Caribbean-Plastic
Caribbean-Plastic 
संपादकीय

प्रदूषणाच्या समस्येचा "समुद्र'

डॉ. श्रीकांत कार्लेकर

मध्य अमेरिकेतील होंडुरासच्या किना-यानजीक कॅरिबिअन समुद्रात प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीगच्या ढीग तरंगत असल्याचे भीषण वास्तव गेल्या आठवड्यात जगासमोर आले. उत्तरेकडील क्‍युबा, जमैका, हैती, डॉमिनिक या देशांनी बंदिस्त केलेल्या कॅरिबिअन समुद्राच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचून राहायला इथे आणखी मदत झाली आहे. याचमुळे काहीशे मीटर लांबी रुंदीचे प्लॅस्टिक कचऱ्याचे बेटच तयार झाले आहे. त्यामुळे समुद्रातील जीवन धोक्‍यात आले आहे.

जगातील समुद्रात वेगाने चालू असलेल्या विविध प्रकारच्या व विशेषतः प्लॅस्टिक पदार्थांच्या प्रदूषणाचे हे एक प्रातिनिधिक चित्र. प्रशांत महासागरातही हे प्रमाण असेच धक्कादायक आहे. प्रशांत महासागरात व मेक्‍सिकोच्या आखातात तयार झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या बेटांची लांबीही अनेक मीटर आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रात बोर्डी, एलिफंटा, रेवदंडा, मुरुड, देवबाग अशा अनेक ठिकाणी सागरी प्रदूषणाचे दुष्परिणाम प्रकर्षाने दिसू लागले आहेत. डॉल्फिनसारखे मोठे मासेही मरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी, तरंगणारे प्लॅस्टिक पदार्थ यामुळे कोकणातील समुद्र आणि खाड्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत. या समस्येची वेळीच दखल घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.

बराच वेळ खाऱ्या पाण्यात तरंगत राहिल्यामुळे प्लॅस्टिकचे बारीक तुकडे होतात आणि ते अन्नसाखळीवाटे समुद्री पक्षी, कासवे, मासे, अन्य सागरी जिवांच्या पोटात जातात. समुद्री पक्ष्यांच्या पोटात प्लॅस्टिकचे तुकडे आढळतात. आजूबाजूच्या समुद्राच्या दूरवर असलेल्या देशांच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या प्लॅस्टिकचे समुद्रमार्गे होणारे हे प्रदूषण. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिका यांच्या दरम्यान मिडवे आयलंड आहे. अलबेट्रोस या पक्ष्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रशांत महासागरातील या बेटापासून खूप दूर भूखंडांचे किनारे आहेत. तिथून दरवर्षी जवळजवळ सात टन प्लॅस्टिक कचरा या बेटाकडे वाहत येतो. या कचऱ्याने बेटाच्या पर्यावरणाची प्रत बिघडवली आहे. कचरा पोटात गेल्यामुळे अलबेट्रोस पक्ष्यांचा मोठ्या संख्येने विनाश झाला आहे. मेलेल्या अलबेट्रोस पक्ष्यांच्या पोटात दिसणारा प्लॅस्टिक कचरा हे सागरी बेटांच्या पर्यावरण व जैविक ऱ्हासाचे अगदी बोलके उदाहरण आहे.

आज जगातील समुद्रात साचून राहिलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचे वजन पाच हजार टन इतके असल्याचा अंदाज करण्यात आला. समुद्रातील हे प्लॅस्टिक नैसर्गिकदृष्ट्या नष्ट होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. किनारी प्रदूषकांचे सर्वात जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदी मुखातून म्हणजे खाड्यातून होते आहे. किनारी शहरांच्या जवळ असलेल्या वाळूच्या पुळणीवर प्रदूषण इतके प्रमाणाबाहेर वाढले आहे, की या पुळणी पर्यटकांसाठी व स्थानिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात याव्यात, अशी परिस्थिती आहे.

लाटांबरोबर व प्रवाहांबरोबर पुळण प्रदेशात खाड्यातून वाहत येणारे प्लॅस्टिक पदार्थ, दूषित आणि धोकादायक पाणी आणि त्यामुळे वाढणारी रोग निर्माणकारी अतिसूक्ष्म जीवजंतूंची पातळी भविष्यात मोठीच समस्या ठरू शकेल. या किनारी प्रदूषकांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. तरंगणारी प्रदूषके आणि विषारी पदार्थ या दोन्हीमुळे पाण्याची प्रत झपाट्याने बिघडते. किनारी प्रदूषकांच्या स्रोतांचे "स्थानीय" व "अस्थानीय स्त्रोत' असे प्रकार केले जातात. समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात, बोगदे, कालवे, पाइप यातून सांडपाण्याचे व प्लॅस्टिकयुक्त कचऱ्याचे विसर्जन जेथून केले जाते, त्यास "स्थानीय स्त्रोत' म्हटले जाते. मोठमोठ्या जहाजातून जिथे तेल गळती होते, त्यासही स्थानीय स्त्रोतच म्हटले जाते. याउलट किनाऱ्यानजीकच्या शेत जमिनी, जवळच्या शहरातील रस्ते, वाहनतळ, खार जमिनी यांस अस्थानीय स्त्रोत असे म्हटले जाते. या प्रकारात प्रदूषकांचा पुरवठा विस्तृत क्षेत्रातून होत असल्यामुळे स्त्रोताचा हा प्रकार जास्त धोकादायक.
शहराजवळचे स्थानीय स्त्रोत जुने झाले असतील किंवा त्यावर खूप ताण असेल तर किनाऱ्यावरील प्रदूषण वेगाने वाढत रहाते. पाण्यातील जिवाणूंची पातळी धोकादायक बनते. किनारी प्रदेशात शहरांचे सांडपाणी व कचरा टाकल्यामुळे पाणी तर दूषित होतेच; पण त्याचबरोबर पाण्यातील प्राणवायू कमी होतो, विषारी द्रव्ये वाढतात. ही प्रदूषके दूरवर पसरल्यामुळे जवळपासची खेडीही प्रदूषित होताहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे, शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठेच दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते, अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे तडफडून मरतात. समुद्रात सोडलेल्या त्याज्य पदार्थात मोठ्या प्रमाणावर Phosphates व nitrates असतात. यामुळे शैवाल व जलपर्णींची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. यांस अतिजैविकीकरण म्हटले जाते. अनिर्बंध औद्योगीकरण, विविध कंपन्या आणि उद्योग यांच्याकडून समुद्रात फेकले जाणारे प्लॅस्टिक व प्लॅस्टिकजन्य पदार्थ, दूषित पाणी, गटारे व नाल्यातून जाणारे सांडपाणी या सगळ्याचा परिणाम सागरी जीव वैविध्यावर झपाट्याने होतो आहे. हे सर्व रोखण्यासाठी कठोर कायदे तर हवेच; शिवाय स्थानिक पातळीवरही एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आज अनेक देशांतून प्लॅस्टिकच्या ह्या भस्मासुराला आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आपल्याकडेही आता प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध येऊ घातले आहेत. पण समस्या समजावून घेऊन प्रत्येकाने या नियमनाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली तरच त्यांना यश येईल. प्लॅस्टिकचा वापर करण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वस्तूंची प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ने आण थांबविणे, पाण्यासाठी प्लॅस्टिक बाटल्या न वापरणे, प्लॅस्टिक पॅकिंग टाळण्याबाबत संबंधित कंपन्यांना प्रवृत्त करणे, असे अनेक आघाड्यांवरील उपाय योजावे लागतील. समुद्रकिनारे लाभलेल्या मोठ्या शहरांतून आजकल रस्तोरस्तीच्या टपऱ्या, हातगाड्या, रुग्णालये आणि हॉटेल्स इथे तयार होणारा कचरा शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतो. शहरी वस्त्यांतून वाहत आलेल्या सौंदर्य प्रसाधनातून वापरल्या गेलेल्या अनेक प्लॅस्टिक वस्तू समुद्रातील काही मासे खाद्य समजून खातात व जीव गमावतात. म्हणूनच हे सर्व रोखण्यासाठी कठोर कायदे तर हवेच आहेत; शिवाय स्थानिक पातळीवरही एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT