Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग ; खुल जा जिम जिम!

ब्रिटिश नंदी

प्रति, नानासाहेब फडणवीस यांसी, राज्यातील जिमनॅशियम आणि व्यायामशाळा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करणारे तुमचे पत्र मिळाले. तुम्ही ही मागणी करावीत? आश्‍चर्य वाटले! काहीही असो, ते पत्र आम्ही (घाम पुसून) केराच्या टोपलीत टाकले आहे. जिम इतक्‍यात सुरू करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. जिममध्ये लोक व्यायाम करुन ‘फासफुस्स फासफुस्स’ असा श्वासोच्छ्वास करतात, हे मी पाहिले आहे. - याने कोरोना वाढतो! उगीच रोगाला आमंत्रण देण्यात मतलब नाही. तेव्हा तुमची मागणी फेटाळण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या दादरच्या चुलतबंधूंनीदेखील अशीच मागणी केल्याचे कळले. त्यांचाही व्यायामाशी काय संबंध? हे अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही! तुम्ही दोघांनी हे काय नवीन प्रकरण लावून धरले आहे? आपल्याला जमते, तेच आपण करावे. जिमबिम ही आपली कामे नव्हेत! आमच्या चुलतबंधूंनाही (परस्पर) हा निरोप पोचवा.- जिम इतक्‍यात सुरू होणार नाही, म्हंजे नाही! अजून संकट टळलेले नाही, भलभलत्या मागण्या करू नका! कळावे. 
उ. ठा. (मा. मु. म. रा.)
ता. क. : तुमच्या पत्रातील मजकुराखाली एक गोल डब्याचे चित्र कशासाठी काढले आहे? कळले नाही! कळावे. उ. ठा.

प्रिय मित्रवर्य मा. श्री. उधोजीसाहेब, मा. मु. म. रा. यांसी, शतप्रतिशत प्रणाम. जिम पुन्हा सुरू कराव्यात असे पत्र मी तुम्हाला धाडले होते, हे खरे. ते आपण केराच्या टोपलीत टाकावे, हेही योग्यच. म्हणूनच त्या पत्राच्या तळाशी मी एक डस्टबिनचे चित्र काढले होते. पत्र लागलीच डब्यात टाकावे, हेच मला खुणेने सुचवायचे होते. अहो, इथे कोणाला व्यायामात इंटरेस आहे? परवाच्या दिवशी काही व्यायामपटू निवेदन घेऊन आमच्याकडे आले. त्यांना बघूनच मला धाप लागली!! हे शरीरसौष्ठववाले खरोखर छातीत धडकीच भरवतात! काय तो एकेकाचा आकार! काय ते दंड!! छे!!

दंडातल्या बेटकुळ्या दाखवत त्यांच्यापैकी एकजण  घोगऱ्या आवाजात म्हणाला की,‘‘ साहेब, जिम सुरू करायची आहे!’’
‘मग? ’’ मी आवंढा गिळत म्हणालो. आता मी या व्यायामबियामवाल्यांपैकी आहे, हे त्याला कुणी सांगितले देव जाणे!

‘सीएससाहेब आमचं ऐकत नाहीत! तुम्ही काही तरी करा!,’’ तो आणखी घोगऱ्या आवाजात म्हणाला. हे म्हणताना त्याने स्वत:च्या मांडीवर एक आणि दंडावर एक अशा दोन थापा मारल्या. वास्तविक हे शड्डू ठोकणे वगैरे आपल्याला पसंत नाही. इलेक्‍शनच्या काळात पैलवानकीचे काही धडे मिळाले होते. पण...असो! तो इतिहास झाला. 

त्याचे असे आहे की, सहा फुटी, घट्ट टीशर्टवाले अर्धाडझन व्यायामपटू आपल्या भोवती उभे राहिले की त्यांचे ऐकावेच लागते! तुम्ही प्रत्यक्ष त्यांचे निवेदन स्वीकारले असतेत, तर तिथल्या तिथे जिम चालू करण्याची ऑर्डर काढली असतीत, हे मी खात्रीने सांगू शकतो. परंतु, तुम्ही सध्या कुणालाच भेटत नसल्याने वाचलात! आम्ही अडकलो!! 

त्या जिमवाल्यांच्या घोळक़्यात बसून मी निमूटपणाने त्यांच्यासमोर तुम्हाला पत्र लिहून पाठवले. काय करणार? तुमच्या दादरच्या चुलतबंधूंकडेही ते लोक गेले होते. तेव्हाही असाच साधारण प्रकार घडला असणार, असे मला वाटते. एरवी, आपण या व्यायामबियाम प्रकरणापासून ‘दो गज की दूरी’ पाळत आलो आहो! तुम्हाला सारे माहीत आहे. 

बाकी, जसे जमेल तसे करा! काहीही घाई नाही! लॉकडाउन संपला की भेटू! मी पुन्हा येईनच!! कळावे. 
आपला. नानासाहेब फ.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT