Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : कुणीही कुणाचं असतं..!

आदरणीय कमळाध्यक्ष मा. चंदुदादा यांसी शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे! तुम जिओ हजारो साल, साल के दिन अच्छे हो, और हो पचास हजार!!

- ब्रिटिश नंदी

।।श्री नमोनारायण प्रसन्न।।

आदरणीय कमळाध्यक्ष मा. चंदुदादा यांसी शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे! तुम जिओ हजारो साल, साल के दिन अच्छे हो, और हो पचास हजार!! (सोबत हापूस आंब्याचा खोका पाठवत आहे. आंबे संपल्यावर खोका जपून ठेवावा ही विनंती.) आपल्यासारख्या अजातशत्रू, मनमिळावु आणि दिलखुलास नेतृत्वाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कार्य करताना किती स्फूर्ती येते, हे मी काय सांगावे? कडक निर्बंधांचा काच नसता तर महाराष्ट्रभर नुसती धमाल उडवून दिली असती. पण काळ विपरित आहे. तूर्त आंब्याच्या पेटीवर भागवून घेणे. तुम्हाला राजकारणात यायचे नव्हते, तरीही तुम्ही सतरा वर्षे राजकारणात काढली, असे मी तुमच्याच एका मुलाखतीत वाचले. आदर दुणावला! माणसाला समाजभान हवे, असेही तुम्ही म्हणालात. हे सगळे मला उद्देशून तर नाही ना, असा विचार क्षणभर मनाला चाटून गेला. तसे असेल तर, त्याप्रमाणे वागण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आपल्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी समाजभान ठेवून गावोगाव आपले अभीष्ट चिंतणारी होर्डिंगे लावली आहेत. (पुण्यात तर विचारु नका!) आम्हीही नागपुरात बरीच होर्डिंगे लावली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

मा. दादा, खरे सांगायचे तर सध्या माझा मूड काही बरा नाही. गेले दोन-तीन दिवस अक्षरश: डोळ्याला डोळा लागलेला नाही. नैराश्याचे ढग मनाच्या आभाळात जमू लागले आहेत. कुठल्याही क्षणी अतिवृष्टी होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. काय करु? कारणच तसे घडले आहे. राजकारणात कुणी कुणाचे नसते हे जितके खरे आहे, तितकेच ‘कुणीही कुणाचेही काहीच्या काहीच असते’ हेही तितकेच सत्य आहे. आपले वांदऱ्याचे माजी मित्र आणि त्यांचे दोन सहकारी (त्यापैकी एक माझे एकट्याचे माजी मित्र आहेत. भल्या पहाटेही माझ्यासाठी धावून येतील! असो.) असे सत्ताधाऱ्यांचे एक त्रिकूट नुकतेच दिल्लीला जाऊन आले. आता दिल्लीला जाऊन यांनी आपल्या नेत्यांना भेटावे आणि परत यावे की नाही? पण छे, ते आपल्या परम आदरणीय, प्रार्थनीय आणि वंदनीय मा. श्रीश्री नमोजी यांनाच भेटले. नुसतेच भेटले नाहीत तर चांगले दीड-पावणेदोन तास भेटले! आपल्याला मा. नमोजी कितीवेळा दीडपावणेदोन तास भेटले? जरा आठवा! मी स्मरणशक्तीला ताण देऊन पाहिले.

अंहं! एकदाही भेटल्याचे आठवत नाही. बहुतेकदा उभ्या उभ्या ते फक्त भिवई उंचावून ओळख तेवढी दाखवतात. मूड चांगला असेल तर किंचितसे हसल्याचा भास होतो. ‘‘काय कसा काय? बरा आहे ने?’’ असे एकदा त्यांनी शिबिरात विचारले होते. त्यानंतर सलग एवढे शब्द त्या मुखातून कानावर पडले नाहीत. पण या तिघांना मात्र ते दीड- पावणेदोन तास भेटले! त्यातही वरकडी म्हंजे बांदऱ्याच्या मित्रांना खाजगीत अर्धा तास भेटले!! अर्धा तास!! मा. नमोजींचे तेज अर्धा तास एकट्याने सहन करणे सोपे का आहे? कसे काय सहन केले असेल कुणास ठाऊक!

दीडपावणेदोन तासात त्यांचे नेमके काय बोलणे झाले असेल? मी पुन्हा येईन की पुन्हा जाईन? काही कळेनासे झाले आहे. कुणीही कुणाचं नसतं हेच खरं…! छे छे, कुणीही कुणाचं काहीही असतं हे जास्त खरं!! असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा! बाकी भेटीअंती बोलूच. बोलण्यासारखे तरी आता काय राहिले आहे? जाऊ द्या. आपला.

नानासाहेब फ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT