tiger
tiger sakal
संपादकीय

भाष्य : संघर्षाचा ‘कॉरिडॉर’

सकाळ वृत्तसेवा

वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. जगातील सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे.

- प्रा. सुरेश चोपणे

वाघांच्या मानवावरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अशा हल्ल्यांत मानवी मृत्यूंचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांत संताप, तर वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचा सूर आहे. संरक्षित वातावरणामुळे वाघांची संख्या वाढली, त्याचवेळी जंगलातील मानवाचा हस्तक्षेपही प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अशा घटना घडताहेत. यावर दोन्ही बाजूंनी समर्पक उपाय योजणे गरजेचे आहे.

वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. जगातील सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे. व्याघ्र संरक्षण प्रकल्पांच्या निर्मितीमुळे चांगला अधिवास उपलब्ध झाल्याने वाघांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मध्यप्रदेशानंतर, कर्नाटक, उत्तराखंड आणि नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे. व्याघ्र प्रकल्पानुसार ताडोबा हा आठव्या क्रमांकावर आहे. वाघांच्या मृत्यूचा विचार केल्यास सर्वांत जास्त वाघ हे नैसर्गिक कारणामुळे मरतात. त्यानंतर अपघात आणि शिकारीमुळे वाघांचा मृत्यू होतो. देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली आहे. परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे तुटलेले भ्रमण मार्ग, मानवाचा आणि गुराढोरांचा जंगलातील मुक्त वावर, जंगलाच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, जंगलातील गावाची संख्या अशा अनेक कारणांमुळे वाघ-मानव संघर्षात वाढ होत असून त्यातून वाघ आणि मानव यांचे मृत्यू वाढू लागले आहेत. यावर कायमची उपाययोजना होणे आवश्यक आहे, अन्यथा जन आक्रोश वाढेल. वाघांच्या संरक्षणाचा प्रश्नही अनुत्तरित राहील.

महाराष्ट्रात बोर, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, पेंच, सह्याद्री आणि ताडोबा असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांपेक्षा ताडोबात सर्वाधिक दोनशेहून अधिक वाघ आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर व्याघ्र प्रकल्पाबाहेर जास्त वाघ आहेत. गडचिरोली येथे पूर्वी एकही वाघ नव्हता, तिथे आता वीसच्या वर वाघ आहेत. तिथेही वाघांच्या मानवावरील हल्ल्यात वाढ होत आहे. २०१८च्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात वाघांची संख्या २ हजार ९६७ आहे. सर्वाधिक ५२६ वाघ हे मध्यप्रदेशात आहेत, कर्नाटकात ५२४ , उत्तराखंडात ४४२ आणि महाराष्ट्रात ३१२ वाघ आहेत. दरवर्षी वाघांची संख्या सहा टक्के दराने वाढते आहे; परंतु गेल्या दोन वर्षात ही संख्या जास्त वाढली असून, देशांत तीन हजारांहून अधिक वाघ आहेत, तर महाराष्ट्रात तीनशेहून अधिक वाघ आहेत. त्यापैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक आहेत.

वाघ-मानव संघर्षात वाघांचे मृत्यू होतात; तसेच मानवांचे मृत्यू सुद्धा होतात. अलीकडे शिकारी कमी झाल्या असल्या तरी वाघांच्या अपघाती मृत्यूत वाढ झाली आहे. परंतु आज खरी समस्या वाघांच्या आणि वन्यजीवांच्या हल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, ही आहे . महाराष्ट्रात वन्यजीवांच्या हल्ल्यात २०१७ मध्ये ५० लोकांचा बळी गेला. २०१८ आणि २०१९मध्ये अनुक्रमे ३६ आणि ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२०मध्ये हा आकडा सर्वाधिक ८८ वर गेला, कारण कोविडच्या लॉकडाऊनमुळे लोकांचा जंगलातील हस्तक्षेप वाढला होता. आता तर त्यात चांगलीच वाढ झाली आहे. वाघांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०१४-२०२० दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात ३२० लोकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रात ९९ तर पश्चिम बंगालमध्ये ७८ लोकांचा मृत्यू झाला होता. यावरून विदर्भात हा संघर्ष किती वाढला आहे आणि त्यावर उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येते.

उत्तम अधिवास

हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, विकास, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण लोकांचे जंगलावरील अवलंबित्व वाढले आहे. जवळजवळ ८०० गावे जंगलात किंवा जंगल परिसरात आहेत. त्यामुळे वाघ व वन्यजीवांचा त्रास शेतकरी आणि नागरिकांना होतो आहे. तशीच समस्या वन्यजीवांची सुद्धा आहे. जिल्ह्यात वेकोलीच्या खाणी आणि अनेक उद्योग आहेत. त्यामुळे वाघ -वन्यजीवांचे अधिवास, भ्रमण मार्ग बाधित झाले असल्यामुळे वन्यजीव-वाघ-मानव संघर्षात वाढ झाली आहे. केवळ चंद्रपूर शहराजवळ २१ वाघ आहेत. चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० वाघिणी, ३७ बछडे आणि ४१ वयस्क वाघ आहेत. यावरून वाघांच्या संख्येत किती वाढ झाली, हे लक्षात येते. वाघांच्या वाढीमुळेच ताडोबातील वाघ विविध मार्गांनी महाराष्ट्रभर जात आहेत. त्यातूनही त्या ठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवत आहेत. वाघ, वन्यजीव आणि मानव यांचे अस्तित्व महत्त्वाचे असून त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय? यावर चिंतन झाले पाहिजे. यासाठी दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची वाढती संख्या ही सुद्धा मानवी मृत्यूस कारणीभूत आहे. मानवाचा जंगलातील वावर पूर्वीही होता; परंतु तेव्हा वाघ आणि वन्यजीवांची संख्या कमी होती. त्यामुळे मानवाची मृत्यूसंख्या नगण्य होती. आज स्थिती बदलली असली तरीही मानवी हस्तक्षेप तसाच आहे. त्यामुळेच मानवावरील हल्ले वाढले आहेत. वाघांचे जितके हल्ले आजपर्यंत झाले, त्यातील ९९% हल्ले हे जंगलात झाले आहेत, यावर उपाय म्हणजे एकतर मानवाचा जंगलातील हस्तक्षेप कमी व्हावा, किंवा वन्यजीवांची संख्या नियंत्रित ठेवावी, तरच हे हल्ले थांबतील. सोबतच जंगलतोड थांबवावी लागेल आणि घनदाट वनक्षेत्रात वाढ करावी लागेल. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी महाराष्ट्रातील ३० टक्के घनदाट जंगलापैकी आज केवळ १७ टक्के राहिले आहे. जंगलातून रेल्वे, रस्ते, वीजतारा, धरणे, उद्योग आणि विकास कामांमुळे जी जंगले राहिली आहेत, ती सुद्धा तुकड्यात विभागली आहेत. वाघांचे बछडे मोठे झाली की त्यांना दुसरी जागा शोधावी लागते. नर आणि मादी मिलनासाठी भ्रमण करतात तसेच अन्नाच्या शोधात सुद्धा वाघ आणि वन्यजीव भ्रमण करीत असतात. परंतु शेती आणि गावांसाठी होणारी जंगलतोड आणि विकासकामे यामुळे वाघांच्या भ्रमण मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातून वाघ- मानव संघर्ष वाढला आहे. जोपर्यंत आपण वन्यजीवांचे भ्रमण मार्ग सुरक्षित करणार नाही, तोपर्यंत मानवावरील हल्ले सुरूच राहतील. जंगलातील गावांचे पुनर्वसन केले पाहिजे. इतर गावात मात्र नियमित निरीक्षणे, नागरिकांना सावध करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध केली पाहिजेत.

वन आणि वन्यजीव संरक्षणात जोपर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य राहणार नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नाही. दुर्दैवाने असे सर्व ठिकाणी घडताना दिसत नाही. वाघाने माणसास मारले की ‘ वाघांना पकडा, मारा’ असा आक्रोश केला जातो. दुसरीकडे ‘तुमचा वाघ आणि प्राणी आवरा’ असा सूर केवळ ग्रामीण भागातूनच नव्हे, तर सुशिक्षित राजकारणी आणि समाजसेवी लोकांकडूनही आळवला जातो. म्हणूनच लोकांची मने जिंकून लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते.

(लेखक ‘ग्रीन प्लानेट सोसायटी’चे अध्यक्ष व ‘ताडोबा क्रिटिकल वाईल्डलाईफ हॅबिटंट कमिटी’चे सदस्य आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT