Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : किल्ले ग्लॅमरगड!

ब्रिटिश नंदी

इतिहासपुरुष प्राणांतिक दचकला! त्याच्या हातातील लेखणी गळून पडली आणि पुढ्यातील भुर्जपत्राची पुनश्‍च गुंडाळी होवोन त्यास वांकुल्या दाखवू लागली. शिवाजी पार्काडाच्या निवांत वस्तीत अचानक कोलाहल झाला. पाखरे अस्मानात उडाली, आणि पुनश्‍च वळचणीला बसली. निमित्तच तसें घडिले! शिवाजी पार्काडाच्या नाकाडावर स्थित कृष्णकुंजगडावरोन अचानक युद्धाची गर्जना दुमदुमली होती...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्यात (पक्षी : चौथा मजला) महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची मसलत सुरु होती. अष्टप्रधान मंडळ हात बांधोन विनम्रपणे उभे होते.
‘दौलतीचा हाल हवाल काय आहे? काही गोपनीय खबर?...’ राजियांनी काळजीकाट्याने रयतेची चवकशी आरंभली.
‘प्रभादेवी, दादर आणि माहीम भागात उद्या आणि परवा पाणीपुरवठा होणार नाही!,’ कुणीतरी खबर दिली. राजियांनी इकडे तिकडे पाहात काही फेकून मारावयास मिळते काय, ते पाहिले. तोवर खबर देणारा खांबाआड दडून सुरक्षित जाहला होता.

‘पाणी, वीजबिलांचे विषय काढो नका!’ राजियांनी संयम ठेवून पुढील सूचना कडक आवाजात केली. त्यांचे योग्यच होते. रयतेसमोर येवढी संकटे उभी असताना पाणी, वीजबिलांचे कसले विषय काढतात? अशाने महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार?
‘कुणी एक योगी स्वराज्यात घुसला असोन मुंबापुरीच्या गळ्यातील ‘बॉलिवुड’नामक कंठमणी चोरुन नेण्याचा कट त्याने रचला असल्याचे खातरीलायक खबर आहे, साहेब!’ कुणीतरी खरीखुरी खबर दिली. 
‘बॉलिवुड? म्हंजे आपला ग्लॅमरगड? चोरुन नेणार? अशक्‍य!!,’ राजे च्याटंच्याट पडिले. त्यांचा अजिबात विश्वास बसेना!

‘अगदी शंभर हिश्‍शांनी पक्की खबर आहे. सदर योगी मुंबईत येका पंचतारांकित हाटेलात उतरला असोन कटकारस्थान शिजवीत आहे...येथील ग्लॅमरगड उचलोन उत्तर प्रदेशात नेण्यासाठी सदर योगियाने मंत्रतंत्र आरंभले असल्याची जबर्दस्त खबर आपल्या गुप्तहेराने आणिली आहे!’ कुणीतरी अधिकची माहिती दिली.

‘कोण...कोण आहे तो भुरटा?’ राजियांनी गर्रकन मान वळवोन सर्रकन तलवार उपसत सवाल केला. ते कडाडले, ‘कवण कोठले भुरटे साधुबैराग्याच्या वेषात महाराष्ट्रात येतात, आणि येथील नायाब चीजवस्त लंपास करितात? आपण नुसते बघत राहावयाचे काये? ऐसे घडेल तर रयतेस कोठल्या मुखाने उत्तर देणार? बोला, बोला ना!’
राजियांचा संताप अनावर जाहला होता. भिवई वक्र जाहली होती. डोळियांत अंगार पेटला होता.
‘सत्य आहे साहेब! प्रंतु, आपल्याकडील काही चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि नट मंडळी त्या योगियास जावोन भेटत आहेती! त्यांचा काहीतरी बंदोबस्त करणें भाग आहे! अन्यथा, आपुलेच दांत आणि आपुलेच ओठ ऐसी गत व्हावयाची...’ कुणीतरी पोक्तपणे सल्लामशवरा दिला. 

‘हुं:!! आमचा ग्लॅमरगड म्हंजे कोथिंबिरीची जुडी नव्हे, की घातली पिशवीत आणि नेली घरी! चहोबाजूंस दुर्गम कडे असलेला बांका किल्ला आहे तो!..,’ राजियांनी तुच्छता-कम-अभिमानाने उद्गार काढले.
‘ग्लॅमरगड उत्तरेत गेला तर भलतीच पंचाइत होईल साहेब! मग आपण कोठे जावयाचे?,’ कुणीतरी पुन्हा चिंताग्रस्त होत्साते म्हणाले. बॉलिवुड उत्तरेत जाणार म्हंजे सगळे तारेसितारेही तेथे जाणार. त्या पार्ट्या, त्या फ्याशनी, ते गॉसिप, ती सिताऱ्यांची उठबस, ती मुहूर्ताची निमंत्रणे, ते खळ्ळ खट्याक... सारे काही लोप पावणार. मग राज्य करावयाचे कोणावर? आणि नवनिर्माण साधावयाचे ते कसे?
...राजियांनी सारे ऐकोन घेतले आणि निर्णय दिला. म्हणाले, ‘ पाणी आणि वीजबिले राहूदेत...आता मोहीम किल्ले ग्लॅमरगड राखण्याची! आधी लगीन ग्लॅमरगडाचे, मग पाणी आणि वीजबिलांचे!! जय महाराष्ट्र!!’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT