Shri Ram Mandir Replica
Shri Ram Mandir Replica sakal
संपादकीय

प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जनसंपर्क मोहीम

शरद प्रधान

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर उद्घघाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. एकूण कार्यक्रमांचे स्वरुप पाहता जनसंपर्काबरोबरच त्यातून आपसूक लोकसभा निवडणुकीची तयारीही चाललेली दिसत आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या मंदिरात येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. या कालावधीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये, अयोध्येतील राममंदिरामधील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर निर्माण हा विषय घेऊन जनतेपर्यंत पोचणार आहेत.

त्यांना या कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील मागील वर्षी ३० डिसेंबर रोजी अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‍घाटन केले. तसेच तेथील नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्‍घाटन करून, ‘अमृत भारत’ आणि ‘वंदे भारत’ या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

या कार्यक्रमांची भव्यदिव्यता पाहता, मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग या कार्यक्रमांद्वारे फुंकल्याचे स्पष्ट जाणवते. अयोध्येतील राममंदिर हा आगामी निवडणुकांतील प्रचाराचा एक मुद्दा, इतकीच याची व्याप्ती मर्यादित न ठेवता अधिकाधिक राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून होताना दिसत आहे.

अक्षता वाटपातून जनसंपर्क

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्यावतीने एक अभिनव कल्पना राबविण्यात आली आहे. त्यानुसार घराघरांत जाऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातही अक्षता वाटप होत आहे. त्याचप्रमाणे २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असताना त्याचदिवशी घराघरांत दिवाळी साजरी करत पणत्या लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी या कार्यकर्त्यांनी घराघरांत पणत्याही वाटल्या आहेत. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील विविध जातींना एकत्र आणण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणानुसार, अक्षता देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून खास सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही गावातील एकही घर निमंत्रण देण्यापासून वंचित ठेवता कामा नये, असे सांगण्यात आले आहे.

‘प्रभू श्रीराम हे सर्व समाजाचे आहेत. कोणत्याही समाजाशी भेदभाव करू नये,’ अशी संघाचे अवध प्रदेशाचे प्रांत प्रचारक अशोक दुबे यांची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूने पाहायचे झाल्यास, कित्येक दशकांपासून भाजपच्या अजेंड्यावर नसणाऱ्या वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग या निमित्ताने निवडला आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यासाठी बोलविलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये इतर मागासवर्गीय घटकातील १३२ जातींच्या प्रतिनिधींना प्रमुख पाहुण्यांच्या यादीत स्थान दिले आहे. समाजातील सर्व घटकांना यात सामील करून घेतले असल्याचा आणि त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिल्याचा संदेश देण्यात येणार आहे.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर

याबाबत आणखीन एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे, विरोधकांकडून भाजपवर सवर्णांचा पक्ष अथवा सवर्ण समाजाला झुकते माप देणारा पक्ष असा आरोप होत असतो. भाजप सरकारच्या कार्यकाळात इतर मागास समाजावर (ओबीसी) अन्याय होत असून त्यांना त्यांचा हक्क मिळत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांकडून जातिनिहाय जनगणनेची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सामावून घेतल्याने विरोधकांचे अनेक मुद्दे खोडले जातील, अशी भाजपला आशा आहे.

दरम्यान, संघ परिवारातील कार्यकर्ते जरी घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण देत असले तरीही, २२ तारखेला अयोध्येत न येता स्वतःच्या घरीच पणत्या लावून उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांना करण्यात येत आहे. त्यामुळे त्यादिवशी अयोध्येत केवळ विशेष निमंत्रित, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि परदेशी पाहुण्यांचा समावेश आहे, त्यांनीच कार्यक्रमाला यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्यावतीने उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना २२ तारखेला विशेष रामायण पाठाचे आयोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील वाल्मिकी मंदिरांमध्ये बहुसंख्येने जाणारा दलित वर्ग जोडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने २२ जानेवारीपूर्वी राज्यात आठवडाभर विविध कार्यक्रम साजरे करण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

यात अत्यंत तपशीलवार सूचना आहेत. त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमांसाठीचा खर्च सरकार करेल, अशी अभूतपूर्व घोषणाही मुख्य सचिवांनी या परिपत्रकात केली आहे. या कार्यक्रमांवर देखरेख आणि समन्वयासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.

परदेशातील कलाकारांचेही कार्यक्रम

अयोध्येसह देशभरातील आणि परदेशातील काही निवडक कलाकारांची पथके रामलीला सादर करण्यासाठी अयोध्येत दाखल होणार आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, सिक्कीम, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यातील कलाकारांची पथके अयोध्येत रामलीला सादर करण्यासाठी दाखल होणार आहेत.

त्याचप्रमाणे कंबोडिया, श्रीलंका, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड आणि नेपाळ या देशांतील कलाकार देखील २२ जानेवारी रोजी अयोध्येतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समारोप अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने होणार असला तरी त्यानंतर पुढील दोन महिने, नवे रूप ल्यालेल्या अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी विशेष भंडाऱ्याचे, म्हणजेच भोजन प्रसादाचे आयोजन केले जाणार आहे.

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT