Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : घ्यावा राम, द्यावा राम!

ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके १९४२  
श्रावण कृ. द्वादशी. आजचा वार : सुवर्णवार!
आजचा सुविचार : अनुदिनी अनुतापे तापलो रामराया!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( १०८वेळा लिहिणे) सकाळी लौकर उठलो. तात्काळ दांडीवरला (वाळत असलेला) टावेल ओढला आणि न्हाणीघरात शिरलो. शुचिर्भूत होऊन मनोभावे टीव्हीसमोर बसलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामरक्षास्तोत्रापासून हनुमानचालीसापर्यत सारे काही पठण केले. देहाने महाराष्ट्रात असलो तरी मनाने आज मी अयोध्येत होतो. दिवसभर तेथील मांडवात हिंडलो. शरयुच्या जळात न्हालो. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आहे, हे तर साऱ्यांनाच मान्य व्हावे!  तसेच करावे म्हणून गेले तीन दिवस सुवर्णरंगी शाईचे पेन शोधत होतो -मिळाली नाही! हळहळलो. शेवटी भगव्या रंगाच्या स्केचपेनने हा मजकूर लिहीत आहे. 

अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला नक्की येणार, अशी खात्री होती. हा कोरोना शिंचा मध्येच कडमडला. अन्यथा, अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या त्या थरारक आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी गेलोच असतो. साऱ्या भारतवर्षाचे डोळे आज अयोध्येकडे लागले होते. -त्यातले दोन डोळे माझेही होतेच!!  टीव्हीवर होते फक्त आमचे आदरणीय, प्रार्थनीय, वंदनीय श्रीश्री नमोजी!!  त्यांना बघितले आणि डोळ्यांचे पारणे फिटले! (त्यांच्यासारखी दाढी वाढवावी, असे मनात येत आहे. असो.)

डोळ्यांदेखत इतिहास घडताना पाहिला. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी स्वत: अयोध्येत होतो, ते दृश्‍य आजही मन:चक्षूंसमोर तरळते आहे. अहाहा! काय ते अयोध्येचे पवित्र वातावरण! शरयु नदीत रोज स्नान करूनही एकदाही पडसे झाले नाही, यात सारे काही आले!! खरे तर आजच्या शुभदिनी मी अयोध्येत असायचा. पण नाही जमले. निमंत्रण नव्हते हा भाग वेगळा, पण सध्याच्या परिस्थितीत जाणे योग्य ठरले नसते. शिवाय आम्हासारख्या कोट्यवधी भक्तांच्या वतीने साक्षात श्रीश्री नमोजी तिथे उपस्थित होते. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी अखेर नद्यांद्वारे सागराला मिळते, त्याप्रमाणे प्रत्यक्ष नमोजींमध्येच आमचे अस्तित्त्व सामावलेले आहे. त्यांनी अयोध्येत लोटांगण घातले, ते मी टीव्हीवर नीट पाहू शकलो नाही. कारण तेव्हा मीदेखील टीव्हीसमोर लोटांगण घातले होते. असो.

या सोहळ्याला उपस्थित राहण्याची अनेकांची इच्छा होती. आमच्या परिवारातले लोक होतेच, पण आश्‍चर्य म्हंजे काही काँग्रेस नेत्यांनी ‘निमंत्रण मिळू शकते का?’ याच्या चौकश्‍या केल्या. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री श्रीमान कमलनाथ यांनी तर अकरा किलो चांदीच्या विटा मंदिरासाठी पाठवण्याचे जाहीर केले. कमलनाथसाहेब बिभीषण आहेत, असे मनात येऊन गेले. कांग्रेसवाल्यांची ही भक्ती हा चमत्कार म्हणायचा की काळाचा महिमा? जाऊ दे.  

आपण इथेच राहू आणि आमचे माजी परममित्र श्रीमान उधोजीसाहेब मात्र गपचूप अयोध्येला जातील, अशी भीती वाटत होती. (त्यांचा काय भरवसा?) म्हणून त्यांना गेल्या आठवड्यातच ‘तुम्ही अयोध्येला जाणार आहात ना?’ असे व्हॉट्‌सअपवर  मेसेज पाठवून विचारले होते. पण उत्तरादाखल त्यांनी चिडक्‍या चेहऱ्याची स्माइली आणि मूठ उगारल्याची खूण पाठवलीन! मग मी नाद सोडला. एखादे माणूस फार रागावले असेल तर त्याला उगीचच त्रास देऊ नये! राग शांत झाला की आपोआप ते माणूस आपल्याशी बोलायला येत्ये, असा माझा अनुभव आहे. येतील येतील! ‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया’ असे रोज सांकडे घालतो आहे. मी अयोध्येला (पुन्हा) जाईन!  जय श्रीराम.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT