप्रमाणे
मंदपणे उजळू पाहणाऱ्या
शांतपणे निजलेली घरे,
उतरत्या छपरांचे पंख सिमटून
पिले सांभाळणाऱ्या कोंबडीसारखी
स्थितीशील बसलेली.
चराचराने घातलेल्या हजारो
प्रश्‍नकोड्यांना उत्तरे देत देत
मंद्रपणे फिरणारी उत्तररात्र.
तिच्या उत्तरीयाचे वळणदार लफ्फे.
तिच्या पावलागणिक अतिक्रमित 
होत जाणारी असहाय नभोभूमी.
स्वमग्नपणे स्वत:तच विकल विकल
होत उसळलेला भावुक चांदवा,
आणि तेजोमेघांच्या, तारका मंडळांच्या,
आकाशगंगांच्या तेजस्वी गर्दीत
सारा परावलंबी उजेड पणाला लावत
नेहमीच्या लकबीने उजळणारी 
क्षितिजसखी शुक्राची चांदणी. 
...आणि या साऱ्याशी मौनाची
भाषांतरे करणारा एकच एक,
एकलकोंडा तो सायप्रस वृक्ष.

‘‘स्टारी नाइट्‌! स्टारी नाइट!’’
खिडकीतूनच तो ओरडला,
‘‘तुम्ही का आलात? का?
इतके दिवस कुठे होतात? कुठे?
कशाला छळता मला? कशाला?’’
भाषांतऱ्या सायप्रस वृक्षाने
त्याच्या क्षोभाचे अनुवाद कसे केले,
कुणास ठाऊक. पण-
क्षणार्धात विलग होत गेले
तेजोमेघ, चांदण्यांचे कळप पांगले,
स्वमग्न चंद्र गरगरा फिरायचा थांबला,
चर्चच्या घुमटावरल्या दिव्यासारखी
क्षणभर लुकलुकली शुक्राची चांदणी
पिठूर चांदरातीची झाली राख
जागच्या जागी!

तो घाईघाईने धडपडला, आणि
लावून घेतली त्याने खिडकी
आतून घट्ट कडी घालत,
दोन दोन कुलुपे लावत
कडेकोट बंदोबस्त केला
मुजोर चांदरातीचा.
एवढे करून तो शिरला 
अंतिमत: आडोशासाठी 
-एका रिकाम्या कॅनव्हासमध्ये.
पुढे काय झालं कोण जाणे!
काही महिन्यांनंतर त्यानं
पिस्तूल झाडून घेत सुसाइड 
केल्याची बातमी आली होती म्हणे!
ते तितकंसं खरं नाही-नसावं!
...तो अजूनही असेल त्या
कॅनव्हासमधल्या गूढ चांदरातीत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT