Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : वाघ आणि मावशी! (एक अरण्यवाचन…)

-ब्रिटिश नंदी

पावसाने जंगल ओलेचिंब झाले होते. पाणवठ्यालगतच्या काळा आंबा मचाणावर बसून दोन शिकारी जंगलाचे निरीक्षण करत होते. दूरवर चितळांचा एक कळप चरत होता. रानडुकरांची एक सगर (अर्थ : सहकुटुंब सहलेकरे डुकरिणीचे लटांबर) वायव्येकडून नैऋत्येकडे पळत गेली. थोरल्या शिकाऱ्याने तशी नोंद डायरीमध्ये केली. रानडुकरांना दिशाज्ञान असते का? अशी शंका धाकल्या शिकाऱ्याने व्यक्त केली. त्यावर थोरल्या शिकाऱ्याने ‘अर्थात’ असे ताडकन उत्तर दिले.

‘बॅब्स, काळा आंबा कसा असतो?’ धाकल्या शिकाऱ्याने बालसुलभ शंका विचारली. थोरल्या शिकाऱ्याने आवंढा गिळला.

‘आपण बसलोय तसा! गप्प बस!! थोरला शिकारी म्हणाला. पाणवठा शांत होता. हुदाळे बिळात दडून बसले होते. (हा प्राणी एकदा बघून ठेवला पायजेलाय!) धावड्याच्या वृक्षावर (या झाडाचे नाव असे का? जाऊ दे. धावडा तर धावडा! आपल्याला काय?) सर्पगरुड चोचीने पंख तपासत बसला होता. तेवढ्यात नेपतीच्या (की कारवीच्या?) झुडपात खसफस झाली. अर्जुनाच्या झाडावरील लंगूरांच्या टोळीप्रमुखाने ‘खर्रर्र खक खक’ असा कॉल दिला. चितळाने ‘पाँक’ असा आवाज केला. याचा अर्थ नेपतीच्या झुडपात वाघ असणार! वाघ आला की जंगलातले प्राणी एकमेकांना असे सावध करणारे कॉल्स देतात म्हणे. ते कॉल्स मुरलेले शिकारी बरोब्बर पकडतात. मोरसुद्धा असे संकेत देतो…थोरल्या शिकाऱ्याने धाकल्या शिकाऱ्याचा अरण्यवाचनाचा धडा घ्यायला सुरवात केली.

‘कॉल्स पकडतात? म्हंजे शिकाऱ्यांकडे पेगॅसस स्पायवेअर असतं का, बॅब्स?’ धाकला शिकारी आपले निरागसपण सोडता सोडत नव्हता. त्याचा प्रश्न ऐकून आपणही कुठल्या प्रकारचा कॉल द्यावा, याचा थोरला शिकारी गंभीरपणाने विचार करु लागला…

‘पेगॅसस नाही रे…पण थोडं फार तसंच!’ थोरल्या शिकाऱ्याने वेळ मारुन नेली.

‘बॅब्स, अजून किती वेळ इथे बसायचंय?’ धाकल्या शिकाऱ्याने विचारले. त्यावर दुर्बिणीने दूर पाहात थोरला शिकारी खेकसला, ‘‘श्श्श..! बोलू नकोस…’

‘रेनकोट घालून मचाणावर बसण्यात काय पॉइण्ट आहे?’’ धाकल्या शिकाऱ्याने वैतागून म्हटले. थोरल्या शिकाऱ्याने त्याला गप्प बसण्यासाठी एक प्रोटिन बार खायला दिला.

‘बॅब्स…आपण वाघ आहोत की माणूस?’’ निरागस प्रश्नाची पुढली फैर झडली. थोरल्या शिकाऱ्याने दात ओठ खाल्ले. डबक्यासारखे डबके समोर दिसत असताना त्याला काटेझरी, आंबाझरी, पिटेझरी अशी नावे का द्यायची? नरक्याचे झाड कसे दिसते? वाघ गाऱ्यावर आला असे कां म्हणतात? हुदाळे हा प्राणी आहे की कुणाचे आडनाव? गाढवाच्या अंगावर काळे पट्टे ओढले तर त्याचा झेब्रा होईल का? ताडोबामध्ये जिराफ का नाहीत? बोरिवली नॅशनल पार्कात कांगारु आणून सोडले तर काय होईल? असले पुढले अनेक जटिल प्रश्न थोरल्या शिकाऱ्याला दिसू लागले होते…

मागे एकदा थोरल्या शिकाऱ्याला ‘आपण वाघ तर वाघाची मावशी कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा थोरल्या शिकाऱ्याने बडगा शोधण्याचा क्षीण प्रयत्न केला होता.

‘आपण वाघ आहोत, वाघ!’ थोरला शिकारी डरकाळला. तेवढ्यात नेपतीच्या की कारवीच्या झुडपातून एक रागीट मुस्कट (अर्थ : तोंड) दिसू लागले.

एक बंगाली वाघीण चिडून बाहेर येत होती. आपल्या हालचालींवर चितळ, लंगूर, काळवीट, गवे, मोर आदी प्राण्यांनी पेगॅससप्रमाणे लक्ष ठेवले, हे तिला आवडले नव्हते. संतापाने ती डरकाळली.

‘ही आपली सख्खी मावशी…बरं का!’ थोरल्या शिकाऱ्याने अभिमानाने धाकल्या शिकाऱ्याला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT